@ चंद्रकांत जोशी सनपूरकर
१५ ऑगस्ट १९४७ इंग्रजी सत्तेचा निरंकुश जाचातून भारतीय जनता मुक्त झाली. परकीय शक्तीच्या जुलमी राजवटीत भरडल्या गेलेल्या भारतीयभारतीय जनतेने मुक्ततेचा श्वास घेतला. अनेक नरविरांच्या प्राणाची बाजी लावून स्वातंत्र्याच मोल चुकवाव लागलं.
'तेरी प्रतिमा अमर रहे मां |
हम दिन चार रहे ना रहे"
या भारलेल्या मंत्रान मातृभूमीच्या चरण कमलावर आपले जीवनपुष्प अर्पण करून हजारो तरुणांनी हौतात्म्य पत्करलं. इंग्रजांच्या कुटील नीतीने जाता जाता भारतमातेच्या पाठीत खंजीर खुपसला. जातीयतेला जरी यश आले भंगाया बंगाल, करावया पंजाब द्विखंडित हाय रक्तबंबाळ! "मातृभूमी द्विखंडीत झाली, देशाची फाळणी झाली, पाकिस्तान ची निर्मिती झाली. पाकिस्तान ची निर्मित हा या देशाला लागलेले कर्करोग आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण स्वतंत्र भारतात विलीन न होता स्वायत्त स्वतंत्र सर्वोभौम सत्ता म्हणून आपल स्थान अबाधित ठेवण्याचा देशातील अनेक संस्थानाचा प्रयत्न होता. भारताचे तत्कालीन गृहमंत्री भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखर नेतृत्वाखाली या संस्थानांना भारतात सामिल करून घेण्याचे प्रयत्न झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ५६५ लहान मोठी संस्थाने होती. त्यापैकी ५६२ संस्थानांनी स्वतंत्र भारतात विलीनीकरण स्विकारले. परंतु जुनागड, काश्मीर, आणि हैदराबाद या संस्थांनी भारतात शामिल होण्याचे नाकारले व स्वतंत्र राहण्याचा मनसुबा जाहीर केला.
तत्कालीन हैदराबाद संस्थान हे तीन भाषिक विभागाचे होते. तेलगू भाषिकांचा तेलंगण प्रांत, मराठी भाषिकांचा मराठवाडा व कानडी भाषिकांचा कर्नाटक विभाग! मराठवाड्यातील नांदेड, परभणी, औरंगाबाद व धाराशिव या जिल्ह्यांचा हैदराबाद संस्थानात समावेश होता. हैदराबादचा निजाम हा मुस्लिम होता आणि संस्थानातील वीस टक्के मुस्लिम जनतेपैकी बहुतांश समाज हा निजामाच्या पाठीशी होता. हैदराबाद मधील "इत्तेहादुल मुसलमीन" ही संस्था सुरुवातीला मुसलमानांच्या सांस्कृतिक उन्नतीसाठी स्थापन झाली होती, परंतु नंतर या संघटनेला राजकीय स्वरूप देण्यात आले. या संघटनेचे अध्यक्ष बहादूर यार जंग यांनी "अनिल मलिक" म्हणजे "मी राजा आहे" अशी घोषणा देऊन निजामाच्या मागे मुस्लिमांची शक्ती उभी केली. मुस्लिम समाजात आपण राजे आहोत ही आत्मप्रौढी निर्माण करण्यात "इत्तेहादुल मुसलमीन" ही संघटना यशस्वी झाली. आपण राज्यकर्ते आहोत या आवेशात मुस्लिम समाज बेफामपणे वागू लागला. निजामाच्या राज्यात धर्मवेडेपणा व औरंगजेबाचा पाशवी क्रूरपणा निर्माण झाला.
