संघा बाहेरच्या विचारसरणीतील एकाने मला एकदा प्रश्न केला, तुम्ही समरसता हा शब्दप्रयोग का वापरतात? राज्यघटनेत समता असा शब्दप्रयोग आहे, समरसता असा नाही. राज्यघटनेला अभिप्रेत असलेली समता तुम्हाला नको आहे का? त्याला काय म्हणायचे, ते माझ्या लक्षात आले. त्याला पुढे असे म्हणायचे होते, 'समता हा फुले-आंबेडकरी विचार आहे आणि समरसता हा ब्राह्मणी संस्कृतीचा विचार आहे.' परंतु तसे म्हणाला नाही, त्याचा भाव आपल्याला समजून घ्यावा लागतो. मी त्याला म्हटले "संविधानात समरसता शब्दप्रयोग नाही हे तुमचे म्हणणे बरोबर आहे, परंतु संविधानात भांडवलशाही, मार्क्सवाद, १९७६ सालची घटनादुरुस्ती होईपर्यंत समाजवाद हा शब्दप्रयोग देखील नव्हता, सेक्युलॅरिझम हा शब्द देखील नव्हता, नव भांडवलशाही हाही शब्दप्रयोग नाही, त्याचप्रमाणे माहिती-तंत्रज्ञान हा देखील शब्द नाही... याचा अर्थ असा करायचा की हे सर्व शब्दप्रयोग संविधान मान्य नाहीत?" संविधानाचा अशाप्रकारे विचार करता येत नाही, संविधानाची भाषा रोजच्या भाषेपेक्षा वेगळी असते आणि त्यातील प्रत्येक शब्दाला विशिष्ट कायदेशीर अर्थ आहे अगदी स्वल्पविराम याला देखील.
मला प्रश्न त्याने विचारला त्याचा तो व्यक्तिगत प्रश्न नव्हता. समरसता शब्दाविषयी जाणीवपूर्वक अपप्रचार चाललेला आहे आणि बुद्धीभेद करण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचा परिणाम म्हणजे हा प्रश्न आहे. म्हणून समरसता आणि संविधान याविषयी थोडा गंभीरपणे विचार करावा लागतो.
समरसता या शब्दाचा शब्दशः अर्थ आपल्याप्रमाणे दुसऱ्यालाही भावभावना आहेत, त्या भावभावनांशी मानसिक दृष्ट्या एकरूप होणे, 'मी तसा तू' या भावनेने एकमेकांशी व्यवहार करणे, समरसता हे कोणते तत्त्व नसून हा एक व्यवहार आहे आणि याचा संबंध व्यक्तीच्या मनात येतो म्हणून हा एक मानसिक भाव आहे. या भावाचे दुसरे नाव आहे 'बंधुता'. समाजात वावरत असताना समाजातील सगळे घटक माझे आप्तस्वकीय आहेत, अशा प्रकारची मानसिक भावना असते तिला बंधुत्वाची भावना असे म्हणतात. मनुष्य समूह जेव्हा 'राष्ट्र' ही संज्ञा प्राप्त करतो तेव्हा त्यात बंधुत्वाची भावना अतिशय बलवान असते. ही भावना समाजातील सर्व घटकांना एकमेकांशी घट्ट बांधून ठेवते. एकावर एक विटा असल्याने भिंत तयार होत नाही, त्या विटा एकमेकाशी चुन्याच्या किंवा सिमेंटच्या माध्यमातून घट्ट जोडाव्या लागतात. माणसांचा समूह म्हणजे समाज नव्हे, या समूहातील सगळी माणसे बंधुत्वाच्या भावनेने एकमेकांशी घट्ट जोडलेली असावी लागतात, यालाच आपण 'समरसता' म्हणतो.
आपल्या राज्यघटनेची उद्देशिका बंधुत्वाचे तत्त्व सांगते. या उद्देशिकेत न्याय, स्वातंत्र्य, समानता याबरोबर राष्ट्राच्या एकतेसाठी आणि एकात्मतेसाठी बंधुता आवश्यक आहे हे देखील ही उद्देशिका सांगते. याचा अर्थ असा झाला की समरसता या शब्दात जो बंधुतेचा भाव आहे तो आपल्या संविधानाने अत्यंत स्पष्ट शब्दात व्यक्त केला आहे.
