भारतीय जनमानसावर रामायण महाकाव्याचा मोठा प्रभाव आहे. प्रचंड प्रमाणात सांस्कृतिक वैविध्य असणाऱ्या आपल्या देशातील प्रत्येक सांप्रदायिक परंपरेने आणि लोकपरंपरेने विविध रूपांत रामकथेचे जतन केले आहे. त्यामुळे रामकथेची अनेक संस्करणे निर्माण झाली आहेत.
आजच्या लेखात आपण एक वेगळी मांडणी बघणार आहोत. जैन परंपरेने रामायणाचे जे संस्करण लिहिले त्याला 'पउमचरियम' असे म्हटले गेले आहे. यालाच संस्कृत मध्ये 'पद्मचरित्र' असेही काही ठिकाणी म्हटले गेले आहे. जैन रामयणांमध्ये देखील पुष्कळ विविधता आहेत. त्यापैकी विमलसुरी यांनी लिहिलेले रामायण प्रधान मानले जाते.
जैन रामायणात रामाचे नाव पद्म तर लक्ष्मणाने नाव नारायण असल्याचे सांगितले जाते. जैन परंपरेनुसार ६३ शलाका पुरुष मानले गेले आहेत, जे विविध काळात पृथ्वीवर जन्माला येणारे प्रभावशाली पुरुष असतात. यात २४ तीर्थंकर आहेत जे धर्मसंस्थेचे संचालन आणि नियमन करतात, १२ चक्रवर्ती आहेत जे राजसत्तेचे नियमन आणि संचालन करतात. याशिवाय ९ बलदेव, ९ वासुदेव आणि ९ प्रति - वासुदेव आहेत.
रामाला ८ वा बलभद्र किंवा बलदेव मानले गेले आहे, लक्ष्मणाला वासुदेव तर रावणाला प्रति - वासुदेव मानले गेले आहे. प्रस्तुत संस्कारणात रामाच्या जन्माच्या कथेत यज्ञ केल्याचे दिसत नाही तर तिन्ही राण्यांना त्या त्या अवतारांच्या संबंधी स्वप्न पडले असल्याचे दिसते. पद्म (राम), नारायण (लक्ष्मण), भरत आणि शत्रुघ्न असे हे चार बंधू आहेत. पुढे हे कुमार तरुण झाल्यानंतर राजा दशरथाला वैराग्य उत्पन्न होते व तो दीक्षा घेण्याचे ठरवतो. दीक्षा समारंभाच्या आधी रामाला अर्थात राजकुमार पद्म याला राजा करावे असे ठरवतो. दशरथ राजा दीक्षा घेणार असल्याचे ऐकून भरत देखील दीक्षा घेऊ इच्छितो. राणी कैकयी एकाच वेळी पती आणि पुत्र यांच्या वियोगाच्या कल्पनेने व्याकुळ होते. ती राजाला पूर्वी युद्धात केलेल्या मदतीचे आणि त्यावेळी राजाने तिला दिलेल्या वराचे स्मरण करून देते. वराच्या अनुसार ती भरताला राज्य मागते. दशरथ रामाशी विचारविनिमय करून हा प्रस्ताव मान्य करतो व भरताला राज्याभिषेक करावयाचे ठरते. परंतु मुळात वैराग्य धारण केलेला भरत या निर्णयाला विरोध करतो. राम विचार करतो की आपण इथे असलो तर भरत राज्याभिषेकाला तयार होणार नाही म्हणून तो स्वतःच वनवासात जाण्याचे निश्चित करतो. त्याच्यासोबत लक्ष्मण व सीता देखील जातात. राज्यातील नागरिक, मंत्री, भरत, कैकयी हे सगळे रामाला समजावण्याचा प्रयत्न करतात मात्र राम ऐकत नाही व वनात जातो.
वनात तो अनेक जैन तीर्थस्थानांना भेटी देतो, अनेक मुमुक्षूंचा उद्धार करतो. सीताहरण प्रसंगात लक्ष्मण मायावी राक्षसांशी युद्ध करतांना दिसतो तर राम हा सीतेचे रक्षण करीत असतो. मायावी राक्षस लक्ष्मणाच्या आवाजात रामाला मदतीसाठी हाक मारतात. सीतेच्या मनात असणाऱ्या मातृभावामुळे ती रामाला पुत्र लक्ष्मणाच्या मदतीस जाण्यास सांगते. राम गेल्यावर रावण तिथे येतो व सीतेचे हरण करतो.
रामायणाचा परमोच्च बिंदू असणाऱ्या रावण वधाच्या प्रसंगात असे दिसते की रावणाचे सगळे बंधू, पुत्र मारले गेल्यानंतर त्याला त्याच्या चुकीची जाणीव होते मात्र आता माघार घेणे कमीपणाचे आहे असे वाटून तो युद्धात उतरतो. रावणाचा वध लक्ष्मणाच्या हातून होतो. लक्ष्मण रावणाच्या वक्षस्थळी वार करतो व रावणाचा मृत्यू होतो असे दिसते.
कथेच्या शेवटी राम अहिंसक तत्वाच्या पालनाने मोक्षाची प्राप्ती करतो तर सीतेला स्वर्गस्थ देवतेचे स्थान मिळते. जैन रामायणातील कथेचे हे संक्षिप्त स्वरूप आहे. जैन तत्वज्ञान आणि परंपरेच्या आधारावर प्रस्तुत रामायणातील गोष्टींची रचना केल्याचे लक्षात येते. म्हणजे दशरथ राजाचे दीक्षा घेणे, उत्तररामकथेत रामाचे दीक्षा घेऊन मोक्ष प्राप्त करणे, रामाचे अहिंसकत्व या बाबी यातून अधोरेखित होतात. बलदेव, वासुदेव आणि प्रति - वासुदेव यांच्या अवतारांच्या संबंधात काही पारंपरिक संकेत आहेत. जसे बलदेव आणि वासुदेव शक्यतो बंधू असतात तर प्रति - वासुदेव हे खलनायक असतात. अशा पारंपरिक संकेतांचे अनुसरण कथेत अचूकपणे आल्याचे दिसते.
राम म्हणजे आदर्श असे विधान करत असताना हे लक्षात घेणे आवश्यक ठरते की त्या त्या सांप्रदायिक आदर्शांच्या स्वरूपात रामाला स्थान देऊन काव्याची रचना केली गेली आहे. पउमचरियम अर्थात जैन रामायणाचे या दृष्टीने भारतीय साहित्यात महत्वाचे स्थान आहे.
- मधुरा गजानन डांगे,
नंदुरबार
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या