@रवींद्र गणेश सासमकर
१५ ऑगस्ट १९४७..! भारताच्या स्वातंत्र्याची ती पहाट खरोखर रम्य होती का? भारताच्या मध्यभागातील सर्वात मोठा प्रदेश 'हैदराबाद संस्थान' पारतंत्र्याच्या अंधकारात होते. येथील निजामशाही जनतेवर अत्याचार करत होती… जनता कसली? हिंदू समाज म्हंटले तरी हरकत नाही. भारताच्या उदरात हैदराबाद नामक इस्लामीक राष्ट्र निर्माण करण्यासाठी निजाम उतावीळ झाला होता.
हैदराबादचा शेवटचा निजाम होता मीर उस्मान अली खाँ. दुसऱ्या महायुध्दानंतर ब्रिटीश साम्राज्य दुर्बल झाले होते. देशांर्तगत सैन्याची बंडखोरी, जागतिक वातावरण, क्रांतिकारी चळवळींमुळे इंग्रजांना भारतात आपले राज्य टिकवणे अशक्य वाटू लागले होते. भारताची फाळणी करण्याचे आणि संस्थानांना स्वातंत्र्य बहाल करण्याचे इंग्रजी धोरण पाहून शेवटचा निजाम उस्मान अलीला दक्षिणेत स्वतंत्र इस्लामिक राज्यनिर्मितीची स्वप्ने पडू लागली होती. पण शेवटी १३ महिन्याच्या झुंजार लढ्यानंतर दि. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादवर तिरंगा फडकला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपला मराठवाडा एक वर्ष, एक महिना आणि एक दिवसांनी स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही, त्यासाठी असंख्य लोकांनी लढा देत आपल्या प्राणांची आहूती दिली. या लढ्याचा इतिहास अतिशय रोमहर्षक आहे. या लढ्यामध्ये धर्मांध निजामाच्या विरुद्ध प्रतिकार करताना आघाडीवर असलेली संघटना म्हणजे 'आर्य समाज'!
'आर्यसमाज'ची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी १० एप्रिल १८७५ रोजी मुंबईत केली होती.
भारताला पुन्हा वैदिक मार्गावर नेणे व सर्व जगाला वैदिक धर्म शिकविणे ही आर्यसमाजाने आपली परमश्रेष्ठ कर्तव्ये ठरविली व वेदांच्या उद्धाराचे व प्रचाराचे कार्य चालू केले. स्वामी दयानंदांनी "सत्यार्थप्रकाश" ग्रंथ लिहिला. आर्यसमाजात हा ग्रंथ प्रमाण मानला जातो. हिंदु समाजातील जातीभेद, अस्पृश्यता व अन्य अनिष्ट रूढी परंपरा नष्ट व्हाव्यात, यासाठी आर्य समाजाने मोठे योगदान दिले. बाटवून मुसलमान केलेल्या हिंदुना पुन्हा हिंदु करुन घेण्यात आर्यसमाजाचे मोठे योगदान आहे. कोल्हापूरचे राजर्षी शाहूमहाराज यांच्यावरही आर्यसमाजाचा मोठा प्रभाव होता.
निजामाने 'इत्तेहादूल मुसलमीन', 'खाकसार' आणि 'रझाकार' या संघटना निर्माण करुन हिंदूंवर अत्याचाराचे धोरण आरंभिले होते. भारत स्वतंत्र होताना येथील हिंदू आपल्या इस्लामिक राष्ट्राला मान्यता देणार नाहीत व भारतासोबत जाण्यासाठी दबाव आणतील तेव्हा त्यांना दडपण्यासाठी निजामाने अश्या दहशतवादी संघटनांना पाळून ठेवले होते. बहादूर यार जंगने हिंदुना बाटवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्याकाळी अनेक मातब्बर घराण्यांना मुसलमान करण्यात आले व ज्यांनी विरोध केला, त्यांचे शिरकाण करण्यात आले. गरिब जनतेलाही "हाणून मारुन मुसलमान" केले जात होते. हिंदुना कोणी वाली उरला नव्हता,अशा परिस्थितीत १९२५ साली आर्यसमाजने आर्यप्रतिनिधी सभा स्थापन करुन हिंदुवरील अन्यायनिवारणाचा प्रयत्न सुरु केला. त्यात चंदुलाल कोरटकर पिता-पुत्र, भाई बन्सीलालजी आणि हुतात्मा श्यामभाई पंडित नरेंद्रजी, व्यास बन्सीलालजी आदी अग्रेसर होते.
दुसऱ्या महायुध्दानंतर ब्रिटीश सत्ता दुर्बल झाली. भारताची फाळणी व संस्थानांना स्वायत्तता देण्याचे धोरण पाहून शेवटचा निजाम उस्मान अलीला दक्षिणेत स्वतंत्र राज्य उभे करण्याचे स्वप्न पडू लागले. त्यामुळे निजामाने सर्व प्रकारच्या प्रबोधनात्मक उपक्रमांवर बंदी घातली. धार्मिक विधी, होमहवन, यज्ञयाग आणि हिंदू उत्सव साजरे करण्यावर बंदी घातली. त्यामुळे आर्यसमाजने सत्याग्रही टोळ्या हैदराबादला पाठवल्या. या सत्याग्रहात देशभरातुन सत्याग्रही सहभागी झाले. या सत्याग्रहींनी निजामाचे तुरुंग भरुन गेले. या त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. शेकडो सत्याग्रही मारले गेले, काहींना अपंगत्व आले,पण सत्याग्रही वाढतच गेले. शेवटी निजामाने सर्व अटी मान्य करत बंदी उठवली.
