लाओस या आग्नेय आशियातील देशात रामकथेवरील अनेक रचना असल्याचे आढळून आले आहे. यातील प्रमुख रचना फ्रलक फ्रलाम (राम जातक) या नावाने ओळखली जाते. याशिवाय पोम्मचक (ब्रह्मचक्र), लंका नाई अशा काही रामायणावरील रचना असल्याचे दिसते. मात्र फ्रलक फ्रलाम ची रचना अत्यंत लोकप्रिय आहे.
फ्रलक फ्रलाम कथेच्या सुरुवातीला असे म्हटले आहे की एक फोम (ब्रह्म) युगुल स्वर्गातून पृथ्वीवर येते. ते दोघे पृथ्वीवरील मधुर आणि सुगंधित माती इतक्या प्रमाणात खातात की त्यांची शरीरे जड होतात व त्यांना पुन्हा उडून स्वर्गात जाता येत नाही. तेव्हा ते पृथ्वीवरच राहू लागतात. कालांतराने ते १०१ अपत्यांना जन्म देतात आणि इंथपथानकन (इंद्रप्रस्थ) नामक नगरीची स्थापना करतात. ही सर्व मुले जम्बुद्वीपावर विविध ठिकाणी राज्य करावयास जातात. यांच्यापैकी तपपरमेसम हा सर्वात लहान पुत्र इंथपथानकन इथे राज्य करू लागतो.
तपपरमेसम ला विरुलाहा आणि थत्तरथा (दशरथ) असे दोन पुत्र होतात. पैकी सर्वात लहान असणाऱ्या विरुलाहाला इंथपथानकन चे राज्य मिळते आणि मोठा थत्तरथा आपले नशीब अजमावण्यासाठी उत्तरेत निघून जातो. खूप लांब प्रवास केल्यानंतर तो फान फाओ नावाच्या प्रदेशात येतो. तिथे सात शिरे असणाऱ्या नागाच्या मार्गदर्शनाने तो मेकाँग नदीच्या पलीकडे एक नवी नागरी निर्माण करतो व तिला सिसत्तनाक असे नाव देतो. इथे थत्तरथाला एक मुलगी होते. तिचे नाव चंदा असे ठेवले जाते.
प्रस्तुत काव्याच्या पहिल्या भागात रावणाच्या जन्माची रंजक गोष्ट सांगितली आहे. एकदा महा फोम (महाब्रह्म) ने इंथपंथानकन नगरीच्या बाहेर राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या घरी जन्म घेतला. या मुलाचे नाव लुन लू असे ठेवण्यात आले. एके दिवशी इंद्र त्या शेतकऱ्याच्या शेतात आला व बौद्ध तत्वज्ञानाविषयी काही प्रश्न विचारू लागला. लुन लू ने या प्रश्नांची अत्यंत समाधानकारक उत्तर दिल्याने इंद्र त्याला स्वर्गात घेऊन गेला. तिथे त्याला सुंदर रूप व विविध शक्तींची प्राप्ती झाली. सोबतच असा वर मिळाला की त्याचा मृत्यू केवळ समुद्राच्या तळाशी असणाऱ्या केओ वसिराफेत नावाच्या बाणानेच केला जाऊ शकेल. अशारितीने सिद्ध झालेले हे बालक विरुलाहाच्या घरी जन्माला येते. त्याचे नाव राफनसुआन (रावण) असे ठेवले जाते. विरुलाहा ला अजून दोन पुत्र होतात त्यांची नावे फिक फी (विभीषण) आणि इंथासी (इंद्रजित) अशी सांगितली आहेत. धनुष्य बाण घेऊन जन्माला आलेल्या राफनसुआन या पराक्रमी पुत्राने बाल्यावस्थेतच थत्तरथाची कन्या चंदा हिला पळवून आणले व तिच्याशी विवाह केला.
चंदाच्या अपहारणानंतर राजा थत्तरथा ने देवांना प्रार्थना केली. त्याचे फळ म्हणून त्याच्या घरी दोन पुत्र जन्माला आहे. त्यांची नावे फ्रलक (लक्ष्मण) आणि फ्रलाम (राम) अशी ठेवण्यात आली. अगदी लहान वयातच त्यांनी राफनासुआन वर आक्रमण करून आपली बहीण चंदाला सोडवून आणले. प्रस्तुत कथेत दिलेल्या वर्णनानुसार राफनसुआन ने चंदाचे अपहरण केल्याने लाओमधील सामाजिक नियमांचा भंग केला होता. तेथील नियमानुसार राजाने आपल्याला आवडलेल्या मुलीच्या पित्यास यथायोग्य भेट पाठवून मुलीचा हात मागणे अपेक्षित असते. राफनसुआन च्या या कृत्याने नाराज होऊन त्याचे आजोबा राज्यातून निघून गेले असल्याचा देखील उल्लेख यात येतो. त्यानुसार सामाजिक नियमांचे किती काटेकोर पालन केले जात होते हे लक्षात येते.