हिंदूंच्या धार्मिक आचरणामध्ये, सामाजिक व धार्मिक रूढी परंपरांमध्ये व त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याला व हक्काला बाधा आणणारे अनेक कायदे व हुकूमनामे प्रसारित झाले. प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये मुस्लिम लोकांच्या व कट्टरपंथीयांचा भरणा करण्यात आला. या जिल्ह्यातील हिंदू जनता धर्मांध निजामाच्या राजवटीत सर्व बाजूंनी जागवली जात होती. खंडणी व शेतसाऱ्यासाठी जुलूम जबरदस्ती होत होती. गरीब शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली केली जात होती. त्यांना मारहाण होत असे. स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले होते. लातूरच्या कासीम रझवी नावाच्या वकीलाने निजाम सरकारच्या बरोबरीने स्वतःचे अधिपत्य निर्माण केले होते. त्याने धर्मांध अश्या सशस्त्र रझाकाराची फौज निर्माण केली. या रझाकाराने दीन दीन अश्या घोषणा देत हिंदूंच्या घरादारावर हल्ला करावा घरातील दागदागिने, पैसाअडका, धान्य याची लुट करावी. या लुटीतून स्त्रिया ही सुटल्या नाही.
रझाकाराच्या ह्या अत्याचाराला निजामी सैन्याची फुस होती. निजामी सैन्य व पोलीस रझकाराला संरक्षण देत. त्यांच्या संरक्षणाखाली रझाकाराने मराठवाड्यात नंगानाच चालविला होता. न्याय, सुरक्षा या गोष्टीला जनता दुरापास्त झाली होती. न्याय मागायचा कोणाकडे ? संरक्षण मागावे कोणाचे ? जनता हवालदिल झाली होती. केवळ मुकाटपणे अन्याय अत्याचार सहन करणे, नसता मरणयातना भोगत स्वर्गवास पत्करणे एवढेच सामान्य हिंदूंच्या हाथी होते.
निजाम सरकारची राज भाषा उर्दू होती सर्व जनतेने आपले व्यवहार उर्दुतून करावे अशी सक्ती होती. शिक्षणाची दारे उर्दूच्या दरबारात उघडत. याही परिस्थितीत मराठवाड्यातील अनेक हिंदूंनी हैदराबादला ला जाऊन चिकाटीने शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्रात इस्लामी राजवटीचा उर्दुच्या माध्यमातून हैदोस चालला होता. त्याचवेळी हिंदूंच्या सांस्कृतिक जीवनावर इस्लामी दहशतवादाचे आक्रमण सुरू झाले. हिंदूंना आपले सण व उत्सव चोरून लपून दहशतीखाली साजरे करावे लागत. निजाम सरकार, इत्तेहादुल मुस्लिम आणि रझाकार यांच्या अमानुष, अन्याय अत्याचारास मराठवाड्यातील हिंदू जनतेचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक शोषण होत होते. हिंदूंवर दिवसाढवळ्या हल्ले होत. विरोध करणाऱ्याचा कत्तली केल्या जात असत. गावेच्या गावे लुटली जात. लोक भीतीने रानोमाळ पळत. १९३६ ते १९४८ या काळात अन्यायाचे परिसीमा झाली होती.
अन्यायाला ही सीमा असते अत्याचाराच्या अग्नीतून निजाम सरकार व रझाकार यांच्याविरूद्ध लढणारे स्फुल्लिंग पेटले. धर्म, समाज व महाराष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी एक जबरदस्त स्वातंत्र्य चळवळ मराठवाड्यात उभी राहिली. स्टेट काँग्रेस, आर्यसमाज, हिंदु महासभा यांच्या व्यासपीठावर देशभक्त संघटित झाले. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंद्भाई श्रॉफ, देवीसिंग चव्हाण, वीर वसंतराव जोशी, पुरुषोत्तम चपळगावकर, मुकुंदराव पेडगावकर, श्रीनिवासराव बोरीकर, श्यामराव बोधनकर, भगवानराव गांजवे, राधवेंद्र दिवाण, भाई शामलाल, आ. कृ. वाघमारे, रामलिंग स्वामी, स. कृ. वैशंपायन, मौलाना सिराजुल हसन तिरमिजी, बहिर्जी शिंदे, शेषराव वाघमारे या बहादूर नरविरांनी स्वातंत्र्य लढ्याचे धुरीणत्व पत्करले. मराठवाड्यातील निरनिराळ्या जिल्ह्यात स्टेट काँग्रेसच्या शाखा सुरू करण्यात आल्या. हजारो सभासदांची नोंदणी झाली.
