शब्द अर्थाचे वाहक असतात. शब्द जणू शरीर .. अर्थ हा प्राण. पण काही शब्दांना मूळ अर्थांहून वेगळेच नव्हे तर विपरीत अर्थ झपाटून टाकतात, माणसाला बाधा व्हावी तसे.
उदा० पानिपत ! आज रूढ झालेला अर्थ आहे पतनाचा, निःपाताचा... पानिपताशी निगडीत भाव पुरूषार्थाचा, पराक्रमाचा, पुढाकाराचा असूनही.
शब्दांसारखीच विपरीताची बाधा काही स्थळांना, व्यक्तींना, व्यक्तीव्यक्तींमधील संबंधानाही जडलेली आपण अनुभवतो.
उदा० टिळक आणि आगरकर !
गडकऱ्यांनी नक्षत्रांची स्पर्धा म्हणून वर्णिलेल्या टिळक-आगरकर संबंधांना मतभेदातच लपेटून निरगाठीत गोठवून टाकलेले दिसते.
पण खरं किती हृद्य.. कोवळे नाते होते दोघांमध्ये..
भावनिक पण भाबडे नसलेल्या, निग्रही तरीही निर्मळ असलेल्या त्या नात्याची भूल विश्राम बेडेकरांना पडली होती. त्यांनी या दोन मनस्वी सहयात्रींच्या अंतर्यामी झुळझुळणारा एकच ध्येयनाद प्रतिभाश्रुतींनी समजून घेत आपल्या 'टिळक आणि आगरकर' ह्या नाटकातील प्रसंग विणत नेले होते. दोहोंपैकी कुणाच्याही बाजूला झुकते माप होऊ न देणे हे अवघड आव्हान होते. तरीही य. दि. फडक्यांना ते टिळकांकडे झुकलेले वाटलेच.
ह्या नाटकाचे शीर्षक इतके अनाट्यपूर्ण का असा मला अनेकदा प्रश्न पडे. पण आता असेही वाटते आजवर रूढ झालेल्या समजुतींनी त्या दोघांना एका समासात सांधूच दिलेले नाही. ते दोघे दोन व्यक्तीही न राहता त्यांना पुढे ठेवत दोन सैन्येच उभी राहिली. त्या दोघांमध्ये खंदक खोदून अंतर वाढविणारेही सभोवती ठाकले. त्या दोन विशेषनामांमध्ये 'विरूद्ध' हा विखार विझवून 'आणि' या शब्दाने बेडेकरांनी त्यांना संवादी केलेले दिसते. त्या दोघांनी आपापल्या जीवनकार्याने वेगळेपण ठसठशीतपणे जपले होतेच. त्यांच्या समर्थकांनी त्यांना वेगळे ठेवण्यातच आपली शक्ती कसाला लावली होती..आहेही. त्यामुळेच त्यांच्या वेगळेपणाला सहत्वाचे परिमाण देणारे 'टिळक आणि आगरकर' हे शीर्षक अधिक अन्वर्थक वाटू लागले. आज हे सगळं आठवलं... कोजागिरीच्या चंद्रदर्शनाने.
टिळक आणि आगरकरांची पहिली भेट.. परिचय.. मैत्री महाविद्यालयीन वयात झाली. चांदण्यात फुललेली ..बहरलेली. शिक्षणाचे तास संपल्यावर सादिलबुवाच्या टेकडीवर तासनतास भविष्यातील संकल्पचित्रे रंगविणारे दोघे ध्येयपथिक.
लोकमान्यांनी पुढे कधीतरी आपल्या मुलाला..श्रीधरपंतांना त्या दिवसांच्या आठवणी सांगताना टिळकांनी ओल स्वरात सांगितले होते, "टेकडीवरील दगड अन् दगड आणि वाटा पावलांना परिचयाच्या झाल्या होत्या. संध्याकाळपासून रात्र चढेपर्यंत चांदणे पाहत भावी आयुष्यातील योजना करत रमून जात असू."
तिथेच बसून दोघांनीही शिक्षण पूर्ण झाल्यावर अर्थार्जनाचा विचार न करता देशाच्या अभ्युदयासाठी आयुष्य देण्याचे ठरविले आणि... तंतोतंत तसेच केले. त्याआधी तिथेही चर्चा झाल्या.. वाद झडले..आधी राजकीय की सामाजिक यावर खटके उडले. पण शिक्षण हे समान कार्यक्षेत्र यावर एकमत झाले अशी साक्ष त्यांचे सहाध्यायी उपासनी यांनी नोंदवली आहे.
पुढे विष्णुशास्त्री चिपळुणकरांच्या शाळेत दोघांचे शिकवणेही सुरू झाले. नंतर शिक्षणाकडून लोकशिक्षणाचे काम करण्यासाठी 'केसरी' आणि 'मराठा' ही पत्रे सुरू झाली. त्यांना पत्रकारितेतील पहिला जबर धडा मिळाला कोल्हापूर दरबारातील घटनांसंबंधी केलेल्या लेखनावर भरलेल्या खटल्यातून... ठोठावलेल्या १२० दिवसांच्या तुरूंगवासाच्या शिक्षेतून.
सुटकेनंतर आगरकरांनी तो कारावास नर्मविनोदी शब्दात मांडून ठेवला. महिन्याभरातच प्रसिद्ध झालेलं तेच आगरकरांचे पहिले पुस्तक..'डोंगरीच्या तुरूंगातील आमचे १०१ दिवस'. इथे आमचे म्हणजे आगरकर आणि टिळकांचे. त्या दोघांच्या मैत्रीपूर्ण सहवासाचा हा काळ.
तुरूंगवासावरचे हे पहिलेच मराठी पुस्तक असावे का?
