नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती..
@ दीपक गजानन घाणेकर
( 9423187480 )
माझे नांव दीपक गजानन घाणेकर,तृतीय वर्ष शिक्षित,खाजगी व्यवसाय,जळगांवचा रहिवासी"गुरुगोविंदसिंह" प्रभात शाखेचा स्वयंसेवक.असा माझा परिचय मी संघाच्या प्रवासाला गेलो असतांना करुन देतअसे. देशभरातील सर्व शाखा एकाच प्रकारच्या असतात. सर्व शाखांची कार्यपद्धती समान असते, एकच प्रार्थना, समान आज्ञा, विचारात सारखेपणा त्यामुळे भाषा,प्रांत जरी अलग असले तरी संघामधे 'अनेकता मे एकता' साधलेली असते.
देशभरातील सर्व शाखा एकच असल्यातरी,काही शाखा दैनदिन, प्रयत्न, साप्ताहिक, मासिक, सायं, प्रभात, रात्र, प्रभावी असे प्रकार असतात. गुरुगोविंदसिंह प्रभात शाखा ही प्रभावी शाखा या गटात येते.
गुरुगोविंद शाखेचे वैशिष्ट्य असे की अनेक पावसाळे या शाखेने बघितले आहेत. साधारणपणे 1940 मध्ये गुरुगोविंदसिंह शाखेची सुरवात झाल्याचे जुन्या स्वयंसेवकाकडून समजते. या शाखेची भौगोलिक परिस्थिती,जुन्या जळगांवला लागून असल्याने दाट नागरी वस्ती मधे ही शाखा लागते. शाखेमध्ये अनेक प्रकारचे स्वयंसेवक येत असतात. संघ कार्यालय या शाखेपासून जवळच असल्यामुळे शाखा प्रवासासाठी येणारे संघाचे कार्यकर्ते तसेच अनेक प्रचारक या शाखेमध्ये येऊन गेलेले आहेत.
या शाखेचे दुसरे वैशिष्ट्य असे की, ही शाखा कार्यकर्ता निर्माण करणारी शाखा म्हणून ओळखली जाते. अनेक कार्यकर्ते या शाखेने निर्माण केलेले आहेत.विविध प्रकारचे दायित्व स्विकारली आहेत.गुरूगोविंदसिंह शाखा ही बारा बलुतेदारांची शाखा समजली जात असे. या शाखेत विविध जातीचे स्वयंसेवक येत असतात,खान्देश मिल चालू असतांना अनेक मिल कामगार शाखेत येत,मिलच्या भोंग्या प्रमाणे शाखा लागत असे,संघात जातीचा विचार करत नाही,परंतू गुरूगोविंद शाखेत विविध जातीचे स्वयंसेवक येत असतात.ख-या अर्थाने 'सामाजिक समरसता' अंगिकारलेली गुरुगोविंदसिंह शाखा आहे.या शाखेमध्ये येणारे स्वयंसेवक विविध भागातून येत असतात. मेहतरकॉलनी, लिधुरवाडा, गवळीवाडा, वाल्मीक नगर, सराफ बाजार, बळीराम पेठ, शनिपेठ, बालाजी पेठ,कांचन नगर येथून येत असत.
या शाखेत येणारे स्वयंसेवक देखील विविध स्वभावाचे, आर्थिकदृष्ट्या भिन्न स्थिती असलेले येत असत. वितंडवाद घालणारे, बन चुके स्वयंसेवक,(संघाची पूर्ण माहिती असल्याचा अहंकार बाळगणारे व आम्हाला शिकवू नका असे बोलुन खिल्ली उडवणारे) व्यायामाची आवड असणारे,पद्य गायनाची आवड असलेले,घरी वेळ जात नाही म्हणून येणारे आणि संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असे विविध प्रकारचे स्वयंसेवक गुरुगोविंद शाखेमध्ये येत असतात.या सर्व स्वयंसेवकांना एकत्रित आणणे हे अवघड काम शाखा कार्यवाहला करावे लागते.आणि हे काम विनायकराव दंडवते यांनी सातत्याने अनेक वर्षे केले.
