रामो राजमणी सदा विजयते - भाग ५बौद्ध धर्माच्या चिनी संस्करणात 'रामकथा'



    चिनी साहित्यात रामकथेची विशेष रचना आढळत नाही. चीनमध्ये असणाऱ्या बौद्ध संप्रदायाच्या प्रभावामुळे अनेक बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषांतर आणि संस्करण निर्माण झाले आहेत. यापैकी त्रिपिटक नावाच्या बौद्ध धर्मग्रंथांच्या चिनी संस्करणात दशरथ कथानम् आणि अनामकं जातकं नावाच्या दोन रचना रामायणाशी साधर्म्य राखणाऱ्या आढळतात. पैकी अनामकं जातकं ही प्रचलित कथा आहे. या कथेत कोणत्याही पात्राला नाव नाही मात्र त्याचा आशय संपूर्णपणे रामकथेशी जुळणारा आहे. ही कथा वाल्मिकी रामायणाशी पुष्कळ साधर्म्य राखणारी आहे.

   अनामकं जातकं च्या अनुसार बोधिसत्व एका मोठ्या राज्याचा सम्राट होता. त्याचे राज्य अत्यंत समृद्ध आणि भरभराटीला आलेले होते. बोधिसत्वाचा एक काका देखील एका दुसऱ्या साम्राज्याचा राजा होता. मात्र तो अत्यंत जुलमी आणि युद्धखोर स्वभावाचा होता. त्याला बोधिसत्वाचे राज्य जिंकण्याची महत्वाकांक्षा होती. त्यामुळे त्याने मोठ्या सैन्याच्या साथीने बोधिसत्वाच्या राज्यावर आक्रमण केले. बोधिसत्वाचे मंत्री आणि आणि सैनिक यांनी जुलमी दास्यत्व स्वीकारण्यास नकार दिला व युद्धाला सुरुवात झाली.

   एके दिवशी बोधिसत्व युद्धभूमीचे निरीक्षण करत असताना त्याच्या मनात विचार आला की केवळ माझ्या एकामुळे एवढा नरसंहार ओढवला आहे, राज्य जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तेव्हा मीच या राज्याचा त्याग केला तर युद्ध थांबेल आणि शांतता प्रस्थापित होईल. असा विचार करून राजा व राणी राज्याचा त्याग करून वनात गेले. इकडे राजाच्या काकाने राज्यात प्रवेश केला व राज्य आपल्या ताब्यात घेतले. नव्या राजाची राजवट अत्यंत जुलमी होती. तो लोकांवर खूप अत्याचार करत असे, जुन्या मंत्र्यांना विविध कारणाने शिक्षा देऊन पदावरून दूर करत असे. त्याच्या अशा राजवटीमुळे राज्यात शांतता प्रस्थापित झाली नाही.

   दुसऱ्या बाजूला राजा आणि राणी वनात राहत होते. तिथे जवळ समुद्रात असणाऱ्या राज्यात नाग राजा राज्य करीत होता. तो वनात राहणाऱ्या राणीच्या सौंदर्यावर मोहित झाला होता. तिच्या प्राप्तीसाठी तो विविध योजनांचा अवलंब करू बघत होता. त्यानुसार नाग राजा एका ब्राह्मणाचा वेष घेऊन वनात आला व शांतपणे ध्यान - धारणा करत राहू लागला. त्याला बघून राजाला फार आनंद झाला. तो ब्राह्मणाला रोज फळे देत असे. एके दिवशी राजा फळे आणण्यासाठी वनात गेला असतांना संधी साधून नाग राजाने राणीचे हरण केले.

   राणीला घेऊन समुद्रात जात असताना पर्वतातील एक चिंचोळ्या मार्गात एक प्रचंड मोठा पक्षी त्याला आडवा आला. पक्ष्याने नाग राजाशी युद्ध करून राणीला सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र नाग राजाने तलवारीने पक्ष्याचा पंख कापून टाकला व समुद्रात निघून गेला.