फ्रलामाने चंदाला परत नेल्यानंतर स्वतः राफनसुआन जाऊन फ्रलामाच्या सर्व अटी पूर्ण करतो, त्याला योग्य भेट देतो आणि चंदाला परत घेऊन येतो. यानंतर तो इंथपथानकन नागरी सोडून लांब लंकेला निघून जातो.प्रस्तुत कथा दोन भागांत विभागली गेली आहे. यापैकी इथपर्यंत कथेचा पहिला भाग झाला.
पुढच्या भागात राफनसुआन लंकेचे राज्य करण्यास सुरुवात करतो. हे राज्य स्थिर झाल्यानंतर एके दिवशी तो स्वर्गात जाऊन इंद्राच्या पत्नीशी अनैतिक कृत्य करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे संतप्त झालेली इंद्राची पत्नी पुढे राफनसुआनची मुलगी म्हणून जन्माला येते. तिच्या जन्मानंतर तिचे अनिष्टकारी भविष्य ऐकून राफनसुआन तिला नदीत सोडून देतो. ती पुढे एका ऋषींना सापडते व ते तिचे पालनपोषण करतात. या कन्येचे नाव नंग सिदा (सीता) असे सांगितले आहे.
पुढे काही वर्षांनी नंग सिदेचे स्वयंवर आयोजित केले जाते. तिथे एक दिव्य धनुष्य उचलून दाखविण्याचा पण असतो. राफनसुआन मोठ्या गर्वाने धनुष्य उचलायचा प्रयत्न करतो मात्र त्याला ते जमत नाही. नंतर फ्रलाम पुढे येतो व सहजतेने धनुष्य उचलतो. नंग सिदा व फ्रलाम यांचा विवाह होतो. तेव्हापासून राफनसुआनच्या मनात नंग सिदेची अभिलाषा असते.
फ्रलाम आणि नंग सिदा सिसत्तनाक नगरीत परत येत असताना वाटेत राफनसुआन आपल्या मायेने विविध प्रलोभने निर्माण करतो. यात मायावी पशु - पक्ष्यांचा समावेश असल्याचे कथेत म्हटले आहे. या मायेच्या योगाने फ्रलाम नंग सिदेपासून दूर जातो व राफनसुआन तिचे अपहरण करतो. तिचे शरीर उचलून नेण्यास अत्यंत उष्ण असल्याने तो एका दगडी पुतळ्याची निर्मिती करतो व त्याच्या साहाय्याने तिला उचलून लंकेत नेतो. लंकेत तिला नगरीच्या बाहेर महालात ठेवले जाते.
फ्रलाम परत आल्यानंतर त्याला नंग सिदेचे हरण झाल्याचे लक्षात येते. तो तिच्या शोधार्थ निघतो व भावी युद्धाच्या दृष्टीने मित्र जोडण्यास सुरुवात करतो. या काळात फ्रलाम निखोट फळ खाऊन वानराचे रूप धारण करतो व तीन वर्षे त्याच रूपात राहतो असे म्हटले आहे. (नंग सिदेला सोडवून आणल्यावर तो पुन्हा मनुष्य रुपात येतो.) वनात एका ऋषींची कन्या नंग फेंगसी ही असते. ती देखील निखोट फळ खाऊन वानराचे रुप धारण करते व फ्रलामासोबत राहू लागते. त्यांना एक मुलगा होतो. त्याचे नाव हुल्लमान असे सांगितले आहे.
या काळात दोन ऋषीकुमार संगखिप आणि फ्र लिचान हे काशीचे राज्यांकरत असतात. संगखिप फ्र लिचान ला राज्याबाहेर काढतो आणि स्वतः राज्य करू लागतो. राम फ्र लिचान ला भेटतो व मदतीचे आश्वासन देतो. पुढे फ्रलाम संगखिपाचा वध करतो व फ्र लिचान ला राजा करतो.
फ्र लिचान जम्बुद्वीप व इतर अनेक बेटांवर योग्य संदेशकाचा शोध घेतो. शेवटी हुल्लमान आणि खुआन थाओ फा (हा फ्रलामाचाच (रामाचा) एक पुत्र असल्याचे म्हटले आहे.) इंथपथानकन इथून लंकेला उड्डाण करतात व तिथे नंग सिदेचा शोध घेतात.