विनायकराव यांचा जन्म 1933 साली सर्वसामान्य कुटुंबात झाला.घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. एकत्रित कुटुंबांमध्ये विनायकराव यांचा जन्म झाल्यामुळे घरामधील चांगल्या संस्कारांचा परिणाम त्यांच्या बालमनावर झाला.चांगल्या संस्कारामुळे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जुळले गेले.शिक्षण जेमतेम माध्यमिक शाळेपर्यत झाले.घरातील आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे त्यांनी खाजगी बिल्डींग मक्तेदाराकडे नोकरी स्विकारली.विवाह झाल्यावर त्यांनी नोकरी बरोबर सामाजिक कार्य देखील करत असत.नवीन स्थापन झालेल्या जनसंघ या राजकीय पक्षाचे काम करत असत.1955 मध्ये भारतीय जनसंघातर्फे गोवा मुक्ती आंदोलनाची सुरुवात 21 जून 1955 ला झाली,त्या आंदोलनामध्ये विनायकराव यांनी भाग घेतला होता. तसेच 1965 मध्ये कच्छ कराराच्या विरोधात भारतीय जनसंघा तर्फे दिल्लीला प्रचंड मोर्चा आयोजित झाला होता त्या मोर्चामध्ये जळगाव चे अनेक कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते, त्यात देखील विनायकराव यांनी दिल्लीच्या कच्छ करारा विरोधी आंदोलनात भाग घेतला होता. भारतीय जनसंघाच्या दीपक चिन्हा वर त्यांनी नगरपालिकेची निवडणूक देखील लढविली होती.केवळ 12 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.या राजकीय प्रवासात त्यांना मानसिक समाधान मिळत नव्हते,नंतर केवळ संघ काम करायचे असे त्यांनी ठरवले.नंतर त्यांनी गुरुगोविंदसिंह शाखेचे कार्यवाह म्हणून दायित्व स्विकारले.1990 मधे रामजन्मभूमी साठी पहिल्या कारसेवेत विनायकराव व त्यांचेबरोबर शेकडो स्वयंसेवकांनी आंदोलनात भाग घेतला होता.त्यांना उत्तर प्रदेशात ललीतपूर येथे अटक झाली होती.
मी गुरुगोविंदसिंह शाखेचा स्वयंसेवक असल्यामुळे, या शाखेतील बऱ्याच स्वयंसेवकांना मी व्यक्तीशः ओळखतो. त्यांचे स्वभाव, वागणुकीतला त-हेवाईकपणा याची जाणीव मला होती. माझ्या मनात कधी कधी असा विचार येतो की आपल्या शाखेचे कार्यवाह समजा पु.ल. देशपांडे झाले असते तर त्यांनी व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचा पार्ट 2 चा भाग प्रकाशित केला असता, अशा अनेक व्यक्ती या शाखेमध्ये येत होत्या की,त्यांना पाहून पु.ल.ना खुप काही लिहिता आले असते.त्या व्यक्ती आणि वल्लींची क्षमा मागून मी त्यांचा नामोल्लेख करत आहे. या व्यक्ती आणि वल्ली पार्ट 2 मध्ये मी खालील व्यक्तींचा समावेश करू इच्छितो कै.शेनफडुमामा भांबरे, कै.धनुशेठ, कै.लक्ष्मणराव वाणी, कै.गंगाधर वाणी, माधवराव माळी, कै.अनंतराव नाटेकर, कै.सोमाभाऊ सपकाळे व इतर असंख्य.हे सर्व संघाचे निष्ठावान स्वयंसेवक होते. परंतु त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे लक्षात रहात होते.
