@सुधीर (आबासाहेब) देशपांडे
हैदराबाद मुक्ती लढा हा अखंड भारताच्या दृष्टीने भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे. हैदराबादचा निजाम हा हैदराबाद संस्थानला स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र करण्याच्या तयारीत होता. त्यासाठी पाकिस्तान व संयुक्त राष्ट्राचीही त्याने मदत घेतली होती. परंतु तत्कालीन भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल व संस्थानातील प्रमुख नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या दूरदृष्टी व मुत्सद्दीपणामुळे निजामाचे स्वप्न धुळीत मिसळले गेले.
हैदराबाद इतक्या सहजासहजी मुक्त झालेले नाही. हैदराबाद संस्थानात आजचे तेलंगणा, कर्नाटक व महाराष्ट्रातील संपूर्ण मराठवाडा इतका भाग जोडलेला होता. या तिन्ही भागातील लक्षावधी स्वातंत्र्य सैनिकांनी अनेक हाल अपेष्टा सहन करत व राजकारांच्या क्रूर दहशतीला हजारो वीरांनी हौतात्म्य पत्करत हा लढा यशस्वी झाला आहे. या लढ्यात ज्याप्रमाणे तरुण, प्रौढ वीरांनी बलिदान दिले तसेच कित्येक महिला वीरांगनांनीही आपले बलिदान दिले आहे. काही स्मृती इतिहासाच्या पानावर विराजित झाल्या तर कित्येक स्मृती वेळेबरोबर हवेत विरून गेल्या.
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील 'ईट' या गावी किसनराव टेके हे आर्य समाजाचे सुप्रसिद्ध कार्यकर्ते होते. त्यांचा वीस वर्षाचा तरुण मुलगा माधवराव हा सरहद्दीवरील कॅम्पवर होता व स्वातंत्र्यासाठी लढत होता. गफलतीने किसनराव अचानक रझाकारांच्या ताब्यात सापडले. तेव्हा धर्मांध रझाकारांनी त्यांना ठार मारले व त्यांच्या घरावर हल्ला केला. तेव्हा त्यांची पत्नी गोदावरीबाई ही घरी एकटीच होती.
घरातील कर्त्या पुरुषाच्या हत्येनंतर घराची लूट करायला आणि महिलांवर हात टाकायला रझाकार गुंड विसरत नसत. गोदावरीबाई टेके ही बहादूर होती. ती डगमगली नाही. तिने घरावर चालून आलेल्या एका रोहिल्याला बंदुकीच्या गोळीने टिपून ठार मारले. त्यामुळे रझाकारांनी चिडून जाऊन त्यांच्या घराला आग लावून दिली. त्या आगीत गोदावरीबाई टेके या मरण पावल्या व हुतात्मा झाल्या. आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला उजाळा देऊन 'मराठवाडा मुक्तिसंग्राम'चे महत्व समजून घेऊयात. हजारो वीर महिला पुरुषांनी भारताच्या अखंडतेसाठी हैदराबाद संस्थान धर्मांध निजामाच्या तावडीतून मुक्त केले आहे.
हैदराबाद मुक्ती लढ्यातील समस्त हुतात्मा वीरांना विनम्र अभिवादन..
संदर्भ :
१. प्रसिद्ध साहित्यिक नरहर कुरुंदकर यांचे "हैदराबाद विमोचन आणि विसर्जन" या पुस्तकाचे पृष्ठ क्रमांक ७ व ८
२. प्रख्यात स्वातंत्र्य सैनिक अनंतराव भालेराव यांचे "हैदराबाद स्वातंत्र्यसंग्राम व मराठवाडा"
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या