निजामाने स्वतंत्र भारतात सामील व्हावे या मागणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू झाला. सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, असहकार या मार्गाने लढायला सुरुवात झाली. पण हा मार्ग पुरेसा नव्हता म्हणून रझाकार याच्याविरुद्ध सशस्त्र लढा देण्याची तयारी करण्यात आली. मनमाड, सोलापूर, नगर, वाशिम, उमरखेड येथे सशस्त्र केंद्र उघडण्यात आली. या केंद्राचे प्रमुख म्हणून श्रीनिवासराव बोरीकर, फुलचंद गांधी, माणिकचंद पहाडे, रतनलाल कोटेचा, विनायकराव चारठाणकर व भगवानराव गांजवे यांची निवड करण्यात आली. केंद्रावर सशस्त्र लढ्याचे प्रशिक्षण देण्यात आले सैनिकांच्या मार्फत निजामी हद्दीतील पोलीस ठाण्यांवर हल्ले करणे, निजामी सत्ता झुगारून गावे स्वतंत्र करणे, गावा-गावात संरक्षण दल उभारणे, यासारखे कार्यक्रम राबविले जाऊ लागले.
१९४८ च्या सुमारास निजाम व रझाकाराच्य अत्याचाराचा कळस झाला. अनेक ठिकाणी जातीय दंगली घडवून आणल्या गेल्या हिंदूंवर सशस्त्र हल्ले झाले. या जात्यंध व धर्मांध कारवायांना खेड्यापाड्यातून प्रखर प्रतिकार झाला. त्यात अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले. त्यावेळी एकट्या परभणी जिल्ह्यात ५२-५३ जण हुतात्मा झाले.
दहेगाव ला खारकर बंधूचे घर लुटून त्यांना ठार मारण्यात आले. सेलू येथे उत्तमचंद यांचा खून करण्यात आला. रझाकारांनी पांगरी शिंदे यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्याचा प्रतिकार करताना पांडू जी पाचपुते, बाबाराव शिंदे शंकरलाल व मोहनलाल हे वीर हुतात्मा झाले. विनायकराव सिताराम कुलकर्णी त्यांना ठार मारण्यात आले. चिकलठाणा येथे दत्तात्रेय बुवा फाटे यांचा खून करण्यात आला. औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीच्या यात्रेत रझाकारांनी बॉम्ब स्फोट केला. त्यात रामभाऊ पाठक, गणपतराव ऋषी व रंगनाथ संतुकराव सुरडकर हे ठार झाले. कळमनुरी तालुक्यातील वाकोडी या गावावर दोन वेळा हल्ला केला त्यात राजेश्वरराव वकोटीकर, गणपत राघोजी, गोविंदा विठोबा सुतार, जीवनाजी साखरे, व नारायण जयराम यांना गोळ्या घालून आल्या जिंतूर तालुक्यातील वस्सा या गावी खान आलम नावाच्या गुंडाने सुतार यांचा शिरच्छेद केला तर विश्वनाथ देशपांडे यांना गोळी घालून ठार केले.
उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातही रझाकारांनी धुमाकूळ घातला होता. निजामी पोलिसांच्या बरोबरीने रझाकारांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. किल्लारीच्या माधवराव बिरादार, यादवराव पाटील, राम भोसले, महादप्पा दलाल यांनी लातूरच्या टॉवरवर तिरंगा फडकविला म्हणून त्यांना गोळ्या घालून मारले. आळंगा येथे शंकर मुगळे, हंदराळ ला गोपाळराव मुगळीकर, गोविंदराव देशमुख यांना रझाकारांनी मारले. हनुमंत बिराजदार यांना जिवंत जाळले, तर आप्पाराव बिराजदार यांना नळदुर्ग येथे मारहाण करून ठार मारले. रझाकारांनी कौलखेड वर हल्ला