हा लेख लिहीत असताना मला पु.ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली मधील 'नारायण' या पात्राची आठवण येत आहे.पुल चा नारायण लग्न समारंभात पडेल ती सर्व कामे करत असतो. सराफाकडील सोन्याचांदी पासून, किराणा,साड्या, कपडेलत्ते, आचारी, पाहुण्यांची सरबराई या सर्व गोष्टी आपुलकीने करत असतो. तो ही कामे कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे करत
असतो. तसेच गुरुगोविंद शाखेचा "नारायण" म्हणून विनायकराव दंडवते यांचेकडे मी पाहतो.गुरुगोविंद शाखेचे कार्यवाह हे दायित्व घेतल्या पासून विनायकराव उर्फ तात्या दंडवते गुरुगोविंदसिंह शाखेतील सर्व कामे ही 'नारायणा' प्रमाणे करत असत.ही सर्व शाखेची कामे आनंदाने व खळीमेळीने स्वतः करत व करवून घेत.
विनायकराव दंडवते यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते गुरुगोविंदसिंह शाखेचे सहल सम्राट होते. जळगांवला त्यांच्या इतक्या शाखेच्या सहली कोणत्याच शाखेने नेल्याचे माझ्या स्मरणात नाही. 1968 ते 1993 पर्यंत पंचवीस वर्ष त्यांनी न चुकता गुरुगोविंदसिंह शाखेच्या सहली आयोजित केल्या होत्या. जळगाव जिल्ह्यामधील विविध ठिकाणे, त्या ठिकाणांमधे वेगवेगळी ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे,अशी निवडत असत. या सहलींचे वैशिष्ट्य होतं की सहलीमध्ये स्वयंपाकाचं सर्व सामान ते बरोबर घेत असत व सर्व मिळून स्वयंपाक तयार करत असत.सहलीचा दिनांक ठरलेला असे,होळीच्या दुस-या दिवशी धुळवडीला शाखेची सहल ठरलेली असे.कार्यक्रमाचे नियोजन आठ दिवस अगोदर ठरलेलेअसे. स्वयंपाक करणा-या टीम मधे विनायकराव लक्ष घालत. इतर स्वयंसेवक नियोजित कार्यक्रम करत, खेळ, पद्य, परिचय व एखाद्या कार्यकर्त्याचे प्रबोधन झाल्यावर सामुहिक भोजनाचा कार्यक्रम होऊन, सहलीच्या समारोपाचा कार्यक्रम होत असे. शाखेचा 'आनंद मेळावा' असे सहलीचे स्वरुप येऊन ती आनंददायी सहल होत असे. या सहलीत जळगांव शहरात अन्य वस्तीत राहणा-या अनेक कार्यकर्त्यानी सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये अनेक प्रचारक, माननीय संघचालक, माननीय जिल्हा संघचालक, प्रांताचे कार्यकर्ते अशा अनेक अधिकाऱ्यांनी या सहलींचा अनुभव घेतलेला आहे.या सहलींचे नियोजन विनायकराव अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजित करत असत.
1993 मधील सहल विनायक राव यांच्या जीवनातली शेवटची सहल ठरली. संघाच्या निष्ठावान स्वयंसेवकाला एक इच्छा असते की जीवनात एकदा तरी आद्य सरसंघचालक पूजनीय डाॅ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृती मंदिराचे दर्शन घडावे.पूजनीय डाॅक्टर हेडगेवार आपले आराध्य दैवत आहे.विनायकरावांना पूर्व संकेत मिळाले असावेत की यापुढे गुरुगोविंदसिंह शाखेच्या सहलीत ते नसतील.
