कल्पेश जोशी, सोयगांवकर
--------
भारत-पाकिस्तान दरम्यान १९६५ चे युद्ध काळात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती लिंडन जॉन्सन यांनी शास्त्रीजींना धमकी दिली की भारताने जर पाकिस्तान सोबतचे युद्ध थांबवले नाही, तर अमेरिकेकडून भारताला मिळणारा गहू आम्ही द्यायचे बंद करू.
अश्यावेळी शास्त्रीजींसमोर मोठा प्रश्न उभा राहिला. भारताचा स्वाभिमान राखण्यासाठी शास्त्रीजींनी अमेरिकेसमोर गुडघे टेकले नाही. लिंडन जॉन्सन यांच्या धमकीचा शास्त्रीजींनी भीक घातली नाही. शास्त्रीजींनी भारताच्या नागरिकांना "एक दिवस एक वेळचेच जेवण करा" असे आवाहन केले.
शास्त्रीजींनी देशवासीयांना आवाहन करण्यापूर्वी आपल्या परिवारातील सदस्यांना आठवड्यात एकदिवस एक वेळ उपवास करण्याचे सांगितले. त्यांच्या कुटुंबियांना याचे आश्चर्य वाटले. त्यावर शास्त्रीजी म्हणाले, मी देशवासियांना असेच एकवेळ उपवास करण्याचे आवाहन करणार आहे. मला पहायचे आहे की माझ्या घरातील लोक असा उपवास करू शकतात का?
शास्त्रीजींनी सांगितल्यानुसार त्यांच्या कुटुंबीयांनी एकवेळ उपवास सुरू केला. शास्त्रीजींनीही उपवास सुरू केला. यावरून त्यांच्या लक्षात आले की देशवासी नागरिक सुद्धा एकवेळ उपवास करू शकतील.
आपल्या घरापासून शास्त्रीजींनी हा 'अन्न-यज्ञ' सुरू केला व नंतर देशवासियांना आकाशवाणीवरून आठवड्यात एक वेळ उपवास करण्याचे आवाहन केले. भारत त्यावेळी अन्न धान्याच्या बाबतीत पुरेसा आत्मनिर्भर नव्हता. त्यामुळे "आपल्याला आपल्या देशाच्या स्वाभिमानाखातर उपलब्ध अन्नधान्यावर गुजराण करावी लागणार आहे. अश्या परिस्थितीत आपण कोणत्याही देशासमोर हात फैलावणे योग्य ठरणार नाही. असे झाल्यास आपल्या स्वाभिमानावर मोठा आघात होईल. त्यामुळे देशवासियांना आठवड्यात एकवेळ उपवास करून आपल्याकडील उपलब्ध अन्नधान्याची बचत करावी लागेल." असे आवाहन त्यांनी केले.
शास्त्रीजींनी केलेले आवाहन 'राष्ट्र प्रथम' मानणाऱ्या देशभक्त भारताच्या नागरिकांनी स्वीकारले व शहरापासून खेड्यापर्यंत नागरिक उपवास करू लागले. अन्न धान्याची बचत होऊ लागली व पुढील हंगामातील नवीन अन्न-धान्य येते तोपर्यंत कोणत्याही देशाच्या मदतीविना देशाची भूक भागली व स्वाभिमानही राखला गेला.
भारताच्या अश्या महान नेत्यास आज जयंतीनिमित्त शत शत नमन...
----------
लेखकाचा ई-मेल: Kavesh37@yahoo.com
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या