गरिबांविषयी आस्था कशी असावी? याविषयी दीनदयालजींच्या आयुष्यातील एक प्रेरक प्रसंग

#प्रेरक_प्रसंग

@रवींद्र  गणेश सासमकर

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्याविषयी श्री.सूर्यनाथ तिवारी यांनी सांगितलेला प्रसंगही मोठा रोचक आहे. लखनलाल चौरसिया यांचे घर! दीनदयालजी स्नानाला निघाले. स्नानगृहात जाण्यापूर्वी त्यांनी आपला जूना जीर्ण झालेला बनियान बाहेर खुंटीला टांगून ठेवला. लखनलाल यांनी तो काढला आणि त्या जागी नवीन बनियान ठेवला. 

स्नान उरकून दीनदयालजी बाहेर आले, तेव्हा त्यांनी आपला बनियान शोधायला सुरुवात केली. तेव्हा लखनलाल यांनी त्यांना नवीन बनियान वापरण्यास सांगितले. तेव्हा दीनदयालजींनी नवीन बनियान घेतांना त्यांना बौध्दकालीन अर्थव्यवस्थेतील एक सुत्र सांगितले, त्या सुत्रात म्हटले आहे "की कापडाचा तुकडाही निरनिराळ्या अवस्थातून जात असतो."

तथागत गौतमबुध्दांची एक कथाही अशीच आहे.

एकदा एक भिक्षु तथागतांकडे आला आणि म्हणाला  "माझे चिवर (भिक्षुंचे वस्त्र )जूने झाले आहे, त्यामुळे मला नवीन वस्त्र आवश्यक आहे. तेव्हा बुध्द म्हणाले "तू जून्या वस्त्राचे काय केलेस? 

"ते मी माझ्या अंथरुणावर टाकायला  म्हणून वापरले आहे" भिक्षुने उत्तर दिले.

बुध्द म्हणाले "तुझ्या अंथरुणावर जे कापड होते, त्याचे काय केले? "तेव्हा तो भिक्षु म्हणाला "तथागत, मी ते खिडक्यांना पडदे म्हणून वापरले आहे."

बुध्दांनी पुन्हा प्रश्न केला " खिडक्यांच्या जून्या पडद्याचे काय केलेस? "तेव्हा तो म्हणाला" मी त्याचा वापर पायपुसणे म्हणून केला आहे." 

"आणि जून्या पायपुसण्याचे काय केले? बुध्दांनी विचारले..

भिक्षु उत्तरला "तथागत, मी ते पायपुसणे स्वच्छ धुवून त्याच्या दिव्यात जाळण्यासाठी वाती तयार केल्या आहेत."

आपली शिकवण अमलात आल्याचे पाहून तथागत बुध्दांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले, त्यांनी त्याला नवीन वस्त्र दिले.

बौध्दकालीन सुत्र सांगून दीनदयालजी म्हणाले "गरिबांच्या अंगावरील चिंध्याविषयीही आपल्या मनात अशीच आस्था असली पाहिजे.

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

#दीनदयाल_उपाध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या