त्यांनी शाखेतील इतर स्वयंसेवकांशी बोलून असे ठरवले की या वर्षी आपणास नागपूरला पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृती मंदिराचे दर्शन घ्यायला नागपूरला जाण्याचे ठरवले आहे,सर्वांनी अत्यंत उत्साहाने नागपूरला जाण्याचे ठरवले.नागपूरच्या संघ कार्यालयात पूर्व सूचना देऊन तसे कळवण्यात आले. पंधरा जुने कार्यकर्ते त्यासाठी तयार झाले.सर्वांचे नागपूर स्मृती दर्शन चांगले झाले.मार्च 1993 मधे विनायकरावांना हार्टअटॅकने निधन झाले.त्यानंतर विनायकरावांचे अनेक सहकारी स्वयंसेवक,जे नागपूरला स्मृती मंदिराचे दर्शन घ्यायला आले होते तेही वयपरत्वे इहलोकास प्राप्त झाले.विनायकराव पुण्यवान होते,जाता जाता अनेक स्वयंसेवकांना स्मृती मंदिराचे दर्शन घेण्याचे भाग्य देऊन गेले. विनायकराव आणि माझी ओळख अगदी लहानपणापासून दुकानात झाली ते नेहमी सायकलचा वापर करत, नेहमीचा पोशाख म्हणजे पांढरा शर्ट पायजमा, शर्टला वरती खिसा त्यामधे छोटीशी डायरी, पेन, रोजच्या कामाचे नियोजन, विशेष भेटायचे त्या व्यक्तींची नांवे डायरीमध्ये लिहीलेली असत.विनायकराव घरून कामाला निघाल्यावर पहिला स्टाॅप आमच्या दुकानात असायचा.बरेच लोकांना विनायकरावांचा हा परिपाठ माहित असल्याने त्यांचे संपर्काचे ठिकाण व्ही.घाणेकर यांचे दुकान हे ठरलेले असे.दुकानात आल्यावर गप्पागोष्टी आणि हास्यविनोद होत असत. यामध्ये त्यांचे स्नेही कै.अनंतराव नाटेकर यांच्याशी त्यांचे हास्यविनोद नेहमी लक्षात राहतील असे असायचे. माझ्या सर्व मित्र मंडळींमध्ये विनायकराव खूप परिचित असे होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य व समाधान हे आज देखील आम्ही विसरू शकत नाही या स्वभावामुळे त्यांनी अनेक लोकांशी जवळीक निर्माण केली होती.विनायकराव भौतिक दृष्टीने सर्वसाधारण असले तरी समाधानी वृत्ती व चेह-यावरील आनंदी हास्याने ते गर्भश्रीमंतच होते.
22 मार्च 1993 ला त्यांना हार्टअटॅक येऊन दुःखद निधन झाले. गुरुगोविंदसिंह शाखेचे कार्यवाह व सुस्वभावी कार्यकर्ता म्हणून जळगांवकरांच्या नेहमी स्मरणात राहतील.
----///--------
मनोगत ( दंडवते कुटुंबीयांचे )
कै. श्री . विनायकराव गोविंद दंडवते.
जन्म :- १९३३
मृत्यू:- २२, मार्च १९९३
सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या एकत्र कुटुंबात जन्माला आलेले, शिक्षण जेमतेम. बालपणा पासुनच घरी संस्कार घडलें परिणामी आपोआपच राष्टीय स्वयंसेवक संघाशी हे कुटुंब जोडले गेले.
१९४७ च्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी सहभाग घेतला.
सन१९६८ ते सन १९९३ या कालखंडात
सतत पंचवीस वर्षे दर २६,जानेवारी व धुलीवंदनाच्या दिवशी शहराबाहेर सर्व कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण करून कार्यक्रम केले. मग ते मेहरुण तलाव, शिरागढ देवी संस्थान, उनपदेव,
बनवारी बाबा आश्रम, तरसोद गणपती मंदिर, पद्मालय गणपती मंदिर, सुकेश्वर महादेव मंदिर, चांगदेवमेहुण, शहादा प्रकाशा, चिरमाडे मळा, भोईटे मळा, दगडू काका मळा, बारी मळा, व शेवटी सांगता रेशिम बाग नागपुर येथे प.पू. डॉ. हेडगेवार समाधी स्थळ येथे झाली.
ह्या प्रसंगी वनवासी कल्याण आश्रम, विश्वहिंदू परिषद अयोध्या कारसेवा, ह्या उपक्रमांना गुरुगोविंद प्रभात शाखेतर्फे देणगी देण्यात आली.
१९७० सालीं झालेल्या जातीय दंगलीची झळ संपूर्ण जळगांव ने अनुभवली तत्कालीन त्यांचे मित्र पैगंबरवासी माजिद सालार व विनायकराव या दोघानी तसेच डॉ. सोनाळकर व कै. शंकरकाका पाटील असे चौघे जणांनी मिळून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.
