-- स्वानंद झारे
आणिबाणी हे भारताच्या इतिहासातील काळेकुट्ट पर्व आहे. निरंकुश सत्तेने माध्यमे आणि व्यक्ती या दोघांचे स्वातंत्र्य या २१ महिन्याच्या काळात हिरावलं होतं...
ना वकील...ना अपील... ना दलील...अशी स्थिती त्यावेळी उत्पन्न झाली होती. विरोधी विचारांना अत्याचार, अन्याय आणि सत्तेच्या जोरावर लक्ष्य केले गेले.
न्याय लडता निरंकुशतासे... असे यथार्थ वर्णन श्रध्येय अटलजींनी या काळ्या पर्वाचे केले आहे. हजारो कार्यकर्ते यात संघ स्वयंसेवक खूप अधिक संख्येने स्थानबध्द होते. अनेक परिवार या आघाताने मानसिक, शारिरीक, आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले. अशा अभूतपूर्व परिस्थितीत भारतीय संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी अनेक कुटुंबांनी संघर्ष केला.
माझ्या वडीलांना लग्नाच्या नंतर सत्यनारायणाची पूजा झाली आणि लगेच दुपारी मिसा कायद्या अंतर्गत अटक झाली आणि नगर जिल्ह्यातील विसापूरला रवानगी झाली. लग्नानंतर नव-याला असे अचानक तुरुंगात घेवून गेले आणि याची चौकशी तरी कुठे करायची.. कुणाकडे दाद मागायची..या प्रश्नांनी आईसोबतच कुटुंबातील सर्वांनाच ग्रासलं. केव्हा सुटका होईल माहिती नाही...सगळीच अनिश्चितता. पुढे दोन महिन्यांनी नाशिक रोड कारागृहात सर्वांना आणलं गेलं. सर्वांना बाहेर काळजी वाटत होती. वर्तमान पत्र या बाबत काहीही छापत नव्हती. कारागृहात मात्र संघाच्या वर्गाचे वातावरण होते.
अप्पांच्या कारागृहातील वातावरणाच्या गप्पा ऐकणं एक वेगळा अनुभव होता. ते म्हणायचे की कारागृहात मोठ्या मोठ्या नेत्यांचे खुजेपण दिसलं तर सामान्य स्वयंसेवकाच्या विचारांची विलक्षण उंची या काळात दिसली. कौटुंबिक व आर्थिक काळजी होती पण लोकशाहीचा गळा घोटला जात असतांना आपण यातील लढवय्ये सैनिक आहोत याचे समाधान असल्याने कारागृहातील दिवस आनंदाने गेले.
या काळाला अनुशासन पर्व म्हणत थिजलेली आणि सरकारला विरोध सुध्दा न करणारी दुटप्पी विचारधारा देशवासियांनी पाहिली.
लोकशाहीची पुनर्स्थापना व्हावी म्हणून सारा देश मनातून उभा राहिला. यामध्ये महिलांचेही लक्षणीय योगदान होते. वेश बदलून फिरणाऱ्या संघ कार्यकर्त्यांनी आणि मातृशक्तीने अथक, अविश्रांत जागरण केले आणि २१ महिन्यांनी हे काळेकुट्ट पर्व भारतीयांनी मतपेटीच्याद्वारे उलथवले...निरंकुश सत्तेला बेदखल केले..
या काळ्या पर्वाचे स्मरण करत नव्या लोकशाहीच्या विजयाचे मंत्रगान सतत गात राहिले पाहिजे.
"अग्निपरिक्षा कोणी घेता सुवर्णतेजे तळपूया..." ही गीताची ओळ सार्थ करीत पुढे जात राहिलेच पाहिजे...
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या