समरसता म्हणजे केवळ बंधुता नव्हे. 'मी तसा तू' या भावनेने दुसऱ्याशी वागायचे असेल तर तुझ्यात आणि माझ्यात कसल्याही कृत्रिम भेदाच्या भिंती उभ्या राहणार नाहीत हा विषय आपोआपच येतो. आपल्या समाजात जातीच्या कृत्रिम भिंती उभ्या आहेत. जातीची उतरंड उभी आहे. या जातीत समानता नाही. विषमता हा तिचा पाया आहे. समाजात वावरताना व्यक्तीला प्रतिष्ठा हवी असते, तिला विकास करण्याची संधी हवी असते, जातीय समाजरचनेत या गोष्टी नाकारल्या जातात. अधिकारांचे त्यामुळे प्रतिष्ठेचे विषम वाटप केले जाते. विकासाच्या संधी नाकारल्या जातात. अनेक प्रकारची बंधने व्यक्तीवर लागले जातात.
समरसता म्हणजे जातीमुक्त होणे होय. स्वजातीच्या बाहेर पडून व्यापक विचार करायला शिकणे. जातीच्या आधारावर कोणाचीही कसलीही योग्यता न ठरविणे, जातीय भेदभावाचे पालन न करणे, आपण सर्व समान आहोत, एकाच राष्ट्राचे घटक आहोत... पुढे जाऊन एकाच मानवजातीचे घटक आहोत आणि त्याच्याही पुढे जाऊन एकाच चैतन्याची विविध रूपे आहोत... हे मान्य होईल अशा प्रकारचा व्यवहार करणे म्हणजे समरसता. समरसता म्हणजे भाषणबाजी करणे नव्हे, लेखन करणे नव्हे, तर समरसतेची भावना प्रत्यक्ष जीवनात जगणे होय.
राज्यघटनेने संविधानिक भाषेत कलम 14 ते 18 यात समानतेचे हक्क दिलेले आहेत. या समानतेच्या हक्कात राज्य कोणत्याही नागरिकाला धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करणार नाही. राज्याच्या दृष्टीने कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान आहेत. कुणालाही दुकाने सार्वजनिक उपहारगृहे सार्वजनिक करमणुकीचे साधन, विहिरी तलाव, स्नानघाट याठिकाणी प्रतिबंधक करणार नाही. याचा अर्थ असा झाला की राज्य व्यक्तीची जातीनिहाय पतवारी करणार नाही. सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबतीत सर्वांना समान संधी देण्याची हमी देण्यात आलेली आहे.
समरसतेचे नियम आणि संविधानाचे नियम यात एक मूलभूत अंतर आहे. समरसतेच्या नियमामागे कोणतीही दंडशक्ती नाही, ते नैतिक नियम आहेत आणि प्रत्येकाने स्वतःहून त्याचे पालन करायचे आहे. संविधानाच्या नियमामागे मात्र दंड शक्ती असते. कायद्याचे उल्लंघन कोणाला करता येत नाही. संविधान आणि समरसता यात अजून एक फरक आहे. संविधानाची अंमलबजावणी दंड शक्तीच्या भयापोटी होता कामा नये. कारण दंड शक्तीच्या भयाला मर्यादा असतात. लोकांनी स्वखुशीने त्या संविधानाची स्वीकृती करून संविधानाची अंमलबजावणी केली पाहिजे. तसे झाले तरच संविधान लोकांनी स्वीकारले असे होईल. हे नियम लोकांनी स्वीकारावे त्याला मनापासून मान्यता द्यावी, ते आपल्या व्यवहारात आणावे, हे घडवून आणणे हे समरसतेचे काम आहे.
(अधिक माहितीसाठी ज्येष्ठ पत्रकार व लेखक रमेश पतंगे यांचे 'आम्ही व आमचे संविधान' हे पुस्तक जरूर अभ्यासावे.)
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
#संविधान_दिवस
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
#सामाजिक_समरसता
0 टिप्पण्या