१९७० च्या घटनेनंतर प्रकर्षाने सर्व समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आर्थिक नुकसान सामाजिक नुकसान भरपुर झाले. आपला समाज एकत्र यावा यासाठी त्यांनी शनिपेठेतील
घरोघरी जाऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला. १९७५ सालीं तत्कालीन सरकारने संघावर बंदी आणली बंदी काळात देखिल गुप्त पणे संघ शाखा भरविल्या.
१९९०,-सालीं शनिपेठ प्रभागाचा श्रीराम शिला पूजनाचा सामुहिक कार्यक्रम होता पोलीस प्रशासनाने मिरवणुकीला परवानगी नाकारली तेंव्हा सामुहिक रित्या भगवानश्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
१९९०/९१ साली भरपुर मोठया संख्येने कारसेवकांना घेऊन अयोध्या येथे रवाना झाले.
परंतु उत्तर प्रदेश सरकारने त्यांना ललीतपुर येथे अटक केली.
३० वर्षाच्या काळात त्यांनी अनेक स्वयंसेवक जोडले त्यांना टोपण नांवाने तात्या असे घरचीं मंडळी संबोधत त्यांच्या कुटुंबात पत्नी विद्याताई मोठा मुलगा प्रकाश, लहान मुलगा विकास, व मुलगी भारती तसेच नातु हर्षल , वैभव ,प्रतिक व नात तेजश्रीआहेंत.
पैकी प्रकाश हा संघदृष्ट्या प्रथम वर्ष शिक्षित असून विक्रमादित्य सायं शाखेत कार्यवाह होता.
मोठा नातू हर्षल हा श्रीरामनगर प्रभाग समिती चा बौध्दिक प्रमुख होता. तसेच संघाने स्थापन केलेल्या आधुनिक जिम चा प्रशिक्षक होता. तो जळगांव जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षा वर्गात सहभागी होता.
संपुर्ण कुटुंब व्यवस्था सांभाळून संघकार्य करणाऱ्या सुना देखील आहेत . मोठी सुन सौ. नंदा ही राष्ट्र सेविका समितीची स्वयंसेवक आहे धाकटी सुन सौ. वृषाली ही संस्कार भारती च्या उपक्रमांशी जोडली गेली आहे. त्यांचे पुतणे महेश व दिनेश हे देखील संघ परिवाराशी निगडीत होते पैकी दिनेश दंडवते हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पूर्ण वेळ प्रचारक जालना येथे होता. तसेच १९९१ साली अयोध्या येथे झालेल्या कारसेवेच्या कार्यक्रमात सहभागी होता.
कै. विनायकराव यांचे एक भाऊ कै. शामराव दंडवते हे आजन्म भारतीय मजदूर संघाचे पुणे शाखेचे सरचिटणीस होते .त्यानीं पुर्णवेळ भा. म.संघाला समर्पित केला.
कै. विनायकराव नेहमी पांढरा शुभ्र पायजमा व पांढराशर्ट परिधान करत कुठल्याही सन्माना पासून ते अलिप्त होते. कुठल्याही कार्यात मग ते घरगुती लग्न समारोह असो वा सामाजिक उत्सव
डोक्यावर संघाची काळी टोपी परिधान केलेली असायचीच. अश्या दोन वेगवेगळ्या समारंभाचे फोटो पाठवले आहे.
अश्या या दंडवते कुटुंबावर दिनांक
२१/३/१९९३रोजी नियतीने घाला घातला
हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांना दवाखान्यात ऍडमिट करावे लागले.
परंतु दिनांक २२/३/१९९३ ला सकाळी ११,वाजता त्यांची प्राण ज्योत अनंतात विलिन झाली. हया दुःखाच्या कटुप्रसंगी संपूर्ण जळगांव शहरातील संघ परिवार त्यांच्या कुटूंबाच्या पाठिशी उभा राहिला. संपूर्ण दंडवते कुटुंबीय रा. स्व. संघाचा सदैव ऋणी राहील.
अश्या ह्या थोर संघ स्वयंसेवकाला विनम्र आदरांजली--
--------------आपले दंडवते कुटुंबीय----------
@ प्रकाश विनायकराव दंडवते
( 9405790388 )
0 टिप्पण्या