केला. जिथे महालिंगअप्पा व व विश्वनाथ या मुलांना एकत्र बांधून गोळ्या घातल्या. रझाकारांनी तोंडचीरवर हल्ला करून हनुमंत आग्रे व देवराव या दोन तरुणांना गोळ्या घातल्या. कुमदाळ येथे मुक्ती सैनिकांनी रझाकराची कत्तल केली. कौळखेड रामघाट व तोंडचिरच्या बहाद्दर स्वातंत्र्य सैनिकांनी गनिमी काव्याने रझाकारांशी लढा दिला व त्यांना पिटाळून लावले. अत्याचार करणाऱ्या गुंडांना रामकृष्ण मोरे, दत्तगिर यशवंत वायगावकर यांनी ठार केले. या चकमकीत तोंडचीरच्या करबस्वा चिल्लरगे व डॉ.चंन्प्पा यांना विरगती प्राप्त झाली. मेह्कर येथे प्राप्त झालेल्या चकमकीत मुक्ती सैनिक यशवंत वायकर ठार झाले. शंभू उंबर्ग्याजवळच्या महादेव वाडीवर रझाकरांनी रात्रीच्या वेळी हल्ला केला. महादेववाडीच्या नागरिकांनी माडवदावर साठवून ठेवलेल्या दागडांचा मारा करुन हल्ले खोरांना पिटाळुन लावले. सौ तनाबाई माधवराव सुळे ह्या बहाद्दूर महिलेने दगडाच्या मारयाने एका रझाकारांचा बळी घेतला. त्याची ओळख पटु नये म्हणून त्याच्या साथीदारांनी त्याचे मुंडके छाटून नेले. ही घटना प्रत्यक्ष तानाबाई यांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी ऐकवली. नेत्रगावच्या केशवराव पाटलांनी निजाम सरकार तर्फे शेतसारा वसुल करण्याचे नाकारले. निजामांने त्यांना दिसेल तेथे गोळी घालण्याचे पोलिसांना आदेश दिले. त्यांची पाटीलकी जप्त करून पैश्याच्या स्वरुपात दंड आकारला.
नांदेड जवळच्या पार्डी येथे मोतेजी मल्हारी, चंपती दत्तोजी, लक्ष्मण भुजा व किसन दगडू या मुक्ती सैनिकांना निजामी सैन्याने गोळया घालुन मारले. बामणी या गावी विठ्ठलराव देशपांडे, रामकृष्ण जोशी यांना कडब्याच्या गंजीत जाळून मारले. चित्रागीरी तांडा, सिंदगी तांडा, व रामेश्वर तांडयावर चंदू नाईक, लालासिंग लमाण, लखमा नाईक व आनंदा राठोड हे रझाकाराशी झालेल्या चकमकीत ठार झाले. येहळेगाव ( तुकाराम ) येथील नाना पाटील, मोतीराम जाधव, उमाजी वानखेडे, यांना रझाकारांनी तलवारीने कापुन काढले. कल्हाळी सावरगाव, कुंडलवाडी, अर्जापूर, इस्लापूर, नांदेड, उमरी, टेळकी,शेर्ली, निवघा, पाटणूर या ठिकाणी रझाकार निजामी सैनिक व पोलीस यांच्याशी झालेल्या चकमकीत शेकडो मुक्ती सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले. शासन दरबारी नोंद नसलेल्या अनेक अनाम वीरांनी अनेक ठीकाणी निजामाच्या जुलमी राजवटीविरुध्द स्वातंत्र्य युध्द पुकारले व त्यात ते शहीद झाले.
या स्वातंत्र्य लढयात महिलांचे योगदानही फार मोठे होते. परागंदा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे संसार कुशलतेने व धैर्याने सांभाळत अन्याय व अत्याचाराचा प्रतिकार करीत या वीर महिलांनी स्वातंत्र्यासाठी आपले योगदान दिले. मुक्ती सैनिकांना आश्रय देणे, रानावनात आश्रयाला असलेल्या मुक्ती सैनिकांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करणे, संदेश वहन करणे प्रत्यक्ष सत्याग्रहात भाग घेणे अशी अनेक कामे महिलांनी केली.