   इकडे राजा वनातून फळे घेऊन परत आला व राणीला तिथे न पाहून दुःखी झाला. आपले धनुष्य - बाण घेऊन तो वनात राणीचा शोध घेऊ लागला. शोध घेत फिरत असतांना राजाची गाठ एका मोठ्या वानराशी पडली. तो वानर फार दुःखात होता. राजाने त्याच्या दुःखाचे कारण विचारले. तेव्हा वानर म्हणाला की त्याच्या काकाने त्याच्या राज्यावर अतिक्रमण केले आहे म्हणून तो दुःखी आहे. राजा वानराला मदत करण्याचे ठरवतो व बदल्यात राणीला शोधण्यासाठी वानराची मदत मागतो. पुढे वानर व त्याच्या काकांचे युद्ध सुरू असते तेव्हा राजा धनुष्य - बाण घेऊन आक्रमण करण्याच्या तयारीत असतो. मात्र राजाला पाहून वानराचा काका घाबरतो व सैन्यासह पळून जातो. वानराला त्याचे राज्य परत मिळते.

   यानंतर वानर राजा आपल्या सर्व सैन्याला राणीला शोधण्याचे आदेश देतो. शोध घेत असताना वानर सैन्याला एक जखमी पक्षी आढळतो. तो राणीच्या हरणाचे वृत्त या सैन्याला सांगतो व मरण पावतो. वानर सेनेकडून हे वृत्त ऐकताच राजा, वानरराज व त्याच्या सैन्यासह समुद्रकिनारी येतात. समुद्र पार कसा करावा हे न कळून सगळेच चिंतीत होतात. तिथे देवतांचा राजा चक्र एका वृद्ध आणि आजारी वानराच्या रूपात येतो व म्हणतो की सैन्यातील प्रत्येक वानराने एकेक दगड घेऊन समुद्रात टाका, त्यातून एक डोंगर तयार होईल. तो पार करून सर्व सैन्य समुद्रातील बेटावर जाऊ शकेल. हे ऐकून वानर राजा त्या वृद्ध वानरालाच कामाचा प्रमुख म्हणून नेमतो. त्याच्या मार्गदर्शनाने समुद्रात एका छोटा डोंगर तयार होतो व सर्व सैन्य नाग राजाच्या राज्यात पोहोचते.

   सैन्य बघून नाग राजा एक विषारी धुके निर्माण करतो. त्यामुळे सर्व वानर सैन्य बेशुद्ध जोते. तेव्हा एक छोटा वानर संजीवनीच्या प्रयोगाने सर्व वानरांना बरे करतो. पुढे नाग राजा प्रचंड प्रमाणात वादळ आणि विजांची निर्मिती करतो. सर्व वानर सैन्य गोंधळात पडते. तेव्हा पुन्हा एकदा हा छोटा वानर सांगतो की जिथे वीज चमकते तिथे नाग आहेत. विजेच्या प्रकाशाच्या अनुरोधाने प्रहार करा.

   राजा या सल्ल्याने वागतो व विजेच्या प्रकाशात नाग राजाच्या वक्षस्थळी बाण मारतो. नाग राजाचा मृत्यू होतो. छोटा वानर त्वरेने जाऊन राणीची सुटका करतो. सगळे वानरराजाच्या राज्यात म्हणजे वनात परत येतात. इथूनच काही काळाने राजा आपले आधीचे राज्य त्याच्या काकाकडून परत मिळवतो व राज्य करू लागतो.

   राज्यात परत आल्यानंतर राजा राणीच्या चारित्र्यावर संशय घेतो. तेव्हा राणी आपल्या शुद्धत्वाचा दाखला म्हणून पृथ्वी देवीला विनंती करतो की जर ती शुद्ध असेन तर पृथ्वीने तिला (राणीला) पोटात घ्यावे. राणीच्या प्रार्थनेने पृथ्वी दुभंगते आणि राणीला पोटात घेते. राणीचे शुद्धत्व सिद्ध होते.

    राणीच्या सत्वपरिक्षेनंतर राज्यात सर्वत्र सत्याचा काळ सुरू होतो. तिच्या रूपात सत्यवृत्तीचे सामर्थ्य जाणून राज्यातील सर्व लोक सत्याने वागू लागतात व राज्यत अत्यंत सुख - समृद्धी नांदते.

मधुरा गजानन डांगे,
नंदुरबार.

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी 

छायाचित्र प्रतिकात्मक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या