@रवींद्र गणेश सासमकर
आपला इतिहास पराजयाचा नसून अनवरत संघर्षाचा इतिहास आहे. परकीय आक्रमकांविरुध्द आपल्या शूर वीर पूर्वजांनी नेहमीच संघर्ष करत आपल्या स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करण्याचा प्रयत्न केला. सम्राट पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप, महाराणा कुंभा, छत्रपती शिवाजीमहाराज, छ. संभाजीमहाराज अशा आपल्या महान पूर्वजांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानामुळेच आपले अस्तित्व टिकून राहिले. असे अनेक महापुरुष आणि त्यांनी दिलेले लढे भारतीय इतिहासाच्या पानापानावर आपल्याला दिसतात.
हैदराबाद संस्थान निजामशाहीपासून मुक्त करुन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारा लढा असाच प्रेरणादायी आणि रोमहर्षक होता.
मोगल कालखंडात दख्खनची विभागणी खान्देश, वऱ्हाड, औरंगाबाद (महाराष्ट्र), बिदर, विजापूर (कर्नाटक) आणि हैदराबाद (तेलंगणा) या सहा सुभ्यात करण्यात आली होती. औरंगाबाद हे या सुभ्यांच्या कारभाराचे मुख्य केंद्र होते. सहा सुभ्यांचा कारभार पाहण्यासाठी एका सुभेदाराची नियुक्ती मोगल बादशाहाकडून केली जात, त्यालाच दख्खनचा सुभेदार म्हटले जाई. मोगल बादशाह फर्रुखसियर याने इ. स. १७१३ मध्ये मीर कमरुद्धीन निजाम उलमुल्क फिरोजजंग खान कुलीखान याची दख्खनचाचा सुभेदार म्हणुन नियुक्ती केली होती.
१७०७ इसवी सन मध्ये मुघल बादशाह औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतरचे मुघल शासक दुर्बळ निघाले. त्यांच्यात सत्तासंघर्ष सुरु झाला. त्यामुळे देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली, त्याचाच लाभ घेऊन दख्खनचा सुभेदार मीर कमरुद्दीन याने ३१ जुलै १७२४ रोजी दक्षिणेत स्वतंत्र राज्याची स्थापना केली. या राज्याची राजधानी हैदराबाद होती. मीर कमरुद्दीनला मुघल बादशाह महम्मदशहा याने 'आसिफजाह 'हा किताब दिला होता. त्यामुळे त्याच्या घराण्यात आसिफजाही घराणे असेही म्हणतात. आसिफजाही घराण्यात एकुण सात निजाम होऊन गेले.
१) निजाम उलमुल्क (१७२४-१७४८)
२) मीर निजाम अली (१७६२-१८०३)
३) निजाम सिकंदरजाह (१८०३-१८२९)
४) निजाम नासिरउद्दौला (१८२९-१८५७)
५) निजाम अफजलुद्दौला (१८५७-१८६१)
६) निजाम महबुबअली (१८६१-१९११)
७) निजाम मीर उस्मानअली (१९११- १९४८)
आसफजाही घराण्याने लढाया फारशा केल्या नाहीत. ज्या लढाया झाल्या त्या प्रामुख्याने मराठ्यांशी झाल्या. त्या लढायांमध्ये मराठ्यांनी निजामाला अनेकवेळा पराजित केले. यापैकी प्रसिध्द लढाई म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुरजवळ पालखेडची (जि. नाशिक) लढाई (इसवी सन १७२७) या लढाईत बाजीराव पेशवे यांनी निजामाचा दारुण पराभव केला. या लढाईनंतर शेवगावचा तह झाला. (६ मार्च १७२७) त्यानंतर भोपाळ, तांदुळजा, राक्षसभुवन (बीड), साखरखर्डा आदी ठिकाणी झालेल्या लढाईत मराठ्यांचीच सरशी झाली.
पुढे भारतात इंग्रजी सत्ता प्रबळ झाल्यानंतर निजामाने इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले. इसवी सन १८०० च्या २० ऑक्टोंबरला निजामाने इंग्रजांशी करार केला. या करारान्वये हैदराबादला संरक्षित राज्य (Protected state) घोषित करण्यात आले. इंग्रजांची तैनाजी फौज रुजू झाली. पुढे निजामाच्या मंत्रीमंडळाची नेमणूकही इंग्रजच करु लागले.
हैदराबाद संस्थानाचे एकुण क्षेत्रफळ ८२,३१३ मैल होते. १९४१ च्या शिरगणतीप्रमाणे एकुण लोकसंख्या होती १ कोटी ६३ लक्ष ३८ हजार ५५४. हैदराबाद संस्थानात तेलुगु, मराठी, कन्नड या प्रमुख भाषा बोलल्या जात असत. उर्दू बोलणारेही होते. मात्र उर्दू ही राजभाषा होती आणि शिक्षणाचे माध्यमेही उर्दू होते. सर्व राज्यकारभार उर्दूतच चालत असे. उस्मानिया विद्यापिठात उर्दू भाषेतून सर्व विषयांचे पुस्तके (वैद्यकीय विषयासह) भाषांतरित केली गेली. मुस्लिमांचे प्रमाण ११% असूनही सरकारी नोकऱ्यात त्यांची संख्या ७५% होती, यावरुन सरकारी नोकऱ्यात हिंदुसोबत भेदभाव केला असल्याचे दिसते. लोकसंख्येचा अभ्यास केला असता संस्थानातील हिंदुंना बाटवून मुसलमान बनवण्याचेही प्रयत्न मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसते.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला, तरी हैदराबाद संस्थान मात्र निजामशाहीच्या पारतंत्र्यात होते. शेवटी अनेक बलिदान, आंदोलने, सत्याग्रह या जनतेच्या लढ्याने आणि भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नाने अखेर हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलिन करण्यात आले. तथापि हे स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही. त्यासाठी असंख्य जणांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. हजारो कुटुंबांची राखरांगोळी झाली. त्याच्या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्यात जगत आहोत.
#हैदराबाद_मुक्तिसंग्राम
#मराठवाडा_मुक्तिसंग्राम
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या