मराठवाडयात निजाम सरकार व त्यांच्या हस्तकांचे अत्याचार वाढत असतांना देशपातळीवर हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन करुन घेण्याचे मराठवाडयात निजाम सरकार व त्यांच्या हस्तकांचे प्रयत्न चालू होते. सरदार वल्लभभाई पटेलांनी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आखला होता. निजामाशी केलेल्या वाटाघाटी निष्फळ झाल्या होत्या. उलट निजामाने १६ जून १९४७ व २७ ऑगस्ट १९४७ या दिवशी दोन फर्माने काढून हैदराबाद हे स्वतंत्र व सार्वभौम राज्य असल्याचे घोषित केले. फौजेची जमवाजमव केली. सैन्यात कडव्या मुस्लिमांची भरती केली. रझाकाराच्या माध्यमातून हिंदु प्रजेवर अनन्वीत अत्याचार सुरु केले. शेवटी सरदार वल्लभभाई पटेलांना प्रत्यक्ष सैनिक कार्यवाही करावी लागली. १३ सप्टेंबर १९४८ रोजी जन. जे. एन. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र भारतीय फौजा सोलापूर, औरंगाबाद, वाशिम, हिंगोली, लातूर, कर्नुल, गदग, रामपूर, या मार्गे हैदराबाद संस्थानात घुसल्या. मराठवाडा मुक्ती सेनेने व समस्त जनतेने लष्कराचे सहर्ष स्वागत केले. अनेक ठिकाणी निजाम सरकारच्या सैन्याने व धर्माध रझाकारांनी भारतीय सैन्याचा प्रतिकार करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने जुलमी रझाकार व निजाम सरकारच्या सैन्याचा निःपात करीत १७ सप्टेंबर रोजी हैदराबादवर चाल केली. मग मात्र निजामाने भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करली. सरदार पटेलांच्या मार्गदर्शनाखाली मेजर जनरल जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष कारवाई करुन भारतीय सैन्याने निजामाचा पाडाव केला व मराठवाडा निजामाच्या गुलामगीरीतून मुक्त होऊन भारत देश खऱ्या अर्थाने १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वतंत्र झाला.
हा मुक्तीसंग्राम सर्वकश व सर्वव्यापी होता. सर्व स्तरातील सर्व जातीपंथातील राष्ट्रभक्तांनी एकसंघपणे स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले. त्यात सामान्य शेतकरी होते. शाळा शिक्षक होते. पत्रकार होते, महीला होत्या, विद्यार्थ्याचाही सहभाग होता. कै. अनंत भालेराव यांनी त्यांच्या पुस्तकात शंभराहून अधिक हुतात्म्यांची यादी प्रकाशित केली आहे. त्यात मराठा, बाम्हण, माळी-माळी सोनार, लोहार, कोमटी,न्हावी, सीकेपी, कुंभार मारवाडी, लमान, रजपूत आणि दलीत जातीतील हुतात्म्याचा समावेश दिसुन येतो.
मुकुंदराव पेडगावकर, आ.कृ.वाघमारे, शामराव बोधनकर, अच्युतराव देशपांडे, गोपाळशास्त्री देव, पं.नरेंद्रजी, अनंत भालेराव, विनायकराव चारठाणकर, दीपाजी पाटील, उध्दवराव पाटील, देवीसिंग चौहान, कॉ. व्ही.डी. देशपांडे, कॉ. चंद्गुप्त चौधरी, अण्णासाहेब गव्हाणे, कॅप्टन जोशी, श्रीराम भांगडिया, पुरुषोत्तम चपळगावकर, माणिकचंद पहाडे, काशीनाथ चिंचाळकर, शंकरराव चव्हाण, साहेबराव बारडकर, विजयेंद्र काबरा, देवराव कांबळे, श्रीनिवासराव बोरीकर, विठ्ठलराव चिंचोलीकर, के. नागापूरकर, बी.एस. मोरे, हरिहरराव सोनूले, रामराव आवरगावकर, चंद्रशेखर वाजपेयी, रामभाऊ वाकडे, किशनसिंग रजपुत, गोविंदराव पानसरे, जयवंतराव पाटील, शंकरराव जाधव, श्रीधर वर्क, वसमत राक्षसभूवनकर, जानकीलाल राठी, बहिर्जी, जनार्दन मामा या स्वातंत्र्य योद्धे यांची कोणती जात होती? मराठवाडयाच्या जनतेवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आपल्या सर्वस्वाची आहूती देणा-या या नेतृत्वाला तसेच तळागाळातील सर्वसामान्य स्वातंत्र्यविरांना ना कोणी जात विचारली ना त्यांनी आपल्या जातीय अस्मिता पणाला लावली. मराठवाड्यातील जनतेची अन्याय राजवटीतून मुक्तता करणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते व स्वातंत्र्यवीर हीच त्यांची जात होती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या देशातील जनतेच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवण्याऐवजी जातीय अभिनिवेश तीव्र करणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांच्या डोळ्यात हा लढा म्हणजे झणझणीत अंजन आहे.
