🪔नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळती
कोरोना महामारीच्या काळात जनसंपर्कावर खूपच बंधन आले आहे.माझ्या घरासमोर राहणारे सुभाष खांबेटे यांचे कोरोना महामारीत दुःखद निधन झाले. आमचे घर काही फुटावर असूनही मी सात्वंन करण्यासाठी खांबेटे यांचे कडे जावू शकलो नाही.
या काळात केवळ फोन करुन सात्वंन करु शकतो. आपल्या घरापासून लांब अंतरावर राहणा-याचे दुःखद निधन झाले असेल तर ते समजण्यासाठी रोज पेपरमधील निधन वार्ताचे सदर वाचून माहिती घ्यावी लागते. 24 सप्टेंबर रोजी निधन वार्ताचे सदर वाचत असतांना एक फोटो व बातमी वाचून मन स्तब्ध झाले.तो फोटो व बातमी होती एकनाथराव जाधव यांच्या दुःखदनिधनाची. मी तो फोटो व बातमी संघाच्या गृपवर पाठवली. सर्वांची प्रतिक्रिया माझ्या सारखी होती. माझे मन भूतकाळात गेले व एकनाथरावांचा शोध घेवू लागले एकनाथरावांचा परिचय शिवाजी प्रभात शाखेत दादा मराठे यांचे मुळे झाला. काही व्यक्ती सर्व सामान्यांसारख्या दिसतात परंतु त्यांच्यातले गुण कालांतराने आपल्याला लक्षात येतात. त्यामुळे संघात नेहमी सांगितले जाते प्रत्येक स्वयंसेवकात काहीतरी गुण असतोच पण तो गुण शोधणारा कार्यकर्ता दुर्मिळ असतो.
एकनाथरावांमधील असणारे गुण ओळखणारे कै.नारायण संपत मराठे (दादा मराठे) होते. दादा व एकनाथराव दोन्ही रेल्वेत नोकरीला असल्यामुळे फार वर्षांपासून त्यांचा परिचय होता. विश्व हिंदू परिषदेच्या वाटचालीत 1988 ते 1996 हा काळ संघर्षाचा गेला.संपूर्ण देशात हिंदूत्वाची लाट आली होती. विश्व हिंदु परिषदेची सदस्य संख्या झपाट्याने वाढत होती. परंतु नविन आलेल्या सदस्यांना संघटनेच्या चौकटीत बसवण्यात कार्यकर्ते अपुरे पडत होते. अशा काळात एकनाथरावांची विश्व हिंदू परिषदेत Entry झाली. राम जन्मभूमी आंदोलनात बरेच कार्यकर्ते सक्रिय झालेले होते.आंदोलन शिथिल झाल्यावर सक्रिय कार्यकर्ते निष्क्रिय होण्याचा धोका असतो. त्यांना सतत कार्यक्रम द्यावे लागतात. संघाच्या शाखेलाही हेच सुत्र लागु होते. संघ म्हणजे शाखा, शाखा म्हणजे कार्यक्रम. एकनाथराव शिवाजीनगर मधील शिवाजी प्रभात शाखेचे नियमित स्वयंसेवक असल्यामुळे त्यांना या गोष्टीची कल्पना. होती.
एकनाथराव 31/1/1992 ला रेल्वेतून निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर घरात बसून वेळ कसा घालवायचा असा प्रश्न एकनाथरावांना पडला नाही.त्यांनी विश्व हिंदू परिषदेत संघटनेचे काम करायचे ठरवले.
विश्व हिंदू परिषदेची सहयोगी संघटना म्हणजे बजरंग दल व दुर्गा वाहिनी.बजरंग दलात तरुणांचा सहभाग असतो,दुर्गा वाहिनी मधे युवतींचा सहभाग असतो.एकनाथरावांनी काही काळ बजरंग दलात मार्गदर्शक म्हणून काम केले.एकनाथराव वयाने तरुणांपेक्षा प्रौढ असले तरी बजरंग दलाचे काम करतांना तरुणांशी समन्वयाने काम करत.बजरंग दलात Angry Young Man ची भरती जास्त असल्यामुळे काही वेळेस त्या तरुणांच्या अति ऊत्साहाला एकनाथराव आवर घालत असत.
विश्व हिंदू परिषदेचे काम करत असतांना त्यांची दैनंदिन शाखा कधी चुकली नाही.एकनाथराव व दादा मराठे शिवाजी प्रभात शाखेचे आधारस्तंभ होते.शाखेतील कमी जास्त उपस्थितीचा त्यांच्या शारीरिक कार्यक्रमावर परिणाम होत नसे.रोज नियमाने दंड क्रमिका व व्यायाम योग दोघेही शाखेवर करत असत. एकनाथरावांच्या उत्तम आरोग्याचे रहस्य शाखेतील शारीरिक कार्यक्रमात दडलेले होते.
