#शिवरायांसि_आठवावे
दक्षिणदिग्विजयाच्या मागे महाराजांचे मोठे राजकारण होते."दक्षिणची पातशाही आम्हा दक्षिणियांचे हाती राहिली पाहिजे" हे त्या स्वारीचे सुत्र होते.
भाग्यनगरच्या वाटेवर असतांना कर्नाटकातील रयतेचा आक्रोश महाराजांच्या कानी पडला. कोप्पळचा प्रदेश आदीलशाही अमलाखाली होता. कोप्पळच्या किल्ल्यात दोन सख्खे भाऊ आदीलशाहीचे बलाढ्य सरदार होते. हूसेनखान मियाना आणि दुसरा होता अब्दुर्रहीमखान मियाना. हे पठाण होते. या पठाणांच्या अत्याचाराखाली जनता भरडून निघत होती. शेतकरी हवालदिल झाला होता, गाई कापल्या जात होत्या,हिंदुच्या स्त्रीया सुरक्षित नव्हत्या. रयत अगदी त्रस्त झाली होती.पण ही दु:खे सांगणार कोणाला ? पण महाराजांची कीर्ती या लोकांनी ऐकली होती. ही पीडलेली रयत महाराजांकडे गेली. कोप्पळकरांनी आपली व्यथा महाराजांपुढे मांडली.प्रजेला पुत्रासमान मानणारा हा राजा होता,कोप्पळ स्वराज्यात नसले म्हणून काय झाले? रयत तर हिंदुच होती ना! महाराजांनी पठाणांचे पारिपत्य करण्याचा निश्चय केला. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना पठाणांवर धाडले (जानेवारी 1677) यावेळी धनाजी जाधव आणि नागोजी जेधे ही तरणी मुले हंबीररावांसोबत होती.
प्रचंड रणकंदन झाले. दोन्ही खान भाऊ मैदानात उतरले. खानाची फौज मराठ्यांपेक्षा जास्त होती.तरीही मराठ्यांनी पठाणांची कत्तल उडवली.खान घाबरला, हत्तीवर बसलेला खान युध्दाच्या मैदानातून पळून जाऊ लागला.नागोजी जेध्याने त्याच्या हत्तीवर भाल्याने प्रहार केला,पण खानाने नागोजीवर आपल्या धनुष्यातून बाण सोडला,तो नागोजीच्या मस्तकात गेला. शेवटी खान कैद झालाच!
नागोजी जेधे हा कान्होजी जेधे यांचा नातू! या कोवळ्या पोराने स्वराज्यासाठी बलिदान केले.त्याची बायको गोदुबाई सती गेली. कर्नाटकातील जनतेचा संसार सुखी व्हावा म्हणून मावळातल्या या लेकराने आपला संसार मोडला. स्वराज्यासाठी प्राण वैरायलाही तयार असणारी ही देवदुर्लभ माणसे महाराजांनी कशी घडवली असतील?
देश से है प्यार तो
हर पल यह कहना चाहिए,
मै रहूँ या ना रहूँ
भारत यह रहना चाहिए ।
नागोजींच्या मनातील भाव यापेक्षा वेगळे काय असतील?
नागोजीचा पिता सर्जेराव याच युध्दात सहभागी होता. डोळ्यासमोर पोटचा गोळा गेला आणि तिकडे तरुण सून सती गेली,तरी सर्जेराव घरी गेला नाही,तो स्वराज्याच्या पुढील मोहीमेसाठी रवाना झाला
शिवाजीमहाराजांनी नागोजी जेधेच्या घरी स्वत: जाऊन त्याच्या वीरमातेचे सांत्वन केले. आणि त्याच्या शौर्याची आठवण म्हणून दरवर्षी एक शेर सोने त्याच्या घरी पाठवून देण्याची व्यवस्था केली.
शोषित,पिडीत बांधवाच्या हाकेला धावून जाणे, प्रसंगी स्वराज्यासाठी बलिदान देण्याची उर्मी निर्माण करणे आणि हौतात्म्य पत्करलेल्या वीराच्या कुटुंबाची काळजी हा शिवचरित्र कथेचा बोध आहे.
- रवींद्र गणेश सासमकर
©️ विश्व संवाद केंद्र देवगिरी
0 टिप्पण्या