भारतीय इतिहासाच्या दृष्टीने बौद्ध तत्वज्ञानाचे एक वेगळे महत्व आहे. प्राचीन भारतीय सामाजिक - राजकीय व्यवस्थेला बौद्ध तत्त्वज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रभावित केले. केवळ भारतातच नाही तर चीन, जपान, श्रीलंका सारख्या देशांमध्ये देखील बौद्ध तत्वज्ञानाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला.
बौद्धांनी मोठ्या प्रमाणात सांप्रदायिक साहित्य निर्माण केले. बुद्धाच्या पूर्वजन्मांच्या गोष्टी सांगणाऱ्या जातक कथांचे साहित्यिक मूल्य उल्लेखनीय आहे. यातील 'दशरथ जातक' हे बौद्ध परंपरेतील रामाची कथा सांगणारे जातक आहे. यातील रामकथेची मांडणी अत्यंत रंजक आहे.
जातक कथेत सांगितल्यानुसार - बनारस येथे दशरथ नावाचा एक राजा राज्य करीत असतो. त्याला त्यांच्या पहिल्या राणीपासून 3 अपत्य होतात. मोठ्या मुलाचे नाव राम पंडित (राम), दुसऱ्या मुलाचे नाव लख्खन (लक्ष्मण) आणि मुलीचे नाव सीता असे असते. पुढे या राणीचे निधन होते. राजाला मोठा शोक होतो आणि त्यामुळे राज्यकारभाराकडे त्याचे दुर्लक्ष होऊ लागते. राजाचे मंत्रिमंडळ राजाला दुसरा विवाह करण्याचा सल्ला देते. त्यानुसार कालांतराने राजाचा दुसरा विवाह होतो. या राणीपासून त्याला एक मुलगा होतो ज्याचे नाव भरत असे असते. राजाचे या मुलावर अत्यंत प्रेम असतो. यामुळे राजा राणीला मुलासाठी एक वर माग असे सांगतो. राणी तो वर राखून ठेवते. कालांतराने भरत किशोर अवस्थेत आल्यानंतर राणी दशरथाकडे राखून ठेवलेल्या वराने भरताला राज्य द्यावे अशी मागणी करते. राजाला राग येतो व तो या मागणीला नकार देतो. राणी मात्र आपल्या मागणीपासून मागे हटत नाही. दशरथाला भीती वाटते की राणी रागाच्या भरात राम व लक्ष्मणाला काही इजा करू शकेल.
एके दिवशी राजा भविष्य जाणणाऱ्या विद्वानांना स्वतःची आयुर्मर्यादा विचारतो. विद्वान असे भाकीत करतात की अजून 12 वर्षे राजाचे आयुर्मान शिल्लक आहे. राजा राम आणि लक्ष्मणाला राणीच्या वराविषयी व स्वतःच्या मनात असणाऱ्या शंकेविषयी बोलून दाखवतो व असे सुचवतो की दोन्ही कुमारांनी 12 वर्षे दुसऱ्या राज्यात किंवा वनात जाऊन राहावे. राजाच्या मृत्यूनंतर वनातून परत येऊन त्यांनी राज्य आपल्या हाती घ्यावे. राजाच्या सूचनेनुसार राम व लक्ष्मण वनात जायला निघतात तेव्हा सीता देखील त्यांच्यासोबत निघते. तिघे हिमालयात येतात व कुटी बांधून राहू लागतात.
इकडे राजा पुत्रांच्या वियोगामुळे आजारी पडतो व 9 व्या वर्षीच गतप्राण होतो. तेव्हा राणी भरताला राज्याभिषेक करण्याचा आदेश देते. यावेळी दरबारातील मंत्री राजाच्या सुचनेविषयी माहिती देतात व राज्य रामालाच दिले जाईल असे सांगतात. हा वृत्तांत ऐकून भरत रामाच्या शोधार्थ वनात जातो. शोध घेत तो हिमालयात पोहोचतो. तिथे एका कुटीच्या बाहेर राम बसलेले दिसतात. भरत त्यांच्याजवळ जाऊन राजा दशरथाच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त करतो, खूप दुःखी होतो, विलाप करतो व रामाला राज्याची सूत्रे हाती घेण्याची विनंती करतो. दरम्यान वनात अन्नशोधार्थ गेलेले लक्ष्मण व सीता येतात आणि वडिलांच्या निधनाची वार्ता ऐकून अत्यंत कष्टी होतात. राम मात्र अजिबात विचलित होत नाहीत. भरत रामाला या स्थिरतेचे रहस्य विचारतो. स्थिरचित्त आणि वैराग्य प्राप्त झालेले राम भरताला जीवनाच्या नश्वरतेचा उपदेश करतात आणि दुःखाला जिंकण्याचा मार्ग सांगतात. हा उपदेश ऐकून भरत सावरतो व रामाला बनारसला परत येण्याची विनंती करतो. राम नकार देतात. वडिलांनी दिलेली 12 वर्षे वनात राहण्याची आज्ञा मोडणार नाही असे सांगतात. भरत राज्यकारभार सांभाळण्यास नकार देतो. तेव्हा राम आपल्या पादुका त्याला देतात व लक्ष्मण आणि सीता यांनाही राज्यात परत घेऊन जाण्यास सांगतात.
3 वर्षे भरत त्या पादुका सिंहासनावर ठेऊन राज्याचा भार सांभाळतो. या पादुका विलक्षण असल्याचे कथेत सांगितले आहे. एखादा निवाडा चुकीचा झाल्यास या पादुका एकमेकांवर आदळत असत व निवाडा योग्य असल्यास शांत राहत असत. 3 वर्षे पूर्ण झाल्यावर राम बनारस मधील एका उद्यानात येतात. रामाच्या येण्याची वार्ता कळताच सर्व नगरजन त्यांचे जंगी स्वागत करतात व रामाला राज्याभिषेक करतात. यावेळी सीतेला राणी म्हणून अभिषेक केला जातो. पुढे रामाने 16,000 वर्षे राज्य केल्याचे कथेत सांगितले आहे.
बौद्ध परंपरेनुसार या कथेतील राम म्हणजे स्वतः बुद्ध असल्याचे मानले गेले आहे. बौद्ध परंपरेतील ही कथा वेगळ्या धाटणीची आहे. यात राम - सीतेचा विवाह, सीतेचे हरण, रावणाचा वध अशा कोणत्याही बाबीचा उल्लेख नाही. मात्र रामाच्या वचन पालनाची तत्परता, स्थिरता, वैराग्य, निर्लोभी वृत्ती, संयम या गुणांना अधोरेखीत केले आहे.
दुःख हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि मृत्यू हेच अंतिम सत्य आहे या आशयाचा उपदेश रामाच्या तोंडी देऊन बौद्ध परंपरेने जगण्याच्या तत्वज्ञानाला अधोरेखित केले आहे. केवळ साहित्यिक दृष्टीने नाही तर ऐतिहासिक दृष्टीने देखील बौद्ध परंपरेतील रामकथेचे महत्त्व उल्लेखनीय आहे.
- मधुरा गजानन डांगे, नंदुरबार
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या