रामो राजमणी सदा विजयते - भाग ३'खोतानी रामकथा'


   
   तिबेटच्या वायव्येला तरीम नदीच्या खोऱ्यात असणाऱ्या भागास पूर्वी खोतान म्हणून ओळखले जात असे. या भागातील लोकांची बोलीभाषा गांधारी असून ते भारतीय संस्कृतीशी जोडले गेले होते. या भागात देखील रामकथेचा प्रसार झाल्याचे दिसते. खोतानी रामकथा ही तिबेटन रामकथेच्या जवळपास जाणारी असल्याचे दिसते मात्र तरीही या दोन कथांच्या तपशिलात थोडा फरक दिसतो.

   खोतानी राजे हे बौद्धांचे अनुयायी होते. त्यामुळे या कथेवर बौद्ध तत्वज्ञानाचा थोडा प्रभाव आढळतो.

   खोतानी कथेच्या अनुसार दशरथ राजाचे नाव सहस्रबाहु असे सांगितले आहे. एकदा राजा सहस्रबाहु जंगलात शिकारीला गेला असतांना त्याची एका ब्राह्मणाशी भेट होते. ब्राह्मणाला त्याच्या तपश्चर्येने कामधेनू गाईची प्राप्ती झालेली असते. कामधेनूच्या मदतीने ब्राह्मण राजाचे अगदी जंगी स्वागत करतो व यथायोग्य आदर - सत्कार करतो. राजा परत निघतांना ती गाय घेऊन जातो. ही बातमी ब्राह्मणपुत्र परशुरामाला कळते. तो कामधेनू परत मिळवण्यासाठी राजा सहस्रबाहुशी युद्ध करतो. या युद्धात राजा मारला जातो. परशुरामाच्या भीतीने सहस्रबाहुची राणी आपले दोन्ही पुत्र राम आणि रैषमा (लक्ष्मण) यांना पृथ्वीच्या आत लपवून ठेवते. हे दोघे बंधू १२ वर्षांनी बाहेर येतात. राम हा श्रेष्ठ धनुर्धारी होता. त्याने राज्याचा कारभार आपल्या भावाच्या हाती दिला व तो आपल्या पित्याला मारणाऱ्या परशुरामाच्या शोधात निघाला. पुढे राम आणि परशुराम यांचे युद्ध होऊन रामाने परशुरामाचा वध केला.

   दुसऱ्या बाजूला दानवराज दशग्रीव (रावण) यांच्या घरी कन्या जन्माला येते. जन्माला आल्याबरोबर भविष्यवेत्ते सांगतात की ही कन्या तिच्या पित्याच्या आणि संपूर्ण दानव कुळाच्या अंताचे कारण ठरेल. हे भविष्य ऐकून दशग्रीव राजा कन्येला एका पेटाऱ्यात ठेऊन नदीत सोडून देतो. हा पेटारा एक ऋषींना सापडतो. ते कन्येला घरी घेऊन जातात व तिचा सांभाळ करतात. तिचे नाव सीता ठेवतात. ती वनात ऋषींनी आखून दिलेल्या रक्षा वलयात राहत असते.
वनात फिरत असताना राम आणि रैषमा यांना सीता दिसते व ते तिच्यावर मोहित होतात. कथेत त्यांच्या विवाहाचे वगैरे तपशील आढळत नाहीत. राम, सीता आणि रैषमा तिघेही वनात राहू लागतात.

   एके दिवशी सीतेला सुवर्णमृग दिसतो. असे वर्णन आहे की या मृगाला १०० डोळे होते. राम आणि लक्ष्मण (रैषमा) मृगाचा माग घेत जंगलात जातात. दरम्यान दशग्रीव राजाने सीतेला बघितलेले असते. ही आपलीच मुलगी आहे हे न जाणून तो तिच्यावर मोहित होतो. राम आणि लक्ष्मण तिच्या सोबत नाहीत हे पाहून तो तिच्या कुटीजवळ येतो मात्र रक्षावलय पार करू शकत नाही. त्यानंतर भिक्षुकाचा वेष घेऊन तो सीतेला वलयाच्या बाहेर येण्यास भाग पाडतो व तिचे हरण करतो.

