@अनुप भालेराव
कुठल्याही देशात कायदे करताना त्या देशातील परिस्थिती, संस्कृती आणि समाजाचा विचार करणे आवश्यक ठरते. भारताचे संविधान निर्माण करताना या गोष्टीचा फार चांगल्या प्रकारे विचार करण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीच्या, समाजाच्या मतांचे, अपेक्षांचे प्रतिबिंब आपल्या राज्यघटनेत खूप चांगल्या प्रकारे उमटले आहे. संविधान सभेतील सदस्यांवर विविध विचारसरणीचा प्रभाव होता. भारतीय राज्यघटनेत ते विचार, तत्त्वे येणे साहजिक होते. त्याच बरोबरीने घटनेमध्ये भारतीय मतांचा, विचारांचाही योग्य समन्वय साधण्यात आला आहे.
धर्म, धार्मिक तत्त्वज्ञान भारतीय समाजाचा आत्मा आहे. भारतापासून तो वेगळा करता येत नाही. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष असली तरी त्यात भारतीयांच्या धार्मिक विचारांवर, अभिव्यक्तीवर गदा आणलेली नाही. घटनेने मूलभूत हक्कांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याला संवैधानिक संरक्षण मिळाले आहे. त्यावर उचित बंधने असली तरी व्यक्ती आणि समष्टीच्या पारलौकिक व्यवहारांवर राज्यघटना बंधन घालत नाही. त्या दृष्टीने ती सर्वधर्मसमभावाचा भारतीय विचारच व्यक्त करते.
भारतीय संस्कृतीच्या जवळ जाणारे विचार राज्यधोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही दिसून येतात. ती राज्यावर बंधनकारक नसली तरी धोरण ठरवताना त्यांचा विचार करावा अशी अपेक्षा करण्यात आली आहे.
खरा भारत बघायचा असेल तर तो खेड्यांमध्ये बघायला मिळतो. भारतीय संस्कृतीचे खरे वाहक गावांतील लोक असतात. कलम ४० ग्रामपंचायतीच्या निर्मितीसंबंधी आहे. पुढे भारत सरकारने त्या संबंधाने कायदा केला. कलम ४८ कृषी आणि पशुसंवर्धनासंबंधी आहे. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा दिला आहे. तिच्या संरक्षणाचा उल्लेख तिथे आढळतो. आता गोहत्येला प्रतिबंध करत भारत सरकारने या कलमाला न्याय दिला आहे.
आपल्या संस्कृतीत निसर्गाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. मनुष्यासोबतच प्रकृती आणि प्राणिमात्रांचाही विचार आपण करतो. पर्यावरण, वने आणि वन्यजीवांचा विचारही आपल्या संविधानात केला गेला आहे. भारताची संस्कृती येथील वास्तूंमधून, स्मारकांमधून खूप चांगल्या प्रकारे व्यक्त होते. त्यांच्या संरक्षणाच्या अपेक्षा कलम ४९ मधून व्यक्त होतात. कलम ५१ मधील आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षेचे विचार तर विश्वकल्याणाच्या मूल्याची आठवण करून देतात.
कुठल्याही प्रदेशाची संस्कृती खऱ्या अर्थाने व्यक्त करण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे तिथली भाषा. संविधानाची कलम ३४३ ते ३५१ भारतीय भाषा, त्यांचा वापर आणि विकासाशी संबंधित आहेत. हिंदी भारताची अधिकृत भाषा आहे. तिच्या विकासासोबतच भारतीय संस्कृतीचे सौंदर्य व्यक्त करणार्या संस्कृत भाषेचाही विचार घटनेत करण्यात आला आहे. इतर प्रादेशिक भाषांनाही उचित आदर आणि स्वातंत्र्य आपले संविधान देते. आठव्या परिशिष्टात २२ मान्यताप्राप्त भाषांचा समावेश करण्यात आला आहे. भाषिक अल्पसंख्य समुदायांनाही त्यांच्या भाषा, लिपी आणि संस्कृतीचे जतन करण्याचे स्वातंत्र्य आहे.
कलम ५१ अ नुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात नंतर करण्यात आला. ती तत्त्वेही भारतीय नागरिकांना आपल्या सांस्कृतिक मूल्यांचा आदर, संरक्षण करायला शिकवतात. त्यानुसार आपला देश, संविधान, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, प्रतिक यांचे संरक्षण करणे, राष्ट्राची सेवा, स्वातंत्र्य संग्रामातील आदर्शांचे अनुसरण, हिंसेचा त्याग, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, निसर्गाचा, वने, सरोवर, नद्या, वन्यजीवन यांचा विकास आणि संरक्षण, भूतदया, विविधतेचा, आपल्या समृद्ध वारस्याचा आदर, बंधुभावाची जोपासना, स्त्रियांचा सन्मान आणि असेच इतर मुद्दे येतात.
संविधानात कुठले भाग याव्यात या बाबतीतच नव्हे तर संविधानाच्या सौंदर्याच्या बाबतीतही त्या मधून आपल्या संस्कृतीचे दर्शन व्हावे याची काळजी आपल्या घटनाकारांनी घेतल्याची दिसते. संविधानाच्या लेखनाचे काम प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी कुठले शुल्क घेतले नाही. प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस आणि विश्व भारती शांति निकेतन येथल्या कलाकारांनी काढलेली चित्रे संविधानात दिसतात. रामायणातील राम, लक्ष्मण आणि सीता, महाभारतातील कृष्ण आणि अर्जुन, सिंधू संस्कृतीतील हडप्पा येथील बैलाचे चित्र, वैदिक काळातील गुरुकुल, गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर, ऐतिहासिक महत्त्वाच्या व्यक्ती जसे सम्राट अशोक, विक्रमादित्य, अकबर, शिवाजी महाराज, गुरू गोविंदसिंह, राणी लक्ष्मीबाई यांच्यासह नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यांचे सुद्धा चित्र काढण्यात आले आहे. चोलकालीन जहाज, नटराज आणि हिमालय तसेच समुद्राचे चित्रही रेखाटण्यात आले आहे.
आपली राज्यघटना एक उत्कृष्ट दस्तावेज आणि वारसा आहे. आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब त्यामधे दिसते. या वारस्याचे संरक्षण आणि अनुसरण करणे आपले कर्तव्य आहे. तेच आपली संस्कृती, राष्ट्रीय नेते, संविधान निर्मात्यांच्या त्यागाचे आणि परिश्रमाचे खरे मोल असेल.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या