रामो राजमणी सदा विजयते - भाग ४तिबेट मधील प्रचलित रामायण



     तिबेट मध्ये प्रचलित असलेल्या रामकथेचे काल बघितलेल्या खोतानी रामकथेशी काही प्रमाणात साम्य आहे मात्र या दोन्ही रामायणांमध्ये काही मूलभूत फरक आढळतात. तिबेटमधील रामकथेचे संदर्भ तुलनेने अधिक प्रमाणात मिळत असल्याने तपशील जास्त उपलब्ध होतो. तिबेटमध्ये प्रचलित असलेली रामकथा सांगणारी अनेक हस्तलिखिते तिबेटच्या आसपासच्या प्रदेशात उपलब्ध झाली आहेत.

   तिबेटच्या कथेनुसार दशरथ राजा देवासुर संग्रामात जखमी होतो. तो अयोध्येत परत आल्यावर त्याची राणी केकेया (कैकयी) त्याच्यावर उपचार करते व त्याला संपूर्ण बरे करते. तब्येत बरी झाल्यावर प्रसन्न झालेला राजा राणी केकेयाला एक वर मागण्यास सांगतो. हा वर ती राखून ठेवते. पुढे राजा दशरथ जेव्हा त्याचा ज्येष्ठ पुत्र रामन याला राज्याभिषेक करण्याचे जाहीर करतो तेव्हा केकेया राखून ठेवलेल्या वराने स्वतःच्या पुत्रासाठी राज्य व रामन साठी १२ वर्षांचा वनवास मागते. वडिलांच्या आज्ञेनुसार रामन त्याची पत्नी सीता हिच्यासह वनवासात जातो.

   प्रस्तुत रामकथेत सीतेच्या जन्माची कथा ही खोतानी रामायणाशी जुळणारी आहे. या कथेत देखील सीता ही रावणाची मुलगी असल्याचे म्हटले आहे. तिच्या जन्मानंतर असे भाकीत वर्तविले जाते की ही पित्याच्या व संपूर्ण दानव वंशाच्या नाशाचे कारण ठरेल. त्यामुळे तिला तांब्याच्या पेटीत ठेऊन नदीत सोडून दिले जाते. पुढे ती एका शेतकऱ्याला सापडते. तो तिला घरी घेऊन जातो व तिचे पालनपोषण करतो. या कन्येचे नाव रौलरेंडमा असे ठेवले जाते. कालांतराने तिचा रामाशी विवाह होतो व तिचे नाव सीता असे ठेवले जाते.

     कथेच्या काही संस्कारणांच्या अनुसार राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात जातात तर काही ठिकाणी केवळ राम आणि सीता वनवासात जातात असे उल्लेख आहेत.

     रामन आणि सीता वनवासात असतांना राजा रावणाला सीतेच्या सौंदर्याने भुरळ पडते व तो तिचे हरण करण्याचे ठरवतो. त्यानुसार रावणाची बहीण स्लावियडमा (शूर्पणखा) ही मृगाचे रुप घेऊन रामनचे लक्ष विचलित करते. काही ठिकाणी दिलेल्या उल्लेखानुसार रामन आणि त्याचा भाऊ लगसना (लक्ष्मण) हे दोघे तर काही ठिकाणी असलेल्या उल्लेखानुसार केवळ रामन त्या मृगाचा पाठलाग करतात व सीतेपासून दूर जातात.

    इकडे लपून बसलेला रावण सीतेसमोर आधी हत्तीच्या रूपात, नंतर घोड्याच्या रूपात प्रकट होतो मात्र ती त्याच्यावर बसण्याचे नाकारते. तिच्या जवळ गेलो तर भस्म होऊ या भीतीने रावण तिची कुटी असणारा संपूर्ण भूखंड उचलून नेतो.

       रामन आणि लगसना (लक्ष्मण) मृगाची शिकार करू शकत नाहीत आणि कुटीच्या दिशेला परत येतात तेव्हा त्यांना सीतेचे हरण झाल्याचे लक्षात येते. ते सीतेच्या शोधार्थ निघतात. वाटेत त्यांना एक गरम पाण्याची नदी लागते. तिचा स्रोत म्हणजे राज्यासाठी लढणाऱ्या बब्ले (बाली) आणि सुग्रीव यांचा घाम असतो. रामन सुग्रीवाची मदत करतात व बालीचा वध करतात. सुग्रीव रामन आणि शिवपुत्र हनुमान यांची भेट घडवून आणतात. हनुमान त्रिनेत्रधारी आणि सर्वज्ञानी असतो. रामनकडून सीता हरणाचे वृत्त ऐकून हनुमान एका उडीत लंकेत जातो. तिथे सीतेचा शोध घेऊन तिला स्वतःचा परिचय रामाचा दूत म्हणून करून देतो. ओळख म्हणून रामनची अंगठी व संदेश देतो. यात काही ठिकाणी रामननी सीतेला पत्र दिले होते असे म्हटले आहे आणि सीतेनेही परतीचा संदेश म्हणून पत्र लिहिले असे म्हटले आहे. मात्र याबद्दल खात्रीलायक माहिती सापडत नाही. सीतेची भेट घेऊन हनुमान परत रामनकडे येतो व सीतेचा संदेश रामनपर्यंत पोहोचवतो.

