सप्टेम्बर १९३७ ते ऑगस्ट १९३९ दरम्यान सावरकरांच्या कुशल नेतृत्वाखाली लढला गेलेला पहिला निःशस्त्र लढा भागानगर अर्थात् हैद्राबाद संस्थानातील पहिला संघटित लढा होता. ही बाब काँग्रेस नेते ही मानतात. हा प्रतिकार निःशस्त्र करण्यामागे सशस्त्र क्रांतिकारक सावरकरांचा उद्देश साफ होता. निजामशाहीतील हिंदू जनता पूर्णतः विवश नि पराधीन होती, लढ्याचा उद्देश हिंदूंना मूलभूत मानवी अधिकार मिळवून देण्यापुरता मर्यादित होता, तेथील हिंदूत जागृती आणण्याचा होता, निजामशहास हटविण्याचा नव्हता !
वस्तुतः सावरकर निजामाला भारतीय मानायला सिद्ध नव्हते. त्याचे संपूर्ण उच्चाटन हेच त्यांचे लक्ष्य होते. पण त्यासाठीचे योजनाबद्ध पाऊल म्हणून, सहभागी होणारे बहुतेक जण निजाम राज्याबाहेरचे असल्याने त्यांच्यावर शत्रूवत कारवाई होऊ नये म्हणून, अत्याचारित व पीडित हिंदूच्या न्याय अधिकारांसाठी सावरकरांनी हा लढा निःशस्र प्रतिकाराचाच ठेवला होता.
निजामाचे राज्य
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा विचार करता इंग्रजांविरुद्धचा लढाच प्रामुख्याने लक्षात घेतला जातो. खरेतर १९४७ पूर्वी आणि नंतरही इंग्रजांशिवाय पोर्तुगीज, फ्रेंच, निजाम इ परकीयांचे शासन भारतावर होते. पण सा-यांचेच त्याकडे दुर्लक्ष होते. त्यातही गांधी व क्राँग्रेसला निजामाविषयी विलक्षण प्रेम होते, स्वतंत्र भारताचा भावी सम्राट म्हणूनही गांधी निजामाचा उल्लेख करीत असत. क्रांतिकारकांचे म्हणाल तर महाराष्ट्रीय क्रांतिकारकांना निजाम स्टेटमधून शस्त्रास्त्र सहजपणे उपलब्ध होत. त्यामुळे त्यांचेही फारसे लक्ष निजाम स्टेटच्या स्वातंत्र्याकडे नव्हते.
निजामाचे राज्य म्हणजे थोडेथोडके नव्हे तर ८२,६९८ चौ मैलात म्हणजे सुमारे २.११लाख चौ किमी परिसरात विस्तारलेले होते. त्यात १९३१ च्या जनगणनेनुसार १४,४३६,१४८ लोक रहात होते यातील केवळ १५ लाख मुसलमान होते तर उर्वरित बहुतांश हिंदू होते. म्हणजे सुमारे ८९.५ प्रतिशत हिंदू होते तर केवळ १०.५ प्रतिशत मुस्लिम होते. मात्रं राज्यातील ८० प्रतिशत अधिकाराच्या जागा ह्या मुस्लिमांकडे होत्या, १९५ जहागि-या मुस्लिमांकडे होत्या तर केवळ ८२ जहागि-या हिंदूंकडे होत्या मुस्लिमांची मातृभाषा उर्दू ही राजभाषा होती तर हिंदूंच्या मराठी, तेलुगु, कानडी इ भाषांना राजव्यवहारात स्थान नव्हते.
हिंदूंवर अन्यायच अन्यायः
निजामाच्या राज्यात हिंदूंना सभा भरविता येत नव्हत्या, मंदिरांचा जीर्णोद्धार करता येत नव्हता, स्वतःच्या मातृभाषांत शाळा काढता येत नसत, हिंदू मंदिरे, घरे नि बाजार यांची जाळपोळ केली जात असे, हिंदूंवर धर्मपरिवर्तनासाठी अत्याचार, हिंदू स्ति्रयांवर बलात्कार या बाबीही होत होत्या. थोडक्यात ब्रिटिश साम्राज्यातही होत नव्हते एवढे जुलूम निजाम राज्यात तेथील बहुसंख्याक प्रजेवर; हिंदूंवर, शतकानुशतके ते केवळ हिंदू आहेत म्हणून केला जात होता.
