महाराणी येसूबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
- कु. स्वाती शेषराव तळेकर
तुळजाभवानीच्या शुभाशिर्वादाने आपल्या मायभूमीला पुत्ररत्न लाभले. ते अगदी शिवस्वरूपच!! तीनशे वर्षाच्या पारतंत्र्याच्या काळोखानंतर ती स्वाधिनतेची पहाट या भूमीने पाहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन आपली मायभूमी परकीय जोखडातून मुक्त केली, या हिंदवी स्वराज्याच्या पवित्र कार्यात अनेक नरवीर होते पण त्याच बरोबर राजमाता जिजाऊसाहेब, महाराणी येसूबाई ,महाराणी ताराबाई या राजस्त्रीया म्हणजे साक्षात तुळजाभवानीचे अंशरुप होत्या! हिंदवी स्वराज्याची संकल्पना ,संरक्षण आणि संवर्धन करण्याचे महान कार्य भोसले घराण्यातील या महान स्त्रीयांनी केले.
https://www.facebook.com/105933207427222/posts/528335745186964/
*युवराज्ञी येसुबाई*
छत्रपती शिवरायांनी श्रीरामाप्रमाणे प्रजेला सुखी केले आणि श्रीकृष्णाप्रमाणे या भूमीची अब्रु वाचवली. अशा या महान पराक्रमी राजाची सून होण्याचे भाग्य येसुबाई यांना लाभले होते. युवराज शंभूराजांची पत्नी म्हणून त्या भोसले घराण्यात आल्या, आणि भोसल्यांची धर्मरक्षणांची, ज्ञानाची,लोककल्याणाची आणि पराक्रमाचीही परंपरा त्यांनी चालु ठेवली.
शिवाजीमहाराजांनी 29 एप्रिल 1661 ला शृंगारपुरवर विजय मिळवला ,तेथील राजे सुर्यराव सूर्वे पळून गेले,त्यांचे कारभारी दाभोळचे वतनदार पिलाजीराव शिर्के महाराजांना सामील झाले. त्याचवेळी पिलाजीरावांची सुकन्या राजसबाई हिचा विवाह शंभूराजांशी निश्चित झाला. हा विवाह 1661ते 1665 दरम्यान झाला असावा. सासरी राजसबाईंचे नाव ठेवले "येसुबाई" येसुबाई लग्नाच्या वेळी 6-7 वर्षाच्या असाव्यात. बालपणापासुनच त्यांना राजमाता जिजाऊंचा सहवास लाभला. दोन छत्रपती घडवणाऱ्या जिजाऊंच्या संस्कारात येसुबाईही वाढत होत्या. शिवछत्रपतींचा मुत्सद्दीपणा आणि राजनीतीचेही त्यांना जवळून दर्शन होत होते.शिवाय पतीच्या संस्कृत अभ्यासाचाही त्यांच्यावर प्रभाव पडल्यावाचुन कसा राहील?
दि. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. शंभुराजांना युवराज्याभिषेक करण्यात आला.स्वाभाविकच येसुबाई "युवराज्ञी" झाल्या. श्री शिवछत्रपतींचे निर्वाण झाल्यानंतर अतिशय संघर्षमय अवस्थेत शंभूराजांना राज्यपद मिळाले. शंभूराजांचा राज्याभिषेक दि.16 जानेवारी 1681 रोजी झाला. येसुबाई स्वराज्याच्या अभिषिक्त महाराणी झाल्या.
दि.18 मे 1682 रोजी येसुबाई आणि शंभूराजांना पुत्रप्राप्ती झाली. मुलाचे नाव "शिवाजी " ठेवले (नंतर त्यांचे शाहू हेच नाव रुढ झाले)
दिल्लीचा मुघल बादशाह औरंगजेब आणि मराठे यांचा सतत संघर्ष चाललेला होता. औरंगजेबांच्या नजरेत हा जिहाद होता. समस्त भारतावर इस्लामची सत्ता प्रस्थापित करु पाहणारा औरंगजेब आता महाराष्ट्राकडे निघाला होता. डाॅ.जाॅन फ्रॅन्सिस जेमेली करेरी या विदेशी प्रवाशाने गलगली या गावी औरंगजेबाची विराट छावणी पाहिली होती तो लिहीतो- बादशहाची लढाऊ फौज 60,000 स्वार, एक लक्ष पायदळ,50,000 उंट, 3000 हत्ती, नोकर, चाकर, व्यापारी, कारागिर गणती केली तर पाच लाख लोक होते. बादशाही फौज ही 3 लाख स्वार आणि चारलाख पायदळ इतकी होती असे म्हणण्यास हरकत नाही" एवढे प्रचंड दळबादळ घेऊन औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला निघाला होता.
परंतु मराठे शंभूराजांच्या कोवळ्या नेतृत्वात कडवी झुंज देत होते. रामसेजसारखा छोटासा किल्ला मुघलांच्या राक्षसी सामर्थ्याला चिवटपणे तोंड देत होता. मायभुमी आणि धर्माच्या रक्षणासाठी मराठ्यांचा हा लढा होता. छत्रपती शंभूराजे धडाडीने स्वराज्यरक्षणाचा हा लढा पुढे नेत होते.
