लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १९९३ मध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपाला आज २७ वर्षे पूर्ण झाली. आप्तजनांच्या मृत्यूच्या वेदना चिरकाल टिकणाऱ्या असल्या तरी नव्या पिढीने दु:ख बाजूला सारून जगण्याच्या लढाईला नव्याने सुरुवात केली आहे. हजारो लोक या प्रलयंकारी भूकंपात मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी जसजश्या भूकंपाच्या बातम्या आजूबाजूच्या भागात पसरल्या तसतशी प्रशासकीय मदत सुरू झाली. सामाजिक संघटना व नागरिक मदातकार्यासाठी पुढे सरसावले.
अश्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मागे कसे राहतील. समाजावर आलेले संकट म्हणजे आपल्यावर आलेले संकट समजून शेकडो स्वयंसेवकांनी त्यावेळी आपत्तीग्रस्तांना मदत केली. अभाविप ने ही सेवाकार्य निभावले. प्रशासनाला, डॉक्टर, नर्सेस, पोलीस यांना सहकार्य केले. लातूर येथील तत्कालीन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते शिवदास मिटकरी आपला अनुभव सांगतात. त्यांनी स्वतः त्यावेळी आपत्ती निवारण सेवकार्यात सहभाग घेतला होता.
शिवदास मिटकरी यांनी सांगितलेला अनुभव...
भूकंपाला २७ वर्ष पूर्ण झाली. आज त्या आठवणी ताज्या आहेत. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चा पूर्णवेळ कार्य जळगाव येथे करत होतो. सकाळी ७. ३० वा. शेजारी राहणारे श्री माळी यांनी आकाशवाणीच्या बातम्या ऐकून मलाही कळवले. भूकंपाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला. विश्वासच बसत नव्हता. त्यावेळी लक्ष्य लातूरकडे लागले.
माझे मूळ गाव औसा ता. चिंचोली (क.) येथे होते. STD फोन लागत नव्हता. तसेच तडक लातूर गाठले. गावाकडे सर्व ठीक होते.
२० वर्षांपुर्वीची ती काळरात्र होती. अनंत चतुर्दशीची ती रात्र. गणपती बाप्पाला निरोप दिला होता. लातूर शहरात आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये सर्व मंडळी गणपतीबाप्पाला निरोप देऊन, थकून शांतपणे झोपी गेलेली होती. आणि अचानक …. सर्व जण साखर झोपेत असताना … नियतीने डाव साधला !!! सगळेच जण झोपेत … बेसावध !!!
ग्रामीण भागातील अगदी आईच्या पोटात शांत झोपी गेलेल्या चिमुरड्या पासून ते दिवस भर शेतात काबाड कष्ट करून रात्री सुख झालेल्या वयोवृद्धाना नियतीने अवघ्या काही क्षणात आपल्या पोटात घेतले. ज्या धरणीवर लोकांनी विश्रांती साठी पाठ टेकवली आणि अगदी विश्वासाने डोळे बंद करून ती माणसे निद्रिस्त झाली त्या धरणीनेच त्यांना स्वतःमध्ये सामावून घेतले. नियतीची तहान भूक मोठी होती. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भाग जमीनदोस्त झाला. गावेच्या गावे जमिनीत गाडली गेली होती.
गावागावात उरली फक्त स्मशान शांतता. …. आक्रोश करायलाही कुणी शिल्लक उरले नाही. गायी, वासरे, कुत्री, मोर यांच्या शरीराचा चुराडा होऊन मरून पडलेली. रस्ते दुभंगलेले. घरे बेचिराख. मन विषण्ण करणारे ते वातावरण होते. मदत कार्य करणारे स्वयंसेवक प्रेते दिसतील त्या ठिकाणी चिता रचून ४-५ प्रेतांना एकाच चितेवर अग्नी देत होते. अंगावर काटा आणणारा हा प्रसंग मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय … आठवणी अजून मनात घर करून आहेत !
अभाविप च्या सांगण्यावरून भूकंपग्रस्त मंगरूळ गावातील मदत केंद्रावर काम करण्यास मी गेलो होतो. तब्बल २ महिने मंगरूळला मुक्काम होता. अभाविपचे महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते सतत येत होते. प्रेत बाहेर काढणे... अंत्यसंस्कार करणे …. भोजनाची सोय करणे … तात्पुरती घरे तयार करणे … सरकारी व अन्य संस्थाकडून मदत साहित्य आली तर त्याचे वाटपाचे नियोजन करणे … आरोग्य तपासणी... औषध उपचार करणे ... आदी अनेक कार्य दिवस रात्र अनेक कार्यकर्ते करत होती. लातूर येथे औसा रोडवरील नंदी स्टोप येथे मदत संकलन व नियोजन चालत असे. आज या घटनेला २० वर्ष झाले. त्या आठवणी आजही सामाजिक कार्य करताना प्रेरणा देत असतात.
लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीत सरकारी आकड्यांनुसार ७ हजार ९२८ जणांचा त्यात मृत्यू झाला. प्रत्यक्षात अनेकांचे मृतदेह मिळाले नाहीत. त्या घटनेला आता २७ वर्षे झाली. भूकंपाच्या वेळी लहान असलेली पिढी आज तारुण्यात आहे. त्या तरुणांनी आपल्या जगण्याची लढाई नव्याने सुरू केली आहे. भूकंपात आप्तांना गमवावे लागणे हे वेदनादायी होते. मात्र, अशा समस्यांवर काळ हेच त्यावरचे एकमेव औषध असते.
नियतीच्या क्रूर चेष्टेनी ज्या ज्या बंधू भगिनींचा अंत केला त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली...
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या