🪔 नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती ...
साधारणपणे पन्नास वर्षांपूर्वी समाजवादी मंडळींनी एक घोषणा केली होती, समाजातील जातिभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी जानवे तोड आंदोलन हाती घेतले होते. जेणे करुन आपण इतरांपेक्षा पुरोगामी आहोत. समाजवाद्यांचा तर्क असा होता की, आंदोलनामुळे ब्राह्मण समाजाचे वर्चस्व कमी होईल व समाजातील जातिभेद व उच्चनीचता नष्ट होईल. समाजात उच्चनीचता नसावी असे संघाचेही मत आहे. परंतु 'जानवेतोड' आंदोलनामुळे ती
दूर होणार नाही. त्यासाठी समाजात समरसता निर्माण व्हावी लागेल. संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पूजनीय श्रीगुरुजी यांना त्याकाळात पत्रकारांनी 'जानवेतोड' आंदोलनाबाबत प्रतिक्रिया विचारली असता,त्यांनी दिलेले उत्तर आज देखील स्मरणात आहे. ते म्हणाले होते की "जानवे तोड पेक्षा जानवे जोड" करायला पाहिजे. कोणत्याही तोडण्याने जातीयता नष्ट होणार नाही तर जे अशिक्षित, मागासलेल्यांना (समाजवाद्यांच्या भाषेत दलितांना) समाजात चांगले स्थान प्राप्त करुन द्यायचे असल्याने त्यांना सुशिक्षित करणे आवश्यक आहे आणि हे काम Short Cut नी जानवे तोडून होणार नसून, त्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल. आज संघाच्या प्रयत्नाने दक्षिण भारतात ब-याच मंदिरात प्रमुख पुजारी हे मागासलेल्या जातीचे आहेत. हे समरसतेचे विचार संघाचे स्वयंसेवक प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त करत असतात. या समरसतेचे उदाहरण म्हणजे आमचे जुने जळगांवचा परिसर. या परिसरात अनेक जातीची मंडळी गुण्यागोविंदाने राहात आलेली आहेत. यात बारा बलुतेदार, मराठा, लेवा, कोळी, वगैरे अनेक जातीची मंडळी सुखदुःखात एकत्र येतात.
1948 मधे महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली व मुख्य लक्ष्य होते ब्राह्मण समाज. परंतु जुने जळगांव या बाबतीत अपवाद होते. तेथे कोणत्याही ब्राह्मणाच्या घरावर हल्ले झाले नाहीत किंवा नुकसान झाले नाही. याचे कारण जुन्या जळगांवात संघाचे संस्कार घरोघरी रुजले असल्यामुळे तेथे समाजात भेद निर्माण करणा-या 'जानवे तोड' आंदोलनाची गरज वाटली नाही. जुन्या जळगांवला एक ऐतिहासिक परंपरा आहे. जुने श्री राम मंदिर याचे साक्षीदार आहे. राम मंदिराला लागूनच भोईटे गढी आहे. पानीपतच्या ऐतिहासिक लढाईत मराठे सैन्य परतीला महाराष्ट्रात येत असतांना भोईटे सरदार कुटुंबासह जळगांवला थांबले व बाकी मराठे सातार येथे गेले. कै.केशवराव भोईटे यांचा जीवनपट वर्णन करतांना या सर्व गोष्टींचा संदर्भ देणे आवश्यक होते.
केशवराव भोईटेंचा जन्म 12/04/1928 ला झाला. त्यांना चार भाऊ व तीन बहिणी होत्या. वडिल कै.त्र्यंबकराव भोईटे पक्के काँग्रेसी कार्यकर्ते होते. 1936 च्या सुमारास ते जळगांव शहराचे नगराध्यक्ष होते. त्यांचा शेती व्यवसाय व बारदानचे दुकान होते. केशवराव शांत व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या स्वभावाने समाजात लोकप्रिय होते. केशवराव सुरवातीला भारतीय जनसंघाचे काम करत. बहुजन समाजातील मंडळींची जनसंघाचे काम करण्याची तयारी नव्हती. अशा वेळी कै.उत्तमराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी बहुजन समाज जनसंघाचे काम करु लागला. जळगांवच्या जनसंघाचे नेतृत्व केशवराव भोईटेंकडे होते. 1962 ला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. निवडणूकीत पराभव होणार हे माहित असूनही पक्ष वाढीसाठी केशवरावांनी जनसंघाच्या दीपक चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवली. केशवरावांचा विवाह छत्तीसगढ राज्यातील धमतरी या गावातील प्रतिष्ठित मराठा कुटुंबातील अहिल्याबाई यांच्याशी झाला. लग्न झाल्यावर अहिल्याबाई राष्ट्र सेविका समितीचे काम करत व माहेरुन आलेला संघ विचारांचा वारसा पुढे नेत होत्या.1962 च्या भारत चीन युद्धानंतर महिलांना होमगार्डमध्ये भरती करुन रायफ़ल चालवण्याच्या प्रशिक्षणात भाग घेण्यास महिलांना प्रवृत्त केले.