१७ जुलै १८८२ या दिवशी संध्याकाळी त्या दोघांची मुंबईतील डोंगरी कारागृहात गजाआड पाठवणी झाली. सादिलबुवाच्या टेकडीवरचे मैत्रीचे चांदणे आता डोंगरीच्या कारावासात पुन्हा बहरून आले. पुन्हा तशाच गप्पा, चर्चा, वादंग आणि संकल्पही !
कधी कधी वाद वाढत जाऊन आवाजही वाढत असे. तेव्हा जवळपासचा शिपाई 'हळू बोला..' असे दटावून जाई. स्वर थोडा मंदावे पण बोलणे मात्र संपत नसे..रात्र संपली तरी ! अशा प्रसंगी दोघांनाही भवभूतीचा 'रविदितगतयामा रात्रिरेव व्यरंसीत् l' हा श्लोक आठवत असे.
दोघे गजाआड घरापासून दूर होते पण कुटुंबांची चिंता कमी होती. कारण तांब्यांच्या बोळात टिळक आणि आगरकराची बिऱ्हाडे शेजारी शेजारीच होती. आगरकरांनी मुंबईला खटल्याच्या निकालासाठी येण्याआधीच आपल्या पत्नीला यशोदाबाईंना समजावले होते, "तिथेच रहा. काळजी नको. भोवतालची माणसे हीच आपली आप्त. ध्येयाने, विचाराने बांधलेले तेच आपले खरे सोयरेधायरे..."
तुरूंगातील राहण्याजेवण्यातील अनावस्थेने दोघांनाही विकल करून टाकले होते. टिळकांचे वजन २४ पौंडाने तर आगरकरांचे १६ पौंडाने घटले. यालाही कारण मैत्रीचे कवच होते. वस्तुतः टिळक दणकट प्रकृतीचे. पण आगरकरांना होणारा त्रास पाहून टिळक आपल्या भोजनातील काही वाटा त्यांना देत असत.
कोठडीत नियमानुसार प्रतिदिनी प्रत्येक बंदीवानाची संपूर्ण झडती घेतली जात असे. त्याला उद्देशून आगरकर म्हणाले होते,"याचा एक मोठाच फायदा झाला. आता आपल्या स्नेहात आतबाहेर काही राहिलं नाही. आपल्यामध्ये लपविण्यासारखं काही उरलं नाही."
बेडेकरांच्या नाटकात हा प्रवेश हृदयस्पर्शी झाला आहे. त्यात टिळक उद्गारतात "सबंध महिन्याभरात चंद्र दिसलाच नाही.."
आगरकरांची पुस्तकातील नोंद अशी आहे, "या तीन महिन्यांत (१२० दिवस) आम्ही चांदोबा एकदा किंवा दोनदाच पाहिला..तोही मोठ्या खटपटीने..गजांतून."
टिळक-आगरकर परस्परांच्या मैत्रीपर्वात चंद्र, चांदणे खूप असोशीने पाहताना दिसतात... हे विशेष वाटते.
तुरूंगात प्रवेश करतानाच आगरकर भवभूतीच्या उत्तररामचरितातील श्लोक गुणगुणत होते.
"स्नेहं दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि आराधनाय लोकस्य मुञ्चतो नास्ति मे व्यथा ll"
(लोकांना संतुष्ट ठेवण्यासाठी स्नेह, दया, सौख्य आणि प्रसंगी जानकी यांचा त्याग करावा लागला तरी मला त्याने खेद वाटणार नाही)
त्यांच्या पुस्तकाच्या प्रारंभी आणि शेवटीही हाच श्लोक छापलेला दिसतो.
आगरकरांनी लोकाराधनेसाठी काय काय सोडले... चंद्रसुंदर मैत्रीही ?
पुढे दुरावा वाढल्यावर आगरकर आजार बळावल्यावर यशोदाबाईंना म्हणाले,"टिळकांशी वाकुडपणा ठेऊन मला शांत मरण येणार नाही."
टिळकांचा मुक्काम सिंहगडावर होता. टिळक उतरून आगरकरांच्या भेटीला त्यांच्या घरी गेले. यशोदाबाईंनीच आठवणीत सांगितले आहे..की टिळक आले. बसले. खूप बोलणे झाले. आणि गेले. १७ जून १८९५ या दुसऱ्याच दिवशी आगरकरांनी देह ठेवला.
दुपारनंतर स्मशानातून परतल्याबरोबर टिळक आगरकरांवरील श्रद्धांजलीचा लेख सांगायला बसले. टिळक घळाघळा रडत होते. दोन कॉलमचा लेख चार तास झाले तरी पूर्ण होत नव्हता.
टिळक-आगरकर मैत्रीबनातील चांदणं आज आठवलं. कारण...
आज कोजागिरी पौर्णिमा.
टिळक-आगरकरांची डोंगरीच्या तुरूंगातून १९ दिवस आधीच ..
१०१ दिवसाच्या बंदिवासानंतर.. मुक्तता झाली, त्या दिवशी
२६ आॕक्टोबर १८८२ या दिवशीही कोजागिरी पौर्णिमाच होती.
कारागारातही अम्लान राहिलेला मैत्रीचंद्र व्यवहारात मात्र कलंकित झाला..झाकोळून गेला... ज्याची शतकानुशतके ठसठस वाटत रहावी.
आज कोजागिरीचे पूर्ण चंद्रबिंब पाहताना त्यांच्या मैत्रीची अलांछित प्रसन्न प्रभाच आठवीत होतो.
अन्यथा वितुष्टाचं ग्रहण सुटता सुटत नाही... सुटू देत नाहीत.
- प्रमोद वसंत बापट
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या