   पुढे राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ फिरत असताना त्यांची भेट एक वृद्ध वानराशी होते. त्याच परिसरात दोन बंधू राज्यप्राप्ती साठी युद्ध करत असतात. त्यापैकी एकाचे नाव नंद तर एकाचे नाव सुग्रीव असे असते. रामाची नंद नामक वानर कुमाराशी मैत्री होते. ते सुग्रीवाचा वध करतात. नंद सीतेच्या शोधार्थ संपूर्ण वानर सैन्य पाठवतो. त्यांना अशी आज्ञा दिली जाते की सात दिवसात सीतेचा शोध लागला नाही तर सर्व वानर गणांचे डोळे काढले जातील. सहा दिवस होतात मात्र सीतेचा शोध लागत नाही. सातव्या दिवशी लफुस नामक एक वानरी एका कावळीचे बोलणे ऐकते. कावळी आपल्या पिल्लांना सांगत असते की सीतेला दशग्रीव राजा घेऊन गेला आहे. तिचे ठिकाण वानरांना सापडणार नाही त्यामुळे त्यांचे डोळे काढले जातील. याचा अर्थ उद्या आपल्याला मेजवानी मिळणार आहे. अशारितीने वानर गणांना सीतेच्या स्थानाची माहिती मिळाली. ही माहिती राम रैषमा यांना देण्यात आली.

   राम आणि रैषमा वानर सैन्यासोबत समुद्रकिनारी आले. तिथे आल्यावर नंद राजाने माहिती दिली की त्याला मिळालेल्या ब्रह्माच्या वरदानामुळे तो ज्या दगडाला हात लावेल तो दगड पाण्यावर तरंगेल. अशाप्रकारे नंद राजाच्या मदतीने समुद्रात सेतू बांधला जातो व वानर सैन्य लंकेत पोहोचते.

  वानर सैन्याचा कोलाहल ऐकून दानवराज दशग्रीव उत्तेजित होतो. तो संपूर्ण वानर सेनेवर नाग अस्त्राचा प्रयोग करतो. राम नाग पाशात कैद होतात. तेव्हा वानरराज नंद आकाशमार्गे संजीवनी असणारा हिमवंत पर्वत उचलून आणतात. संजीवनीच्या प्रयोगाने राम स्वस्थ होतात.

   कथेत पुढे असे म्हटले आहे की युद्धात विजय मिळवण्यासाठी राम दशग्रीव राजाची कुंडली बघतात. यातून त्यांना कळते की दशग्रीव राजाचा जीव त्याच्या अंगठ्यात आहे. राम युक्तीने दशग्रीवाला अंगठा दाखविण्यास प्रवृत्त करतात व त्याचवेळी प्रहार करून त्याला बेशुद्ध करतात. इथे राम दशग्रीवाचा वध करत नाहीत तर तो शरण झाल्यानंतर त्याला उपदेश करून मुक्त करतात. हा या कथेवर असणारा बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव आहे.

   पुढे राम आणि रैषमा यांनी सीतेसह १०० वर्षे राज्य केले. नंतर लोकापवादामुळे सीतेने पृथ्वीच्या पोटात प्रवेश केला. परंपरेच्या अनुसार राम म्हणजेच शाक्यमुनी बुद्ध आहे. त्यांनी दशग्रीवाला केलेला उपदेश 'लंकावतार सूत्र' या ग्रंथात सांगितला आहे.

   प्रस्तुत कथेची अजून काही संस्करणे असण्याची शक्यता आहे. यामध्ये कमी - अधिक प्रमाणात तपशिलात वैविध्य असू शकते.

- मधुरा गजानन डांगे,
  नंदुरबार. 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या