हैद्राबादच्या निजामाविरुध्दचा लढा धर्माध जातीयता विरुद्ध लढलेला लढा होता. हा लढा एखाद्या धर्माविरुध्द नव्हता. स्वातंत्र्य, समता, बंधूत्व यांच्या चिंधडया उडवून नंगानाच घालणाऱ्या दमननिती विरुध्दचा हा लढा होता. हा लढा सामाजिक व सांस्कृतिक लढा होता. आसेतु हिमाचल पसरलेल्या विशाल हिंदुस्थानच्या अखंडतेसाठी लढलेला हा लढा होता. मातृभूमीचे तुकडे करु पाहणाऱ्या फुटीरतावादी राजनितीविरुध्दचा हा लढा होता. इथे पंथ उपपंथ भाषा न ठावी, जनांसाठी संग्रामे चालवावी या उदात्त हेतूने सर्व जातीपातीची बंधने झुगारुन देऊन एकसंघ भारतीय समाजाचा हा लढा होता. शहरी-ग्रामिण, सुशिक्षित-अशिक्षित असा भेद नव्हता. अंत करणात प्रखर राष्ट्रभक्ती मशाल पेटवून जातीभेदांना तिलांजली देऊन एकात्म समाजाने सार्वभौम प्रजासत्ताक एकसंघ भारतासाठी लढलेला हा लढा होता.
निजाम सरकारच्या पाडावाने अत्याचाराचे अन्यायाचे एक पर्व संपले होते. मराठवाडयाच्या जनतेसाठी स्वातंत्र्याची पहाट उगवली. त्या दिवशी पूर्व क्षितीजावर झालेल्या सूर्योदयाला लाल रंगाची छटा होती. देशाच्या अखंडतेसाठी आपल्या रक्ताचे अर्ध्य अर्पण करणाऱ्या हजारो ज्ञात अज्ञात नरविरांच्या रक्ताचा रंग या सुर्योदयाला होता. पारतंत्र्याची काळरात्र संपली होती. अन्यायाचा अत्याचाराचा शेवट झाला होता. स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक, भारताच्या अस्मितेचा नवा सूर्य उगवला होता.
स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्षीही देशापुढील आव्हाने संपलेली नाहीत. नवी नवी रुपे घेऊन विघटनवादी शक्ती देशाच्या अखंडतेला तडा देण्याच्या प्रयत्नात आहेत. कुठे जातीचा अभिनिवेश तीव्र करुन कुठे धर्माचा आधार घेऊन, केंव्हा प्रांत व भाषेचा प्रश्न निर्माण करुन एकसंघ भारतीय समाजजीवनाला छिन्नविच्छीन्न करण्याचे प्रयत्न होत आहेत. एकात्म समाज जीवनाचा विचार कालबाहय होत आहे. जात पक्ष, पंथ यांचा संकुचित विचार प्रबळ करुन एकात्म समाज जिवनाच्या विचाराला तिलांजली दिली जात आहे. परकिय ब्रिटीशाविरुध्द लढलेला लढा असो किंवा जात्यंध निजाम राजवटीविरुध्द लढलेला लढा असो. हा कशासाठी होता व आपणास काय करायचे आहे याचे चिंतन करण्याची आज गरज आहे. प्रखर राष्ट्रवादी भारतीय जनतेने आत्मपरिक्षण करुन स्वातंत्र्यासाठी बलीदान करणाऱ्या आपल्या पूर्वजांचे अंतःकरणपूर्वक स्मरण करण्याची आज गरज आहे. त्यांचे या मातृभूमीच्या अखंडतेचे स्वप्न साकार करण्यासाठी जातीपातीच्या वरचा द्वेषाचा त्याग करुन समर्थ, संपन्न व एकसंघ भारतीय समाजाचे चित्र आपल्या नजरेपुढे ठेवण्याची व त्या दिशेने आपले आचार व विचार ठेवण्याची गरज आहे. एवढे केले तरी स्वातंत्र्यासाठी बलीदान केलेल्या हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण केल्यासारखे होईल.
कवीवर्य बा.भ. बोरकरांच्या शब्दात
यज्ञी ज्यांनी देऊनिया शिर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमीवर
नाहीविरा नाही पणती
तेथे कर माझे जुळती ।।
(लेखकाचा संपर्क मो.९८५०७८८८३०.)
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या