प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा दान

  दान केल्यावर पुण्य मिळतेच. पण माझा अधिक विश्वास आहे तो समाधानावर. जे तत्क्षणी मिळते आणि अनंत काळापर्यंत टिकते. पुण्याची गोष्ट मात्र तशी नाही. त्याचा संचय होत जातो आणि जसा लाभ मिळतो तसा क्षय देखील होत जातो.

म्हणून सुरुवातीच्या काळात खूप वाटायचं की, आपल्या हातून दानधर्म काही होत नाही. अर्थात गोरगरिबांना किंवा काही संस्थांना दिले जाणारे आर्थिक दान किंवा अन्नदान देखील आपल्या हातून होत नाही. इच्छा असणे एक भाग आणि मोठ्या प्रमाणात वा थोडासा पोटाला चिमटा काढून पण का होईना पण दान करता आले पाहिजे ही खंत होतीच.

पण नव्या दृष्टिकोनातून पहायचे ठरवले. कारण दान करण्याचे तर अनंत प्रकार आहेत. भगवंताने आपल्याला कोणत्या प्रकारे संपन्न केले आहे त्या दृष्टीने पहावयास सुरुवात केली.

वर्षातून किमान दोन-तीन वेळा रक्तदान करत होतोच. त्याप्रमाणे एकदा रक्तपेढीमध्ये रक्तदान करण्यासाठी गेलो. त्यावेळेस तेथे प्लेटलेट्स ची आवश्यकता होती. त्याची चर्चा सुरू होती. त्यांनी मला विचारले, "तुम्ही प्लेटलेट्स दान कराल का?" रक्तदान करायचे होतेच. मग प्लेटलेट्स म्हणजे काय ते समजून घेतले. 'रुग्णाला तात्काळ मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडत येऊ शकतं' एवढे नक्की कळाले.

 म्हणजेच पूर्ण रक्तदान करण्याऐवजी ते रक्तातील केवळ प्लेटलेट्स दान करायचे. आणि सामान्यतः रक्तदान करण्यास केवळ वीस मिनिटे लागतात. पण प्लेटलेट्स दान करत असताना दीड तास बसून राहावे लागते. शिवाय प्लेटलेट्स शरीरातून काढण्याची प्रक्रिया देखील क्लिष्ट असते. रक्तदाना प्रमाणे हाताला सुई टोचलेली असते, त्यातून रक्त घेतले जाते. ते एका मशीनशी जोडलेले असते. त्या मशीन मध्ये त्या घेतलेल्या रक्तातून केवळ प्लेटलेट्स काढून घेतल्या जातात. आणि शिल्लक राहिलेले अशुद्ध रक्त शरीरात परत पाठवले जाते. म्हणून अधिक वेळ लागतो.

आणि या सर्व गोष्टींची माहिती बहुतांश लोकांना नसते. आणि त्यातही ज्यांना ही माहिती होते ते या लागणाऱ्या दीड तासांचा कालावधी मुळे प्लेटलेट्स दान करण्यासाठी बहुधा तयार होत नाहीत.

मी पहिल्यांदा अगदी प्रयत्नपूर्वक प्लेटलेट्स दान केले. आपल्या शरीरातील प्लेटलेट्स दान करत असताना आपण व्यवस्थित राहावे म्हणून आवडीच्या दिल्या जाणाऱ्या गुळ शेंगदाण्याची चिक्की देखील भरपूर खायला मिळाली.

आता प्लेटलेट्स दान गेल्या दोन वर्षात चार ते पाच वेळेस मी केली असेल. आपल्यामुळे कोणीतरी भयानक अशा संकटातून बाहेर पडते आहे, याची जाणीव होतीच. भगवंताला धन्यवादही देत होतो. पण प्रत्यक्ष अनुभूती ही वेगळी घ्यावयाची होती.

मी स्वतः हा कोरना होऊन एक प्रकारे मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलो होतो. अँटीबॉडी शरीरात निर्माण झाल्या होत्या. मग मला नेहमी प्रमाणे रक्तपेढीतून फोन आला. 'प्लाझ्मादान' करण्यासाठी. मी तात्काळ गेलो. स्वभाविकच प्लेटलेट्स सारखे महत्त्व असेल, असे वाटत होतेच. प्रक्रिया सुरू होती. मी खुर्चीवर बसून होतो.

एक तीस-बत्तीस वर्षाचा तरुण तिथे आला. त्याच्याशी परिचय झाला. आणि त्यानंतर अक्षरशः तो माझ्या पाया पडायचा शिल्लक राहिला होता. खूप गहिवरून गेला होता. त्याच्या वडिलांना कोरोना झाला होता. ते ऑक्सिजनवर होते. आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना प्लाझ्मा द्यायचे ठरले. मी प्लाझ्मा देण्याचा एक दिवस आधी कुणीतरी एक प्लाझ्मा देऊन झाले होते. आणि त्या एका वेळेसच्या प्लाझ्मामूळे त्यांना ऑक्सिजन सिलिंडरमधून ऑक्सिजन द्यायची गरज राहिली नाही. ते आयसीयूतून बाहेर पडले होते. अर्थात त्या मुलाला प्लाझ्माचे महत्त्व कळाले होते.  त्याचे वडिल एक प्रकारे एका महाभयंकर संकटातून बाहेर पडले होते. त्यामुळे तो आनंदी होता.

पण मला अधिक जाणीव झाली, ती भगवंतांनी आपल्याला दिलेल्या संपन्नतेची. मी आर्थिकस्तरावर दान करू शकत नसेल तर काय झाले, परंतु जीवनदान मिळण्याच्या मार्गात एक महत्त्वाचा घटक देण्याची शारीरिक संपन्नता, सुदृढता भगवंताने आपल्याला दिलेली आहे, ही किती मोठी गोष्ट आहे.

म्हणूनच पुण्यासाठी, नावासाठी निश्चितच नाही. तर आत्मिक समाधानासाठी प्लेटलेट्स दानाचा संकल्प जीवनभराचा करून ठेवला आहे....

।जय जय रघुवीर समर्थ।

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या