आर्यसमाजचे हैदराबाद संस्थानात ४० हजारहून अधिक अनुयायी होते. हैदराबाद, कर्नाटक आणि तेलंगणाच्या तुलनेत मराठवाड्यात आर्यसमाजाचे कार्य अधिक होते. वैदीक संस्कार, सामाजिक सुधारणांचा आग्रह आणि आंतरजातीय विवाहांना आर्यसमाजाने प्रोत्साहन दिले होते. तालुक्याचा आर्यसमाज क्रांतीकार्याचे मुख्य केंद्र असे. प्रत्येक आर्यसमाजात व्यायामशाळा, पाठशाळा, साप्ताहीक सत्संग, वाचनालय असे. त्यामुळे नवीन पिढीला व्यक्तीगत व सामाजिक उन्नतीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळत असे.
निजामाने जनतेवर अत्याचार करण्यासाठी इत्तेहादुल मुसलमीन या संघटनेचा वापर केला. या संघटनेची स्थापना १९२८ साली हैदराबाद (भाग्यनगर) येथे झाली. ही संघटना अतिशय जहाल आणि विषारी होती. लातूरच्या कासीम रझवीचा या संघटनेशी संपर्क आला. कासीम रझवी मूळ उत्तरप्रदेशातील अलिगढचा होता. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून त्याने कायद्याची पदवी घेतली होती. लातुरमध्ये तो वकीली व्यवसाय करत असे. इत्तेहादुल मुसलमीन चे नेतृत्व त्याच्याकडे आल्याने त्याने इस्लामच्या आक्रमण आणि अत्याचाराची परंपरा पुढे चालवली. कासीम रझवीने इत्तेहादुल मुसलमीनचा प्रमुख झाल्यानंतर रझाकार संघटना उभी केली. त्यांना सैनिकी प्रशिक्षण देऊन व दारुगोळा पुरवून हिंदुवर अत्याचार करायला सुरुवात केली. हिंदु मुलींना पळवणे व त्यांच्यावर बलात्कार करणे, हत्या करणे अशी रझाकारांच्या अत्याचाराची उदाहरणे सांगता येतील. आर्यसमाजाने या अन्यायाचा प्रतिकार केला.
आर्य समाजाने मराठवाडा मुक्तीलढ्यात सत्याग्रह तर केलाच, पण त्याग आणि बलिदानाचेही उदाहरण प्रस्तुत केले. ईट (ता.भूम जि.धाराशिव) येथील आर्य समाजाचे कार्यकर्ते किसनराव टेके यांची रझाकारांनी हत्या केली. त्यांची पत्नी गोदावरीबाई टेके यांनी बंदुकीच्या गोळीने एका रझाकाराला ठार मारले, मात्र क्रूर रझाकारांनी घराला आग लावली, त्यातच गोदावरीबाईंचा मृत्यू झाला.
धाराशिव जिल्ह्यातील गुंजोटी या गावी आर्यसमाजाचे कार्यकर्ते वेदप्रकाश यांचा छोटेखान पठाणने दिवसाढवळ्या खून केला. वेदप्रकाश यांच्यासमोर दोनच पर्याय ठेवण्यात आले होते एकतर 'इस्लाम कबुल करावा' अथवा 'मृत्यू पत्करावा'..! वेदप्रकाश यांनी मृत्यू स्वीकारला पण धर्म बदलला नाही ..! अशा बलिदानांच्या समिधांनी मराठवाडा मुक्तीलढ्याचे यज्ञकुंड धगधगत राहिले.
या सर्व लढ्याचा परिणाम म्हणून हळूहळू ही लोकचळवळ होत गेली आणि त्याचा परिणाम म्हणून भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखेर निजामाविरुध्द पोलीस ऍक्शन घोषित केली. १३ सप्टेंबर १९४८ रोजी सकाळी ४.०० वाजता सुरु झालेली ही कारवाई दि. १७ सप्टेंबर १९४८ रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपली. १०९ तासाच्या या कारवाईनंतर हैदराबादवर तिरंगा फडकला. या अवधीत निजामचे सैनिक व रझाकार मिळून १२०० लोकांना यमसदनास पाठविण्यात आले. लातूर येथील कुविख्यात रझाकार घंटे याने अनेक माता भगिनींची अब्रु लुटली होती, अत्याचार केले होते, त्याला मुसक्या आवळून बार्शी रोडला आणून रणगाड्याखाली चिरडून मारले. अनेक माता भगिनीचे वस्त्रहरण आणि अत्याचार करणाऱ्या घंटेसारख्यांच्या रक्ताने चित्कार करणाऱ्या असंख्य माता -भगिनींचा आत्मा शांत झाला.
अशाप्रकारे आपला मराठवाडा स्वतंत्र झाला. आपल्या देशाचा इतिहास पराजयाचा नाही, तर अनवरत संघर्षाचा आहे. हा संदेशच या लढ्याने दिला. या लढ्यात आर्यसमाजाचे मोलाचे योगदान होते. त्याबाबत आपल्या मनात कृतज्ञभाव असला पाहिजे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आमची अवस्था काश्मीरसारखी झाली नाही.
आर्यसमाजाच्या सर्व स्वातंत्र्यसेनानी आणि बलिदानी वीरांना विनम्र अभिवादन!!
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या