देवगिरी। आम्ही सृष्टीचे अंग आहोत सृष्टीचे पोषण करणे हे आमचे कर्तव्य आहे. आमच्या प्राणधारणेसाठी आम्ही सृष्टी कडून काही घेतो. आम्ही सृष्टीचे शोषण करीत नाही. ही जीवन जगण्याची पद्धती आमच्या पूर्वजांनी लक्षात घेतली. केवळ एका दिवसासाठी नव्हे, तर संपूर्ण जीवनामध्ये त्यास स्थान देण्यात आले. असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे पू. सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत यांनी आज 30 ऑगस्ट 2020, रविवार रोजी 'प्रकृती वंदन' या कार्यक्रमात उद्बोधन करताना केले. पर्यावरण, वने व जीवसृष्टी संरक्षण हेतू भारतातील 25 राज्यासह 15 देशात हा कार्यक्रम लोकांनी आपल्या राहत्या घरी वृक्षपूजन करत साजरी केला.
पू. सरसंघचालक म्हणाले, आतापर्यंत या जगामध्ये जीवन जगण्याची जी पद्धती होती वा अजूनही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे ती पद्धती पर्यावरणाशी अनुकूल अशी नाही. निसर्गावर प्रकृतीवर मात करून मानवाला जगायचे आहे असे या पद्धतीचे मानणे आहे. निसर्ग व प्रकृती मानवाच्या उपभोगासाठी असून त्या निसर्गा संदर्भात कसली बांधीलकी मानवावर नाही असा विचार या पद्धतीद्वारे मांडला जातो. निसर्गावर म्हणजेच प्रकृतीवर मानवाचा संपूर्ण अधिकार आहे, असे म्हणून जीवनक्रम सुरू ठेवण्याची ही पद्धती आहे. अशा प्रकारचे जीवन आपण गेली दोनशे ते अडीचशे वर्षे जगत आलो आहोत. त्यांचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. असेच जर सुरू राहिले तर या सृष्टीमध्ये जीवन जगण्यासाठी आपण राहणार नाही किंवा ही सृष्टीस राहणार नाही असेही होऊ शकते. हे सगळे लक्षात घेऊन मानव विचार करू लागला आणि पर्यावरणाचे संरक्षण व्हायला हवे असे त्यास वाटू लागले त्यातूनच पर्यावरण दिन साजरा करण्यात येऊ लागला.
मात्र भारताची ही पद्धती पूर्णपणे भिन्न आहे. अस्तित्वाच्या सत्यास आमच्या पूर्वजांनी त्याच्या पूर्ण रूपामध्ये जाणले होते तेव्हापासूनच त्यांनी आम्ही या प्रकृतीची एक अंग आहोत हे ओळखले होते. शरीरामधील सर्व अवयव जेव्हा कार्य करतात त्यावेळी शरीर कार्यरत राहते. तसेच जोपर्यंत शरीर कार्यरत राहते, तोपर्यंत शरीरातील अवयव कार्य करतात. शरीरातून जेव्हा प्राण निघून जातो, तेव्हा हृदय बंद पडते. काही वेळानंतर मेंदू काम करणे थांबवितो, सर्वात शेवटी आतड्यांमधील स्नायूंचे काम थांबते ते मरून जातात. शरीर हे अवयवांच्या कार्यावर अवलंबून आहे, तर अंग हे शरीरातून मिळणाऱ्या प्राणिक उर्जेवर अवलंबून आहे असा परस्पर संबंध सृष्टीचा आमच्याशी आहे. आम्ही सृष्टीचे अंग आहोत सृष्टीचे पोषण करणे हे आमचे कर्तव्य आहे. आमच्या प्राणधारणेसाठी आम्ही सृष्टी कडून काही घेतो. आम्ही सृष्टीचे शोषण करीत नाही. ही जीवन जगण्याची पद्धती आमच्या पूर्वजांनी लक्षात घेतली. केवळ एका दिवसासाठी नव्हे, तर संपूर्ण जीवनामध्ये त्यास स्थान देण्यात आले. आपल्या येथे संध्याकाळी झाडे झोपत असल्याने त्या झाडांना हात लावू नये असे सांगितले गेले आहे.
