भव्य राममंदिर निधी संकलनातील असाही एक कटु अनुभव...


रोज प्रमाणे आम्ही आजही छ.शिवाजीनगर वस्तीच्या उपवस्ती मध्ये रामजन्मभूमीसाठी निधी संकलनसाठी गेलो. काही कुटुंबांना भेट देऊन झाले होती आणि असेच एक एक करत एका घराची बेल आम्ही वाजवली एक मध्यम वयाच्या व्यक्तीने दरवाजा उघडला आम्ही नेहमी प्रमाणे जय श्री राम म्हणालो. हे ऐकताच त्या व्यक्तीने जोरात दार बंद केले. आम्ही पुढच्या दाराजवळ गेलो तर तोच तो व्यक्ती पुन्हा दार उघडून बाहेर आला आणि अतिशय घाणेरड्या शब्दात त्याने आम्हाला शिविगाळ सुरू केली.



आम्हाला अश्या प्रतिक्रियाची अपेक्षाच नव्हती. तुम्ही माझ्या घरी कसेकाय आलात असे म्हणून मी आता पोलीसांना बोलावतो, असे धमकावणे सुरू केले. योगा योगाने अभियान प्रमुख सुमीत जी या ठिकाणी आमच्या सोबतच होते. त्या व्यक्तीला सामोरे जात त्यांनी त्याच्या समोर हात जोडले आणि तुम्हाला दुखावले असल्यास क्षमस्व म्हणून जय श्री राम असे म्हणाले.

आता तो प्रचंड गरजला थांबा तुम्हाला दाखवतो आणि पोलिसांना बोलवतो असे दुसऱ्यांदा ओरडला. सुमीतजी नम्रपणे आम्ही चुकलो असल्यास आपण पोलिसांना बोलावू शकतात असे निवेदन केले.

मग मात्र त्या व्यक्तीच्या शिव्यांचा स्थर अतिशय खालच्या पातळीवर गेला आणि आवाजाचा स्थर खूप वाढला .
आता आजूबाजूचे नागरिक जमा झाले.

स्वभावाने अत्यंत तापत म्हणून ओळख असलेले आमचे अभियान प्रमुख नम्रपणे त्याच्या प्रत्येक शिवी नंतर श्रीराम... एव्हडेच म्हणत होते. त्याच्या शिव्या आणि आक्रस्ताळेपणा बघून आम्हाला आता आमच्या स्वतःवर संयम ठेवण अवघड होत होतं. परंतु खुद्द प्रमुख शांत उभे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर ना राग ना चिंता ते फक्त हात जोडून श्री राम... इतकेच म्हणत होते.

त्यांच्या या नम्रतेने लोक भावना ते आपल्या बाजूने करत आहेत हे आम्हाला लक्षात आलेच नाही. आता स्थानिक लोकांनीच त्या व्यक्तीला विरोध सुरू केला आणि त्या व्यक्तीला घरात चला व आम्हाला हात जोडून दादा तुम्ही जा आम्ही बघतो यांना तुम्ही जा.. अशी विनंती केली आम्ही जय श्री राम म्हणत पुढे निघालो.

आमच्या मनात त्या व्यक्ती बद्दल अतिशय संताप उफळात होता. कदाचित प्रमुख या ठिकाणी नसते तर तो व्यक्ती आज त्याने दिलेल्या शिव्यांची परत फेड घेऊन दवाखान्यात असता. पण तेच दुसऱ्या बाजूने बघितलं तर अभियान प्रमुख तितकेच शांत होते. त्यांची ही भूमिका आम्हाला अनपेक्षित होती. आम्ही त्यांना म्हणालो आपण का ऐकून घेतलं .? त्यावर ते म्हणाले ते आपल्याला ते वयक्तिक शिव्या देत होते. त्यातून त्यांचा रामाबद्दलचा राग द्वेष दिसत होता. अर्थात हिंदूंच्या बद्दलचा द्वेष पण नव्हता. त्यांनी ना रामाच्या बाबतीत अपशब्द काढला न हिंदूंच्या बद्दल. तसे झाले असता तर मात्र आपण तिथेच त्याला रामभक्तांच्या शक्तीची जाणीव करून दिली असती.

