त्याग, समर्पण वृत्ती राम


@ मधुरा डांगे

भारत ही त्याग आणि समर्पणाची भूमी आहे असे म्हटले जाते. कारण या देशाने उच्च ध्येयाला गवसणी घालत असतांना अनेक गोष्टींचा, स्वार्थ, सुखाचा त्याग केला आहे. त्याग म्हणजे अलौकिकाच्या किंवा उच्चतम ध्येयाच्या प्राप्तीसाठी लौकिक लोभ, मोह, स्वार्थ दूर सारणे होय. अशी त्यागाची परंपरा समर्पणाने पूर्ण होते. समर्पण म्हणजे तन, मन आणि धनाने आपल्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी स्वार्थराहित काम करणे होय. भारत त्याग आणि समर्पणाची भूमी आहे कारण या देशाने स्वार्थरहित कार्याची अनेक उदाहरणे जगाला दिली आहेत. अशी सर्वस्व अर्पण केलेली संत परंपरा, क्षत्रिय परंपरा या देशाने जगाला दिली आहे.



रामाचे जीवन याच परंपरेने घडले आहे. राम चरित्राचा अभ्यास करत असताना ही गोष्ट अधोरेखित करणे आवश्यक आहे की रामाचे जीवन म्हणजे त्याग आणि समर्पणाने परिपूर्ण असलेले जीवन आहे. रामाच्या अवतार कार्याचा उद्देश धर्म संस्थापनेचा होता. रावण वध हा त्या मार्गावरील एक महत्वाचा टप्पा. इथपर्यंत पोहोचताना रामाने आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. त्याने राजभवनातील ममतेचा त्याग केला, राज्यसुखाचा त्याग केला, ऐश्वर्य आणि वैभवाचा त्याग केला, पत्नीचा आणि पुढे लौकिक संसार सुखाचा त्याग केला. रामाच्या त्याग वृत्तीची परिसीमा तेव्हा लक्षात येते जेव्हा वनवास पूर्ण झाल्यावर राम हनुमंताला सांगतो की भरताला मी येत असल्याचा निरोप दे आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव निरखून ये. त्याला आनंद झाला नसेल आणि राज्यसुखाला सोडायचे नसेल तर मी कायम वनवासी राहीन. असा विचार राम करतो कारण तो समर्पित जीवन जगतो.

त्याग आणि समर्पण या परस्परांच्या सोबतीने येणाऱ्या गोष्टी आहेत. व्यक्ती आपल्या तत्वांच्या प्रति, विचारांच्या प्रति, ध्येयाच्या प्रति समर्पित असेल तरच त्यागाची भावना स्वाभाविक आहे. केवळ गोष्टींवरील अधिकार सोडून दिला म्हणजे त्याग केला असे होत नाही. त्यागात अहंकार नको म्हणजे 'मी त्याग केला' ही भावना नको. पिकलेले पण अलगद गळून पडते तशा गोष्टी अलगद सोडून देता येणे आणि त्यात कोणताही मोह न ठेवणे म्हणजे त्याग. ही त्यागाची परिभाषा समर्पित व्यक्तीच पूर्ण करू शकते. रामाचा त्याग या अर्थाने मोठा ठरतो. राम आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटांशी लढला, तत्वांच्या प्रस्थापनेसाठी लढला. राम विचारांच्या प्रति एकनिष्ठ राहिला, दिलेल्या शब्दाला जागला, त्याच्या उद्दिष्टांच्या प्रति समर्पित राहिला म्हणून असामान्य त्याग करणे त्याला शक्य झाले. गीत रामायणात राम म्हणतो -

प्राणही प्रसंगी देणे प्रजासुखासाठी
हीच ठाम श्रद्धा माझ्या वसे नित्य पोटी
मिठी सोडवू मी धजलो म्हणून मैथिलीची

रामाने केलेला त्याग हा त्याच्या लोकपालक रुपाशी असणाऱ्या समर्पित वृत्तीतून शक्य झाला हे यातून स्पष्ट होते. असे लोकपालकत्व हे कर्तव्याच्या भावनेतून आणि अशी कर्तव्य भावना तत्वांच्या परिपक्वतेतून जन्माला येते. रामाचे जीवन अगणित अनुभवांतून असे अधिकाधिक समृद्ध होत गेले आहे.

राम त्याच्या समर्पिततेचा आणि त्यागाचा कधी गाजावाजा करीत नाही. तो ते कर्तव्य म्हणून जगतो. रामाच्या अश्वमेध यज्ञाच्या प्रसंगी जेव्हा लव आणि कुश हे रामपुत्र प्रत्यक्ष रामासमोर रामचरित्र गायन करतात तेव्हा कदाचित रामाला आपल्या आयुष्यातील प्रसंगांची अधिक तीव्रतेने जाणीव झाली असावी. गीत रामायणकार 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' असे एक सुरेख वाक्य रामाच्या भावविभोर अवस्थेसाठी वापरतात. राम त्या गायनातून जणू त्याचे संपूर्ण आयुष्य पुन्हा जगतो आणि पुन्हा एकदा सगळी भावावस्था मागे सारून कर्तव्याच्या साठी दक्ष होतो. इथे राम त्याच्या उत्कट प्रतिमेत अडकत नाही ही सजगता आहे. अंगी रुजलेल्या विनम्रतेतून आणि पराकोटीच्या समर्पित वृत्तीतून आलेली ही सजगता आहे.

रामाला समाजाने देवत्व दिले तो त्याच्या त्याग आणि समर्पणाचा मोठा सन्मान ठरला. अलौकिक पुरुष आपल्या आयुष्यात सन्मान मिळवण्याची धडपड करीत नाहीत कारण त्यांचे ध्येय मोठे असते; परंतु त्यांच्या कार्याचा यशस्वितेची पावती ही समाजाने त्यांच्या केलेल्या सन्मानातून मिळते. या अर्थाने राम अत्यंत यशस्वी ठरला असेच म्हणावे लागेल.

रामाच्या त्याग आणि समर्पित वृत्तीला विश्वगौरव प्राप्त करून देण्याचे कार्य म्हणजे भव्य राम मंदिर निर्माणाचे कार्य आहे. हे मंदिर निर्माण व्हावे म्हणून अगणित राम भक्तांनी आपले जीवन समर्पित केले, आपल्या सुखांचा त्याग केला. त्या सर्व राम सेवकांच्या घरून राम मंदिराच्या बांधणीसाठी आणली जाणारी माती म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव आहे, त्यांच्या सर्वोच्च समर्पणाचा सन्मान आहे. ही समर्पित वृत्ती आणि त्यागभावना मनात जागवणे म्हणजे रामाचे काम करणे आहे. मा. सरकार्यवाह एका ठिकाणी म्हणाले, 'राम मंदिरासाठी केले जाणारे निधी संकलन हा धन संचय नाही; हे समर्पण आहे.' हा शुद्ध हेतू जनमानसात जागृत करण्याचा हा काळ आहे. रामाने आपल्या आयुष्यात घालून दिलेल्या आदर्शांना जगण्याचा आणि रामतत्व अंगी बाणवण्याचा काळ आहे. हाच रामाच्या त्यागाचा आणि समर्पित वृत्तीचा खरा सन्मान आहे.

- मधुरा गजानन डांगे, नंदुरबार

@ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या