भारतासह संपूर्ण जगाच्या इतिहासात ०५ ऑगस्टचा दिवस सुवर्ण अक्षरांमधे नोंदवला गेला. त्याचं कारण म्हणजे अयोध्या ; संपुर्ण भारत राष्ट्राचे श्रद्धा स्थान आणि चैतन्याचा स्रोत असलेले प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीवर भव्य श्री राम मंदिर उभारण्यासाठी भूमीपूजन झाले. मा.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच मंदिर निर्माणाचे मार्ग मोकळे झाले हे सर्वश्रुत आहे. पण , मंदिरं बांधण्यापेक्षा तिथे शाळा, कॉलेज, दवाखाने बांधा. मंदिर बांधून कुणाचं भलं झालंय ? असे अनेक प्रश्न उपस्थित करणारे कथित बुद्धिवादी आपल्याकडे आहेतच, अर्थात ते असावे का नसू नयेत ? ते असावेच कारण निंदकाचे घर असावे शेजारी. परंतु आपल्याला आज इतिहासात जायचं नाहीये तर भविष्याकडे बघायचंय ...
श्री राम हे भारतीयच नव्हे तर संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या अवताराच्या वेळी समाज हा हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन इत्यादींमध्ये विभागला गेलेला नव्हता. ते मानवतेच्या कल्याणासाठी पृथ्वीवर आले होते. आज भारतीय लोकांच्या उपासना पद्धती भिन्न असू शकतात, परंतु आपण सर्व एकाच शाश्वत संस्कृतीचा प्रवाह आहोत. आपण सर्व भारतमातेचे पुत्र आहोत. प्रभू श्री राम कुठल्याही जाती, धर्म आणि क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. ते एक शक्तीशाली आणि संघटित राष्ट्र जीवनाचे प्रतीक आहेत. घर, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्वात मर्यादा स्थापित करणाऱ्या प्रभू श्रीरामांना त्यामुळेच मर्यादा पुरुषोत्तम म्हणून संबोधले जाते. जेव्हा त्यांच्या जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारले जाईल, तेव्हा ते कुटुंबापासून संपूर्ण विश्वात श्रद्धा , मर्यादा, समन्वय आणि स्वाभिमानाचा संदेश देणारे ठरेल. हे मंदिर, भारतातील सर्व जातींना पंथांना जोडणारे, सर्व भारतीयांचे राष्ट्रीय स्मारक म्हणून उभे असेल; तसेच, संपूर्ण जगात एकता आणि मर्यादा स्थापन करेन. हे मंदिर विशेषत: सर्व हिंदू आणि बौद्ध विचारांच्या देशांना भारताशी जोडण्यासाठीचा महत्वाचा दुवा ठरेल ह्यात कुठलेच दुमत नाही.
प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर हे केवळ धार्मिक आणि अध्यात्मिक गोष्टींसाठीच असेल असे नाही. मंदिर उभारणी नंतर तिथे मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होणार ह्यात कुठलेच दुमत नाही. फुलं फळांच्या विक्री व्यवसायापासुन ते उत्तर प्रदेशच्या पर्यटनला सुद्धा ह्यामुळे चालना मिळणार आहे. कारण मंदिराचे स्वरूप इतके भव्य असणार आहे की, सगळ्या जगात त्याची चर्चा होणार आहे. परिणामी जगभरातील रामभक्त आणि पर्यटक मंदिराला भेट द्यायला येतील. अयोध्येसारखं शहर सुद्धा येणाऱ्या १०-२० वर्षांत देशाच्या GDP मध्ये आपला वेगळा ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. ज्या प्रमाणे आज तिरुपती बालाजी, शिर्डी, जग्गनाथ पुरी , केदारनाथ , इत्यादी संस्थानं आहेत त्याच प्रमाणे येणाऱ्या काळात प्रभू श्रीराम मंदिर संस्थान हे देशातील अनेक मोठ-मोठ्या धार्मिक संस्थानाचे प्रतिनिधित्व करतांना आपल्याला दिसणार आहे. भारताची श्रद्धा ज्या पवित्र धार्मिक स्थळांशी संबंधित आहे त्यात अयोध्या अग्रेसर आहे. अनेक दैवी महापुरुषांच्या तपश्चर्या , त्याग, आणि बलिदान ह्यांच्यातूनच भारतीय संस्कृतीने पवित्रतेचे स्वरूप प्राप्त केले आहे आणि अयोध्या त्याची साक्षीदार आहे. आणि ज्या वेळेस अयोध्येत रोजगारर्निमिती नंतर आर्थिक उलाढाल वाढेल त्यावेळेस आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा ह्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील ह्याची खात्री आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. ह्या मंदिरच्या भूमिपूजनानंतर जो भव्य दिव्य दीपपूजनाचा कार्यक्रम अयोध्येत झाला त्यात लेझर शो द्वारे प्रभू श्रीरामांच्या जीवनातील अनेक पैलू दाखवण्यात आले होते. ह्यावरूनच आपल्याला कल्पना येऊ शकते कि, अयोध्येत आधुनिकतेचा पुरस्कार करणाऱ्या भव्य मंदिर उभारणीनंतर काय काय होऊ शकेल.
अयोध्येसोबतच लगतच्या पर्यटन स्थळांचा आपसूकच विकास ह्यामुळे होणार आहे. जसं जसं ह्याच प्रस्थ वाढत जाणार आहे तसं तसं रस्ते , पाणी, मुख्यतः वीज ह्याचे प्रश्न आपसूकच सुटत जाणार आहेत. तसेच, सामाजिक आणि आर्थिक विकास प्रगतीपथावर जाणार हे नक्की. हा फक्त अयोध्या अथवा एका प्रदेशाचा विकास नसून ती संपूर्ण भारतवर्षाची सामाजिक आणि अंततः अध्यात्मिक प्रगती असेल.आणि ह्यालाच आपण रामराज्य म्हणतो…
त्यामुळे हे फक्त प्रभू श्रीराम मंदिर नसून ते एक ‘राष्ट्रमंदिर’ आहे. जे सर्वव्यापी असेल, सर्व समावेशक असेल.
- अनुप देशपांडे
© विश्व संवाद केंद्र, देवगिरी.
0 टिप्पण्या