गांधी व काँग्रेसचे मुस्लिम प्रेम
१९३७ सालच्या कर्णावतीतील अध्यक्षीय भाषणात सावरकरांनी निजामशाहीत हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराची, त्याच्या प्रतिकाराची निकड व्यक्त केली. त्यानंतर दिल्लीत गेल्यावर आर्य समाजाच्या पुढा-यांशी भागानगर लढ्याविषयी चर्चा करुन त्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यामुळेच १९३८ साली आर्य समाज, हिंदू महासभेने निजाम राजवटीत हिंदूंवर होणा-या अन्यायाविरुद्ध लढा द्यायचे निश्चित केले, व त्याचे नेतृत्व स्वा सावरकरांकडे सोपविण्यात आले. या लढ्यात आरंभी हैद्राबाद स्टेट क्राँग्रेस ही उतरली होती. पण नंतर गांधींच्या ‘’हिज हायनेस निजामसाहेबांना अडचणीत टाकायची माझी इच्छा नाही ‘’ या सूचनेनुसार काही आठवड्यातच तिने आपले अंग काढून घेतले.
खरेतर भागानगरचा हा पहिला लढा पूर्णपणे निःशस्र होता याचा उद्देश सांगताना सावरकर म्हणाले होते, ‘’मुसलमानी जातीचा जात म्हणून किंवा निजाम सरकारचा निजाम सरकार म्हणून द्वेष करण्याचा या चळवळीचा लवलेश हेतु नसून तिचा मुख्य हेतू आणि प्रतिज्ञा आहे - हिंदूंचा अन्याय्य अपमान किंवा द्वेष कोणाही अहिंदूस करता येऊ नये ! साधे माणुसकीचे जे जे मूलभूत नागरिक अधिकार ते ते हिंदूना प्राप्त झालेच पाहिजेत !!’’
इतका स्पष्ट उद्देश ठेवून भागानगरचा लढा लढला जात असताना गांधींना मुस्लिम प्रेमाचा उमाळा आला होता. मात्र हेच गांधी कश्मीरच्या राजाला बहुसंख्याक प्रजा मुस्लिम असल्याने मुस्लिमांच्या हाती सत्ता सोपवून संन्यास घ्यायला सांगत होते. इतकेच नव्हे तर लढा शिगेला पोहोचला असताना १९३९ साली गांधी व काँग्रेसने लढा मागे घेण्याच्या प्रस्तावाचा मसुदा तयार करुन आर्यसमाजाच्या गळी उतरवला होता. जेणे करुन हिंदू महासभा व आर्य समाज या दोन हिंदू संघटनात फूट पडेल. आपल्या या कामावर गांधींची एवढी निश्चिती झाली होती, की त्यांनी डॉ. मुंजेंना गाठून आपला मसुदा दाखवत ‘सावरकरांना लढा मागे घ्यायला सांगा’ असे सूचविले होते. अर्थात डॉ. मुंजेंनी ते साफ नाकारले होते.
अखिल भारतीय हिंदूंचा सहभाग
निजामी राज्यात हिंदूंना सभा घ्यायला सुद्धा बंदी होती मग आंदोलनाची गोष्टच दूर. हे ध्यानात घेऊन सावरकरांनी निजाम राज्यात नसणा-या हिंदूंना या लढ्यात भाग घेण्याचे आवाहन केले होते. तसेच आवाहन त्यांनी सर्व हिंदू संघटनांना केले होते. परिणामी संपूर्ण भारतातील अदमासे पंधरा सहस्त्र हिंदू वीर या लढ्यात सहभागी झाले. लढ्यातील पहिला गट घेऊन सेनापति बापट पुण्यावरुन निघाले. त्यांना स्वा सावरकरांनी जातीने येऊन निरोप दिला. त्यावेळी सावरकरांनी सेनापती बापटांच्या आंतरिक तळमळ चे कौतुक केले. त्याचवेळी पुण्यात भागानगर हिंदू निशस्त्र प्रतिकार मंडळाची स्थापना करण्यात आली तिचे अध्यक्षपद मराठा चे संपादक ग. वि. केतकर यांना देण्यात आले.
निजामी राज्यात अत्याचार नि हाल
सावरकरांनी निजामाला पूर्व सूचना देऊन सत्याग्रह आरंभ केलेला होता. तरी त्याच्याकडे आलेल्या सत्याग्रहींना ठेवण्याची सुविधा नव्हती, जेवण देण्याची सोय नव्हती, जेंव्हा प्रतिकारक ते मागायला गेले तेंव्हा निजामी पोलीस व सैन्याने त्यांना अमानवीपणे मारले. उपासमार व पोलिसी मारहाण शिवाय मुस्लिम गुंडांचा हैदोस यांचा प्रतिकारकांना खूप छळ सहन करावा लागला.