       हनुमानाने आणलेल्या माहितीनुसार वानर सेनेसह रामन समुद्रकिनारी येतात. सेतू बांधतात व लंकेत प्रवेश करतात. रावणाची सेना व वानर सेना यांच्यात युद्ध सुरू होते. प्रस्तुत कथेनुसार रावणाचा भाऊ कुंभकर्ण हा तपस्यारत होता. वानर सेना त्याचा कानात काशाचा रस टाकते त्यामुळे तो जागृत होतो. त्याच्या निश्वासामुळे रामन व हनुमान वगळता संपूर्ण वानरसेना मरणासन्न होते. तेव्हा हनुमान हिमगिरी पर्वत उचलून आणतो. रामन स्वतः त्या पर्वतावरील औषधे शोधून वानरसेनेचा उपचार करतात व संपूर्ण सेना पुन्हा जिवंत करतात. पुढे युद्धात रामन रावणाचे अश्वाचे शीर कापून त्याचा वध करतात.

       रावणाचे अश्वाचे शीर असणे यामागे देखील तिबेटी रामायणात एक रंजक कथा आहे. असे मानले जाते की रावणाने शंकराला प्रसन्न करण्यासाठी आपली १० शिरे अर्पण केली त्यामुळे त्याच्या शरीरावर केवळ १० माना शिल्लक राहिल्या म्हणून त्याला दशग्रीव असे म्हटले गेले. रावणाच्या या कृतीने प्रसन्न होऊन शंकराने त्याला असा वर दिला की जोवर तुझे अश्वाचे शीर कापले जात नाही तोवर तुझा मृत्यू होणार नाही.
यामुळे रावणाला चिरकाल अमरत्व प्राप्त झाले. रामन यांनी रावणाचे बरोबर अश्वाचे शीर कापून त्याचा वध केला.

      रावणाच्या वधानंतर रामन आणि सीता अयोध्येत आले व राज्य करू लागले. कथेच्या एक संस्कारणानुसार असे सांगितले आहे की रामायणाच्या उत्तरार्धात रामन सीतेचा त्याग करतात मात्र हनुमान त्यांना समजावतात व सीतेच्या शुद्धत्वाची खात्री देतात. त्याच्या मार्गदर्शनाने रामन सीतेला व त्यांच्या दोन्ही पुत्रांना राज्यात परत आणतात आणि पुष्कळ काळ सुखाने राज्य करतात.

       खोतानी रामकथेप्रमाणे तिबेटी रामकथेत देखील सीता ही रावणाची कन्या आहे व तिच्याविषयीच्या भाकितामुळे रावणाने तिचा त्याग केला आहे. दोन्हीही कथांमध्ये राम आणि सीतेच्या विवाहाचे फारसे तपशील आढळत नाहीत. दोन्ही ठिकाणी राम मृगाच्या शिकारीसाठी गेल्यावर रावण सीतेचे हरण करतो असा उल्लेख आहे. या दोन्ही रामकथांमध्ये मूलभूत फरक असा की खोतानी रामायणात राम रावणाचा वध करत नाही तर त्याला मुक्तीमार्गाचा उपदेश करतात. इथे तिबेटी रामायणात मात्र राम रावणाचा वध करतांना दिसतात. शिवाय तिबेटी रामकथेत हनुमानाच्या सांगण्याने राम सीतेला आणि पुत्रांना परत राज्यात आणतात व सुखाने राज्य करतात अशा तपशिलाच्या आधारे शेवट आनंदी करण्यावर भर असल्याचे दिसते.

      अशारितीने रामकथेचा प्रवास बघत असताना भाषा, प्रादेशिक संस्कृती, सामाजिक रचना, विविध सांप्रदायिक विचारांचा प्रभाव अशा विविध बाबींच्या विविधतेतून बदलत जाणारी साहित्याची संस्करणे रंजकतेने पहावयास मिळतात.

- मधुरा गजानन डांगे,
   नंदुरबार. 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या