पर्यावरणस्नेही भारतीय संस्कृती समजून सांगताना पू. सरसंघचालक म्हणाले, आपल्याकडे जीव जंतुपासून ते प्राणी मात्रांची पूजा करून त्यांना प्रेम द्यायचे शिकवले गेले आहे. आमच्या जीवन पद्धतीमध्ये काय करायला हवे कसे राहायला हवे या सर्वांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आपल्या येथे रोज मुंग्यांना पीठ घातले जात असे, आपल्या येथे घरामध्ये गाईला गोग्रास, कुत्र्यास श्वान बली, पक्ष्यांना काकबली, कृमी कीटकांसाठी बली, आणि गावामध्ये एखादा अतिथी उपाशी असेल तर त्याच्यासाठीही बली ठेवल्यानंतर घरातील व्यक्ती भोजन करीत असे. हे बळी म्हणजे प्राण्यांची हिंसा नव्हती. हे बळी म्हणजे घरामध्ये शिजविलेले अन्न या सर्वांना दिले जात असे. या सर्वांचे पोषण करणे ही मानवाची जबाबदारी आहे. या सर्वांमुळे मनुष्याचे पोषण होते, हे लक्षात घेऊन तसे आपण जगत होतो. त्यामुळेच आपल्या येथे नद्यांची पूजा केली जाते. वृक्ष रोपे तुळस यांची पूजा केली जाते. आपल्या इथे पर्वतांची पूजा होते. आपल्या येथे गायीची पूजा केली जाते, तसेच सापांची ही पूजा केली जाते. संपूर्ण विश्व एका चराचर चैतन्याने व्याप्त असल्याने सृष्टीच्या प्रत्येक प्राणिमात्रांमध्ये वस्तूमध्ये त्या चैतन्यास पाहणे त्याकडे श्रद्धापूर्वक आत्मीयतेने पाहणे त्यांच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करणे आणि परस्पर सहकार्याने सर्वांचे जीवन चालेल हे पाहणे ही आमची जीवनपद्धती होती.
भगवतगीतेमध्ये परस्पर भावयंतम असे म्हटले आहे. देवाशी सांगला व्यवहार करा, देवही आपल्याशी चांगला व्यवहार करतील. परस्परांशी चांगला व्यवहार ठेवल्याने सृष्टीचे चलनवलन सुरू राहते. अशा प्रकारचे आपले जीवन होते. पण, काही चुकीच्या पद्धतीच्या प्रभावाखाली आल्याने आपण हे सर्व विसरून गेलो. त्यामुळेच आम्हाला पर्यावरण दिनाच्या रुपात असे दिन साजरे करून आम्हाला त्या गोष्टींचे स्मरण करावे लागत आहे. अशाप्रकारचे स्मरण प्रत्येक घरामध्ये व्हायला हवे. असे स्मरण करण्यासाठी यावर्षीचा 30 ऑगस्ट हा दिवसा पण ठरविला, परंतु आपल्या येथे नागपंचमी आहे, गोवर्धन पूजा आहे, आपल्या इथे तुळशी विवाह आहे हे सर्व दिवस आजचे संदर्भ लक्षात घेऊन योग्यप्रकारे साजरे करून आम्हाला सर्वांना हे सर्व संस्कार आमच्या संपूर्ण जीवनात पुन्हा उतरवायचे आहेत. पुन्हा हे अंगवळणी पाडायचे आहे. असे केल्याने नवीन पिढीही शिकेल. त्यामागील भाव लक्षात घेईल. आम्ही या निसर्गाचे प्रकृतीचे घटक आहोत. प्रकृतीपासून आपले पोषण करायचे आहे. प्रकृतीपासून पोषण करीत असताना प्रकृतीचे अस्तित्व टिकवायचे आहे. अशा प्रकारचा विचार करून नव्या पिढीने वाटचाल केल्यास विशेष करून गेल्या तीनशे-साडेतीनशे वर्षांमध्ये जे चुकीचे घडले ते येणाऱ्या शंभर ते दोनशे वर्षांमध्ये आम्ही सुधारू शकू, असे झाल्याने सृष्टी सुरक्षित होईल मानवजात सुरक्षित होईल जीवन सुंदर होईल.
हा दिवस साजरा करताना केवळ आम्ही एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम करीत आहोत असा भाव न ठेवता संपूर्ण सृष्टीच्या पोषणासाठी आपले जीवन सौंदर्यपूर्ण बनविण्यासाठी सर्वांच्या उन्नतीसाठी आम्ही कार्य करीत आहोत असा भाव आम्हाला आमच्या मनात ठेवायला हवा. तसेच या एका दिवसापासून जो संदेश मिळाला आहे तो डोळे उघडे ठेवून आणि आपल्या जीवनातील लहान-लहान गोष्टींचा विचार करून आपल्या आचरणात आणायला हवा असे मला वाटते. असा महत्वपूर्ण संदेश पू. डॉ. मोहनजी भागवत यांनी दिला.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या