केशवरावांचे शिक्षण अॅग्रीकल्चर पदवीधर असूनही त्यांनी सरकारी नोकरी न स्वीकारता वडिलांसारखी शेती व बारदानचा व्यवसाय सांभाळला. 1970 च्या अक्षय तृतीयेला जळगांव शहरात जातीय दंगल झाली. त्यावेळी महाराष्ट्रात व केन्द्रात काँग्रेस पक्षाचे सरकार होते. दंगल जुन्या जळगांवात झाली असल्याने जास्तीत जास्त रा.स्व.संघाच्या स्वयंसेवकांना खोट्या आरोपावरून दंगलीत सहभागी म्हणून अटक करण्यात आली. भोईटे कुटुंबातील 32 जणांना अटक केली होती. या दंगलीच्या निमित्ताने संघाला बदनाम करण्याचे षडयंत्र काँग्रेस करत होती. त्या काळात अकोला शहरातील निवासी श्री.आकर्ते न्यायाधीश होते. पुढे त्यांना काँग्रेस पक्षाने राज्यसभेचे तिकीट दिले.
या दंगलीला हिंदू जबाबदार आहेत, असा भ्रम काँग्रेस पक्ष सर्वदूर पसरवत होते. "आता हिंदू मार खाणार नाही" असे मा.अटल बिहारी वाजपेयी यांचे लोकसभेतील भाषण आज देखील स्मरणात आहे. या काळात केशवरावांनी अटक झालेल्या सर्व स्वयंसेवकांचे पालकत्व स्वीकारले होते.
शहर संघचालक---- कै.रामभाऊ धर्माधिकारी जळगांव शहर संघचालक होते. आणीबाणीत 1975 मधे मीसा मधे नाशिक कारागृहात स्थानबद्ध होते.1977 ला कारागृहातून सुटका झाल्यावर ते पुणे येथे स्थायिक झाले व तेथेच वृध्दापकालाने निधन झाले. शहर संघचालक पदासाठी योग्य व्यक्तीला निवडणे आवश्यक असते. शहर संघचालक या पदासाठी आवश्यक असणारे सर्व गुण केशवरावांकडे असल्यामुळे त्यांची सर्वानुमते शहर संघचालक म्हणून नियुक्त झाले. पूजनीय तृतीय सरसंघचालक कै.बाळासाहेब देवरस जळगांव जिल्ह्याच्या प्रवासात असतांना केशवरावांकडे त्यांचा निवास होता.
केशवराव सर्व प्रचारक व कार्यकर्त्यांचे अघोषीत पालक होते. जेष्ठ प्रचारक तात्या बापट, वसंतराव कुंटे, नानाराव ढोबळे, तात्या इनामदार, शिरीष कुळकर्णी यांचा केशवरावांकडे नेहमीच संपर्क असायचा. बरेच वेळा केशवरावांकडे भोजनही करायचे. केशवराव शारीरिक व्याधी मुळे संघ प्रवास करु शकत नव्हते. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. 20 आॅक्टोबर 1985 ला त्यांना तीव्र हार्ट अटॅकने त्यांचे निधन झाले. अजातशत्रु केशवराव भोईटे जळगांव शहराचे संघचालक म्हणून लक्षात राहतील.
दीपक गजानन घाणेकर
(9423187480)
मनोगत....
श्री.शिरीष कुळकर्णी
सोलापूर
1981 ते 1984 मी सोलापूर हून जळगावला प्रचारक म्हणून आलो. त्यावेळी माननीय केशवराव भोईटे जळगाव शहर संघचालक होते. त्यावेळेच्या कांही आठवणी, प्रेरणादायी प्रसंग सांगावेत असे मला सांगितले गेले म्हणून मला समजलेले माननीय केशवराव मी शब्दात प्रगट करण्याचा प्रयत्न करीत आहे.
माझी जळगाव शहर प्रचारक म्हणून नियुक्ती झाली आणि माननीय केशवरावांच्या घरी भोजन व्यवस्था होती त्यामुळे रोजच त्यांचा सहवास लाभत होता.
मला अनेक वेळा कांही कारणाने भोजनास जायला उशीर होत असे परंतु केशवराव माझी वाट पाहत असायचे व आपल्या बरोबरच मला भोजनास बसवायचे. अत्यंत मितभाषी असा स्वभाव असून सुद्धा आवश्यक त्यावेळी त्यांच्या विचारातून संघाच्या सर्व संकल्पना स्पष्ट होत असत. जळगांवच्या संघ कामातील जुन्या आठवणी नेहमी त्यांच्या बोलण्यात असत. सर्व कुटुंबातील सदस्यांना संघ कामाचा परिचय व्हावा याकडे त्यांचे लक्ष असे. सौ.काकूंचे माहेर धमतरी, छत्तीसगढ येथील होते. तिथे त्यांचे कुटुंब संघ कामात क्रियाशील होते. त्यामुळे अनेक जुन्या संघ कामाच्या आठवणी सौ. काकूंच्या बोलण्यात येत असत.
तीन वर्षात मी त्यांच्या घरातील एक सदस्य बनून गेलो होतो. जुन्या जळगांव भागात भोईटे कुटुंबाबद्दल खूपच आदर होता. याचा मी अनेक वेळा अनुभव घेतला आहे. संघ कार्याची दृढ निष्ठा, मितभाषी कोणाचाही हेवा वा द्वेष न करणे, निरपेक्षता आणि त्यांचा स्वभाव या कायम लक्षात राहणाऱ्या गोष्टी आहेत. आज 40 वर्षांनंतर देखील त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
आज देशभरात संघशक्तीचे दर्शन विविध घटनांमधून लक्षात येत आहे. आजच्या संघाच्या या स्थिती साठी निरलसपणे आयुष्यभर कार्य करणाऱ्या माननीय केशवराव यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
त्यांचे कार्य आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणादायी राहील.
शिरीष कुलकर्णी
सोलापूर.
©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या