अठरा जणांचे हौतात्म्य
भागानगर निःशस्त्र प्रतिकार आंदोलनात सुमारे अठरा जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. यात केवळ सहा जण स्थानिक असून बाहेरील प्रांतातील उर्वरित १२ जण होते, त्यात प्रामुख्याने रावळपिंडी येथील पंडित परमानंद, बंगळूर चे सत्यानंद, उत्तर प्रदेशातील फकीर चंद तर सोलापूर येथील कोवळा युवक सदाशिव पाठक इ वीर होते.
प्रतिकारकांचा पराक्रम
यशवंत जोशी यांनी निजाम राज्याच्या अंतर्गत च निःशस्त्र प्रतिकार आंदोलनाचे केंद्र उघडले होते. जे खरोखरच एक दुर्घट काम होते. कारण विरोधाचा स्वर देहदंडला कारण ठरे. भिडे गुरुजी यांनी रेसिडेन्सी च्या कार्यालयावर हिंदू ध्वज फडकवला तर ऍड. केसकर यांनी हाय कोर्टाच्या इमारतीवर हिंदू ध्वज फडकवला. याशिवाय प्रत्यक्ष मैदान व तुरुंगात हिंदूंनी मोठ्या धाडसाने व चिकाटीने निजामी अत्याचाराचा सामना केला.
निजाम शरण आला
वर्षभर आधी जो निजाम व त्याचा पंतप्रधान अकबर हैदरी हिंदू प्रतिनिधींना भेटू ही इच्छित नव्हते, तूच्छ लेखित होते. पण वर्षभरात तो ज्या लोकनियुक्त मंडळात ८५% हिंदूंना एकही जागा नव्हती तेथे ५०% जागा द्यायला सिद्ध झाला हा हिंदूंचा प्रचंड विजय होता. हा लढा हिंदूंनी एकाच वेळी निजाम,मुस्लिम गुंड नि गांधींची कांग्रेस या तिघांविरुद्ध लढून मिळविला. या लढ्यात ‘मला काय त्याचे?’ ही हाडी मासी खिळलेली खोड विसरून लाहोर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व हिंदू एक झाला निष्ठेने लढला ही फार मोठी फलश्रुती होती.
सावरकरांचे असामान्य नेतृत्व
सावरकर क्रांतिकारक; त्यांना सामान्य लोकांना सोबत घेऊन चालता येत नाही ही जी खुळचट समजूत तेंव्हा नि आताही काहीजणांची आहे. त्याला भागानगरचा निःशस्त्र प्रतिकार हे प्रत्यक्ष उत्तर आहे. अंदमानच्या काळकोठडीत उमेदीची १४ वर्षे जाळल्यानंतर, त्यानंतर रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत १३ वर्षे वेचल्यानंतर सुमारे सत्तावीस वर्षानंतर सावरकर प्रत्यक्ष लोकलढ्यात उतरत होते, गांधींसारखा प्रबळ विरोधक सर्व बाजूनी लढा कसा विस्कटविता येईल याचा प्रयास करत होता, लढा ज्याच्या शासनाविरुद्ध होता. तो निझाम ब्रिटिशांसारखा सुसंस्कृत नव्हता. शिवाय मुस्लिम गुंडांचा निझामाला व त्याचे मुस्लिम गुंडांना पूर्ण सहकार्य होते. इतके सारे असताना सावरकरांनी हा लढा एक हाती दिला. त्यांनी या दरम्यान निजाम सरकारचे सर अकबर हैदरी सोबत केलेला पत्रव्यवहार त्यांच्या मुत्सद्देगिरीचीच साक्ष देतो. हा लढा कुठे थांबवायचा हे ही सावरकरांनी अचूक रीतीने साधले. लढा थांबवताना, ‘आपण तो थांबला नसून स्थगित केला आहे.’ असे सूचक विधान केले. हा लढा निजामाला घालविल्याशिवाय पूर्ण होणारच नाही व त्यासाठी शस्त्रबळाचीच गरज भासणार हे सावरकर ओळखून होते. पण प्रारंभिक स्तरावरील या लढ्यामुळेच निजाम शासित प्रदेशात निजाम सुद्धा झुकू शकतो हा विश्वास हिंदू जनतेत निर्माण झाला. जो पुढे प्रत्यक्ष निजामालाच पदच्युत करण्यापर्यंत यशस्वी झाला यात शंकाच नाही.
(लेखक दशग्रंथी सावरकर या पीएच डी तुल्य सन्मानपत्राने सन्मानित असून मनोचिकित्सक म्हणून सेवारत आहे)
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या