हुल्लमान आणि खुआन थाओ फा ने आणलेल्या माहितीनुसार सर्वजण समुद्राजवळ येतात. समुद्र पार करण्याच्या विविध मार्गांचा विचार करतात. शेवटी हुल्लमानने केलेल्या मार्गदर्शनाच्या अनुसार समुद्रावर सेतू बांधला जातो व फ्रलाम आपल्या सैन्यासह लंकेत येतात. इथे पोहोचल्यावर ते राफनसुआन कडे शेवटची धमकी म्हणून एक बाण पाठवतात. त्याच्या बदल्यात राफनसुआन चा मंत्री केळीच्या खोडापासून सीतेची आकृती बनवतो व सीतेने आत्महत्या केल्याची सांगून तो खोटा मृतदेह फ्रलाम च्या सैन्यात पाठवतो. सैन्यातील एक चतुर मंत्री फ्रलामाला सत्याची जाणीव करून देतो व हा मृतदेह खोटा असल्याचे सांगतो.
फ्रलाम आणि राफनसुआनच्या सैन्याचे युद्ध सुरू होते. राफन सुआन चे चार सेनापती मारले गेल्यानंतर पाताळाचा राजा फ्राया पात्तलम फ्रलामाचे अपहरण करून त्याला पाताळात घेऊन जातो. हुल्लमान फ्रलामाची सुटका करतो.
पुढे युद्धात राफन सुआन चे नऊ पुत्र व पत्नी यांचा मृत्यू होतो. तेव्हा राफन सुआन एक बाण मारतो ज्याने फ्रलामाच्या वर्मी घाव बसतो. यावेळी हुल्लमान औषधी वनस्पतींचा डोंगर आणून फ्रलामावर उपचार करतो व त्याला बरे करतो. यानंतर राफनसुआनला मिळालेल्या वरानुसार त्याला मारण्यास आवश्यक असणारा किओ वसिराफेत नावाचा बाण हुल्लमान समुद्राच्या तळाशी जाऊन शोधून आणतो. फ्रलाम या बाणाच्या साहाय्याने राफनसुआनचा वध करतो व नंग सिदेची सुटका करतो. तीन महिने लंकेत राहून फ्रलाम सिसत्तनाकला परत येतो व राज्य कारभारास सुरुवात करतो.
एके दिवशी नंग सिदेने दरबारातील दासीच्या आग्रहाने राफनसुआनचे चित्र काढल्याने फ्रलाम संतप्त होतो व नंग सिदेची हत्या करण्याचे आदेश देतो. त्यानुसार फ्रलक (लक्ष्मण) तिला वनात घेऊन सोडून देतो व एका प्राण्याच्या रक्तात बुडावलेली तलवार फ्रलामाला दाखवून नंग सिदेचा वध केल्याचे सांगतो. इकडे वनात सीता एका ऋषींच्या आश्रमात येते. तिथे ती एका पुत्राला जन्म देते. त्याचे नाव फ्र बत असे ठेवले जाते. एके दिवशी फ्र बत फार वेळ दिसत नसल्याने नंग सिदा दुःखी होते. तेव्हा तिला धीर देण्यासाठी ऋषी फ्र बत ची लाकडी प्रतिमा तयार करतात. नंतर फ्र बत च्या हट्टामुळे त्या लाकडी प्रतिमेला ते जिवंत करतात व त्या नव्या कुमाराचे नाव फ्र हूप असे ठेवतात. अशारितीने हे दोन्ही कुमार एकत्र राहू लागतात.
एके दिवशी फ्र बत आणि फ्र हूप आपल्या पित्याला भेटण्याचा हट्ट करतात. तेव्हा नंग सिदा त्यांना घेऊन नगरीत येते. थोडे दिवस नगर प्रमुखाच्या घरी राहते व योग्य वेळी दोन्ही कुमारांची फ्रलाम, हुल्लमान यांच्याशी ओळख करून देते. फ्रलाम नंग सिदा आणि कुमारांना राजवाड्यात घेऊन येतात. अगणित वर्ष फ्रलाम सुखाने राज्य करतात. कालांतराने संपूर्ण राज्य फ्र बत आणि फ्र हूप यांच्या हाती सोपवून नंग सिदा, फ्रलक, हुल्लमान यांच्यासह फ्रलाम स्वर्गस्थ होतात.
- मधुरा गजानन डांगे,
नंदुरबार.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या