देवगिरी। आपल्याला संत महंतांनी तसेच आपल्या वेद पुराणामध्ये निसर्गाचं महत्व विशद केलं आहे. निसर्ग कोणतेही अपेक्षा न ठेवता आपल्याला भरभरून देत असतो. म्हणून त्यांना संतांनी 'सोयरे' संबोधून त्यांना आपल्या कुटुंबाचं सदस्य म्हंटल आहे. आपल्याकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे, म्हणूनच त्याचे परिणाम प्रदूषणाच्या माध्यमातून आपल्याला दिसते. त्यामुळे भारताच्या निरामय स्वास्थ्यासाठी आपल्याला आता निसर्ग संवर्धन करावेच लागेल असे महामंडलेश्वर श्री संत जनार्दन हरी जी महाराज (फैजपूर) यांनी प्रकृती वंदन कार्यक्रमात सांगितले.
महाराज म्हणाले, वृक्षाची सेवा करणं म्हणजे श्रीकृष्णाची सेवा आहे. वृक्ष सेवा म्हणजे राष्ट्र सेवा तसेच समाजसेवा आहे. श्रीकृष्णाने आपल्याला हा संदेश दिला आहे. आपण इंद्रामुळे नाही तर गोवर्धन पर्वतामुळे सुरक्षित आहोत. आपल्याला गोवर्धन सर्वकाही देत आला आहे. असा संदेश श्रीकृष्णाने समस्त गोकुळ वासीयांना दिला होता. प्राणी मात्रांवर दया दाखवणं आपला संस्कार आहे.
वाढदिवस, लग्न किंवा कोणाच्या पुण्यतीथीनिमित्त वृक्षारोपण करायला हवे. निरामय भारताच्या स्वास्थ्यासाठी आपण संकल्प करायला हवा आणि याची सुरुवात अपल्यापासून करूया. जलसंधारण ची कामं आपल्याला वाढवावी लागणार आहे. आपल्या घरापासून याची सुरुवात करावी लागणार आहे. यावल व रावेर तालुक्यात जलसंधारणची कामे लोकांनी स्वतः पुढे येऊन केली, त्याचा परिणाम म्हणजे आज अनेकांच्या कोरड्या विहिरींना पाणी आले. आपल्याला स्वच्छता, हागणदारीमुक्त गाव, सामाजिक समरसता, एकात्मक भाव जागृत करायचा आहे. असा संदेशही महाराजांनी दिला.
स्वामी जनार्दन महाराज पुढे म्हणाले, भगवान श्री कृष्णांनी गोसेवा करून आपल्याला प्राणी मात्रांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यांनी स्वतः कृतीतून जलसंधारण च्या कार्याचे उदाहरण दिलं आहे. गोपाळ कृष्णांनी डोहातून कालिया मर्दन केले. त्यानंतर त्यांनी स्वतः त्या डोहाची स्वच्छता करून गावासाठी त्यातील पाणी उपयोगात आणून दिले. हा आपल्यासाठी आदर्श आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षण ही आज काळाची गरज आहे व श्रीकृष्णांनी दिलेल्या आदर्शानुसार आपण हे राष्ट्रकार्य करण्यासाठी सुरुवात करूया. देशभरात रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी हे महान कार्य सुरू केले आहे. अनेक सामाजिक संस्थानी सुद्धा हे कार्य हाती घेतले आहे. समाजातील प्रत्येक घटकाने आता पर्यावरण रक्षणाची जबाबदारी उचलून निसर्ग संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे असे आवाहन महाराजांनीं यावेळी केले.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या