आम्ही विचलित होतो. चिडलेलो होतो आणि ते आम्हाला चालत चालत समर्थ रामदासांच्या जीवनातील एक प्रसंग सांगत होते. जेंव्हा समर्थ भिक्षेसाठी जातात आणि एका घरासमोर उभे राहून भिक्षा मागतात आणि म्हणतात 'जय जय रघुवीर समर्थ' तोच आतून सतीबाई शहापुरकर नावाच्या एक बाई बाहेर येतात आणि समर्थाना अपशब्द बोलून शेणाने भरलेले घर सारवायचे पोतेरे समर्थांना फेकून मारते आणि माझ्या कडे दुसरे काही नाही हेच घे म्हणते. समर्थ ते झोळीत ठेऊन घेतात आणि पुढे निघून जातात काही दिवसांनी समर्थ परत येतात त्या बाईंने फेकलेल्या पोतेऱ्याला धुवून फाडून त्याच्या सुंदर वाती तयार करून समर्थ त्या बाईला परत आणून देतात. त्या बाईला आपल्या वागण्याचा पश्चाताप येतो.

त्याच प्रमाणे मी शांत राहिलो. आता काही काळाच्या नंतर याच व्यक्तीला राम कार्यात घेणे आपलं कर्तव्य आहे. हीच त्याची हार असेल. व्यक्तीला मारून उपयोग नाही त्याचे विचार मारावे आणि नम्रभावाने पाठीमागे न हटता समोर उभे राहून फक्त श्रीराम जाप करत राहणे याने आपण लोकभावना रामभक्तांच्या बाजूने केल्या. समाजाला या कार्यात रामभक्त काय काय सहन करत आपले कार्य करत आहे, त्याने या राम कार्याबद्दल आणि राम मंदिर निर्माण बद्दल त्यांना अंतर्मुख होण्यास निश्चितच भाग पाडण्यात आपण यशस्वी झालो असू हे सांगितले.

आपल्या उग्र प्रतिक्रिये मुळे तेथिल स्थानिक लोक आपल्याच विरोधात गेले असते तर राम भक्त आणि आपल्या कार्याबद्दल त्यांच्या मनात वाईट भाव तयार झाले असते.

या कार्याला बदनाम करण्यासाठी अनेक स्थरावर प्रयत्न चालू आहेत अशा वेळी आपल्या हातून असे कुठलेच कृत्य होऊ नये ज्याने लोक भावना रामकार्याच्या विरोधात जाईल.

आपल्या काहीच न करण्यात खूप काही आपण करून गेलो आहे. त्याच्याच वसाहतीतील लोक त्याच्या कडे विद्वेषाने बघत आहेत आणि आपल्या कडे आदराने हाच श्रीरामांचा विजय.

टिळकांनी सांगितलं आहे लोकमत ही फार मोठी शक्ती आहे आणि आपण नम्रतेने ती आपल्या बाजूने करण्यात यशस्वी झालो आहोत.

आम्ही पुढे चालत होतो प्रमुखांच्या चेहेऱ्यावर स्मिथ हास्य होते आता माझ्या मनाची या प्रसंगाने आलेले विचलित अवस्था शान्त झाली होती तेच पुढचे घर आले आणि त्याच उत्साहाने आम्ही निधी संकलन साठी समोरच्या घराचे दार वाजवले आणि जय जय श्री राम घोषणेने दार उघडणारी व्यक्तीला प्रसन्न मुद्रेने रामजन्मभूमी मंदिर निर्माण साठी स्वइच्छेने निधी द्यावा अशी साद घातली.


- योगेश घादगीने, शिवाजीनगर
संभाजीनगर

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या