कालांतराने एकनाथरावांना विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा सेवा प्रमुख म्हणून दायित्व मिळाले.त्यामुळे त्यांचा जिल्ह्यात प्रवास होत असे.प्रवासात एकदा ते चोपडा तालुक्यातील लासूर या गावात विश्व हिंदू परिषद चालवत असलेल्या वनवासी मुलांच्या वसतिगृहास भेट दिली. मुलांची अवस्था पाहून त्यांच्यातील सेवाभाव जागृत झाला. एकनाथरावांनी पूर्ण लक्ष लासूर विद्यार्थी वसतिगृहावर केंद्रित केले. त्यांनी पूर्ण वेळ लासूर वसतिगृहात काम करायचे ठरवले. घरातील सदस्यांची, विशेषतः सहचारिणीची(काकूंची) अनुमती घेऊन एकनाथराव पूर्णवेळ लासूर वसतिगृहात निवासी कार्यकर्ता म्हणून काम करु लागले. वसतिगृहाची जागा विश्व हिंदू परिषदेच्या नावावर नव्हती,ती नावावर करण्याचे जटिल काम एकनाथरावांनी केले.त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव व सरकारी कचेरीत पाठपुरावा करण्याच काम एकनाथरावांनी न थकता केल,आता ती जागा विश्व हिंदू परिषदेच्या नावावर आहे.
मी विचार करतो की एकनाथरावांना निवृत्त झाल्यावर(वय झाल्यावर)एवढे काम करण्याची उर्जा कोठून प्राप्त होते? हा प्रश्न मी त्यांनाच विचारला होता.तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर आपल्या सर्वांना मार्गदर्शक आहे.ते म्हणाले, "जेव्हा मी वनवासी विद्यार्थी वसतिगृहात पूर्णवेळ लासूर ला निवासी कार्यकर्ता म्हणून गेलो तेंव्हा तेथे येणारा प्रत्येक विद्यार्थी माझा मुलगा या भावनेने गेलो आणि जेंव्हा आपलेपणाची भावना येते तेथे काम करण्यास जास्त ऊत्साह येतो.आपलेपणाची भावना हीच माझी उर्जा आहे."
वयोमानानुसार एकनाथरावांचे शरीर थकलेले दिसत होते.त्यांच्या पत्नीचे आजारपणात सप्टेंबर मधे निधन झाले.आयुष्यात जिने सुखदुःखात साथ दिली तिचे जाणे एकनाथराव सहन करु शकले नाही.त्यांचे बोलणे बंद झाले व पुढचा प्रवास तिच्या बरोबरीनेच करायचा असे मनोमन ठरवून त्यांनी अन्नपाण्याचा त्याग करुन आपली इहलोकीची यात्रा 23 सप्टेंबर 2020 रोजी संपवली.
धन्य ते एकनाथराव !
दीपक गजानन घाणेकर
( 9423187480 )
---------
कै.एकनाथराव जाधव यांचा मुलगा अॅड.महेश जाधव यांचे मनोगत
कै. श्री. एकनाथराव सखाराम पाटील (जाधव) यांचा जन्म दि. ०१/०२/१९३४ रोजी नंदगाव तालुका जिल्हा जळगाव येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना ४ भाऊ, ४ बहिणी आई वडील होते आणि भावंडांमध्ये ते सर्वात लहान होते. ते आईवडीलांच्या सुबत्ता पुर्ण शेतकरी कुटुंबात रमले नाही. त्यांनी आपल्या मोठ्या बहिणी कडे शिवाजी नगर जळगाव येथे राहून दहावी उत्तीर्ण केली. ते दि. ०१/०८/१९५६ रोजी मध्य रेल्वेच्या सेवेत रुजू होवून दि. ३१/०१/१९९२ रोजी गार्ड म्हणून निवृत्त झाले. त्यांचा विवाह पुण्यातील रावसाहेब निंबाळकर यांची मुलगी प्रमिला उर्फ मंजुळा हिचे बरोबर होवून उभयतांना ४मुले २ मुली झाल्या. पैकी एक मुलगा महेश जाधव वकील असून, इतर तिघं खाजगी नौकरी, व्यापार करतात, मुलींचे विवाह झाले असून त्या सासरी नांदतात. एकनाथराव नौकरी दरम्यान त्यांचे परममित्र कै. श्री. रामराव निकम यांच्या समवेत भुसावळ येथे कन्या शाळेमागील संघाच्या शाखेत जात असत व मुलांना देखील घेऊन जात असत. निव्रूत्तीनंतरच्या काळात ते संघाच्या शिवाजी नगर शाखेत जात असत त्यावेळी रामराव निकमां व्यतिरिक्त कै. श्री., नारायण मराठे, धोंडूअण्णा माळी,श्री.दत्ता देशपांडे, श्री.विवेक जोशी, श्री. लोकाक्षी, श्री. भिमराव निंबाळकर वगैरे ज्ञात अज्ञात मित्र परिवार त्यांचा होता. कुटुंबात न रमता त्यांनी लासुर ता. चोपडा येथे आश्रम शाळेत ३-४ वर्षे अंदाजे तेथेच राहून कार्य केले. तसेच त्यांनी अनेक ठिकाणी विश्व हिंदु परिषदेच्या सभांना उपस्थिती लावली, नेमून दिलेले कार्य पार पाडले.
कै. एकनाथरावांच्या आदर्श घेत त्यांचे नातजावई श्री. नरेंद्र यशवंतराव पाटील(बावीस्कर) यांनी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आणंद , गुजरात येथील विद्यानगर शाखेत जाऊ लागले. श्री. नरेंद्रराव सध्या तेथे एका शाखेचे कार्यवाह आहेत.
अॅड.महेश एकनाथराव पाटील (जाधव)
(9822975245)
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या