©️ रवींद्र मुळे
दोन वर्षांपूर्वी अमृतसर ला गेल्यावर जालियनवाला बाग येथे जाणे झाले होते. ज्या विहरीत उडी मारून असंख्य पुरुष महिला मृत्यू मुखी पडले त्या विहिरीचे दर्शन घेतले. याच जालियनवाला हत्या कांडानंतर भगतसिंग यांची देशभक्तीची ज्योत अधिक प्रज्वलित झाली होती. पुढे तेथून वाघा बॉर्डर कडे जाताना लाहोर किती किलो मीटर वर आहे हे दिशादर्शक फलक दाखवत होते आणि मनातील फाळणीच्या वेदना अजून गडद होत होत्या. कारण लाहोर जे आज आपल्या देशात नाही ते या थोर क्रांतीकारक भगतसिंग यांचे जन्मस्थान होते. देशा साठी फासावर जाताना त्यांस कधी स्वप्नात पणं वाटले नसेल की भारत मातेचे असे खंडन होईल! माझी जन्मभूमी ही स्वतंत्र भारतात नसेल!
जालियनवाला बाग घटनेनंतर लगेच भगतसिंग हे असहकार आंदोलनात सामील झाले. पण फ्रेंच राज्य क्रांतीचा अभ्यास करणारा जागतिक समाज जीवनाचा अभ्यास करणारा, अनेक भाषांवर प्रभुत्व असणारा हा तरुण जसा चंद्रशेखर आझाद यांच्या संपर्कात आला तसा क्रांतीच्या विचाराने झपटला गेला आणि त्याने क्रांती कार्यात उडी घेतली. भारत भू च्या स्वतंत्र ते साठी समर्पित होवू पाहणाऱ्या असंख्य तरुणांचा तो प्रेरणास्रोत बनला. क्रांतिकारी चळवळीतील एक ज्योत अंदमानच्या तुरुंगात स्थानबध्द आणि अगतिक झाली असताना इकडे दुसरे अग्निकुंड धगधगत होते .
राजगुरू, सुखदेव, भगवतीचारण, बटुकेश्र्वर दत्त असे एक एक क्रांती सूर्य स्वातंत्र्याची पहाट आणण्यासाठी धडपडत होते. अशातच लाला लजपतराय यांच्यावर झालेला लाठी हल्ला क्रांतिकारकांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरला. याचा बदला घेण्यासाठी सॉंडर्स या अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आणि त्याच हत्येच्या आरोपाखाली भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली. भगतसिंग यांना वास्तविक अटक केली गेली संसदेत बॉम्ब टाकण्याच्या आरोपाखाली पण फितुरी मुळे दुसऱ्या आरोपात ते पकडले गेले.
क्रांतीकारक जेंव्हा हा लढा लढत होते तेंव्हा आणि नंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर एका विशिष्ट विचारसरणीने कायम क्रांती कार्याच्या इतिहासाला दुर्लक्षित ठेवले. ज्यांना स्वातंत्र्याचा यशाचे श्रेय आपल्याकडे ठेवायचे होते, ज्यांना स्वतःच्या विचार, तत्वज्ञान आणि कार्यपद्धती याचा कमालीचा अहंकार होता त्यांनी मार्ग भिन्न असला तरी क्रांतिकारकांच्या देशभक्ती आणि समर्पण याबद्दल शंका न घेता भगतसिंग आणि इतरांच्या फाशी वाचवण्याचा प्रयत्न करायला हवे होते पण शेवटी क्रांतीकारक एकाकी ठरले.
वास्तविक या फाशी नंतर जर सारा देश पेटून उठला आता तर स्वातंत्र्याची पहाट थोडी लवकर उगवली अस्तीच पण देशाला खंडित होण्याची दुर्दैवी नामुष्की आली नसती. पण भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदानामुळे ज्यांना स्वतःच्या लोकप्रियतेची काळजी पडली होती त्या नेहरू विचाराने क्रांतिकारकांना अडगळीत टाकले गेले. स्वातंत्र्यानंतर केवळ इन्कीलाब हा शब्द गृहीत धरून डाव्यांनी अनेक क्रांतीकारक , स्वातंत्र्य चळवळीतील अनेक लोकांना डावे ठरवले. भगतसिंग यांच्या बाबतीत हाच प्रयत्न झाला.
फाशीच्या आदल्या दिवशी भगतसिंग यांना शेवटची इच्छा विचारल्यावर त्यांनी आईच्या हातची भाकरी खाण्याची इच्छा व्यक्त केली. सगळ्यांची धावपळ सुरू झाली कारण एव्हढ्या कमी वेळात ही व्यवस्था कशी करायची ? भगतसिंग यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी त्या जेलर ला बोलावून सांगितले अहो आईच्या हातची भाकरी मला पाहिजे पणं माझी आई येथे पण आहे आणि तेथे स्वच्छता करणाऱ्या महिलेकडे अंगुली निर्देश करत या आईच्या हातची भाकरी मला हवी आहे. त्या माऊलीला ते ऐकून एकदम कृतार्थ झाल्यासारखे वाटले आणि मग असे म्हणतात त्या माऊलीने घरून डबा आणला आणि तिच्या लाडक्या पुत्राला त्याची शेवटची इच्छा म्हणून घास भरवला तिच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते आणि स्थित प्रज्ञ भगतसिंग यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. भारत मातेचे जे समरस स्वप्न भगतसिंग यांनी पाहिले होते त्याचे हे कृतिरुप दर्शन होते. दुर्दैवाने त्यांचे स्वप्नातील असा समरस भारत प्रत्यक्षात यायला अजून खूप वेळ काळ जावा लागेल.
भगतसिंग जेल मध्ये भगवत गीता या ग्रंथाचा अभ्यास करत होते. पुन्हा याच मातृभूमीच्या सेवेत जन्म घेण्याच्या आकांक्षा उरी बाळगत ते फासावर चढले. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या पिढ्यांना दुर्दैवाने हा इतिहास न शिकवल्या मुळे आम्ही त्यांना भगतसिंग चंद्रशेखर आझाद या सारख्या क्रांतीकारक महापुरुषा कडून प्रेरणा घेण्यापासून वंचित ठेवले. पण इतिहास हा कितीही लपवला तरी कधीतरी सर्वांना कळतो त्यासाठी वेळ यावी लागते. रक्ताचा एक थेंब न सांडता देशाला स्वातंत्र्य मिळाले हे पूर्ण सत्य नाही तर अर्ध सत्य आहे हे आपल्याला स्वीकारावेच लागेल. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले हे खरे सत्य आहे!
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या