महाराणी येसुबाई हा संघर्ष पाहत होत्या,या कठीण परिस्थितीत त्यांनी राज्यकारभारातही लक्ष घातले .त्यांच्या नावाचा स्वतंत्र शिक्का व मुद्राही वापरात होती."सखी राज्ञी जयति" असा त्यांचा शिक्का होता. तसेच शंभूराजांचेही शिक्के त्यांच्याकडे असत. त्या स्वत: कागदपत्रे लिहून घेत,तसे त्यांना आधिकार मिळालेले होते.
*मृत्युंजय अमावस्या*
फेब्रुवारी 1689 ला शंभूराजे आणि कवी कलश यांना शेख निजाम उर्फ मुकर्रबखानाने संगमेश्वर मुक्कामी कैद केले. औरंगजेबाने इस्लामी शरियतनुसार काजी आणि मुफ्तींच्या सल्ल्याने शंभूराजांच्या हत्येचा फतवा काढण्यात आला आणि अतिशय हालहाल करुन मारण्याचा आदेश दिला. कवी कलश व शंभूराजांचे गरम सळई फिरवून डोळे काढले गेले,जिभाही उपटल्या गेल्या,त्यांची कातडी सोलण्यात आली,शरीराचे तुकडे करण्यात आले.अशा प्रकारे औरंगजेबाने इस्लामी पध्दतीने शंभूराजांची अमानुषपणे हत्या केली (फाल्गुन वद्य अमावस्या, 11 मार्च 1689)
औरंगजेब बादशाहासमोर मान न झुकवता मराठा राजाने आपल्या स्वाभिमानी स्वभावाचे आणि तेजस्वी व्यक्तीत्वाचे जे दर्शन घडवले त्याला तोड नाही.छत्रपती शंभुराजांबद्दल मराठी मनाला नेहमी अभिमान वाटत राहील अशी ही घटना होती.
*येसुबाईंची धीरोदात्तता*
सकलसौभाग्यसंपन्न येसुबाईंची स्थिती आकाश कोसळल्यासारखी झाली. औरंगजेबाच्या छावणीत शंभूराजांचे हालहाल सुरु असतांना त्यांच्या मनाला किती यातना होत असतील,याची आपण कल्पनाही करु शकत नाही. शंभूराजांच्या हत्येनंतर धीरोदात्तपणे त्या परिस्थितीला सामोरे गेल्या. राजाराममहाराजांचे मंचकारोहण केले. खरेतर स्वत:च्या पुत्राला राज्यपद देऊन त्यांना राज्यकारभार करता आला असता,तशी त्यांची क्षमताही होती,पण यावेळी येसुबाईंनी जी धीरोदात्तता दाखवली त्याला मराठ्यांच्या इतिहासात तोड नाही. पुत्रप्रेमापेक्षा त्यांना स्वराज्यप्रेम महत्वाचे वाटले.
झुल्फिकारखानाने रायगडाला वेढा दिला,अशा परिस्थितीत सगळा राजपरिवार एकत्र राहणे धोक्याचे होते,तेव्हा येसुबाईंनी मुत्सद्दीपणाने रायगड लढवण्याचा निर्णय घेतला व राजाराम महाराजांनी दूर जिंजीला जावे,असे ठरले...अखेर महाराणी येसुबाई व त्यांचा सात वर्षाचा राजपुत्र शाहू कैद झाले. रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. रायगडाचे नाव ठेवले -इस्लामगड.
औरंगजेबाने शाहूला मुसलमान करण्याचा घाट घातला पण येसुबाईंनी त्याला प्राणपणाने विरोध करत केला. येसुबाईंनी शाहूंच्या मनात हिंदुत्व जागे ठेवले. याच शाहूमहाराजांनी पुढे भारतभर हिंदवी स्वराज्याचे रुपांतर हिंदवी साम्राज्यात केले.
औरंगजेब महाराष्ट्रात जिहाद करत होता.पण मराठ्यांचे टीचभर राज्य त्याला कधीही जिंकता आले नाही अखेर 20 फेब्रुवारी 1707 ला अहमदनगरजवळील भिंगार येथे औरंगजेबाचा मृत्यु झाला.
मराठ्यांचे राज्य गाडायला आलेला औरंगजेब महाराष्ट्रातच गाडला गेला आणि त्यांचे महाराष्ट्रभूमीला इस्लामच्या टाचाखाली आणण्याचे त्याचे स्वप्नही मराठ्यांनी गाडून टाकले.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा दुसरा मुलगा आज्जमने स्वतला बादशाह घोषित केले. शाहूची सुटका केल्यास ताराबाई आणि शाहू यांच्यात सत्तासंघर्ष होईल व त्यामुळे मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होईल ,तसे झाल्यास मुघल सत्तेला त्याचा फायदा होईल या विचारातुन आज्जमशाहने शाहूंची कैदेतुन सुटका केली तथापि येसुबाई व इतर मंडळी अजुनही मुघलांच्या कैदेत होती.
पुढे मुघल तख्तासाठी आज्जम व शाहआलम या भावांचा संघर्ष झाला,त्यात आज्जम ठार झाला,शाहआलमने आपला दुसरा भाऊ मोहम्मद कामबक्षलाही ठार मारले आणि बहादुरशहा हे नाव धारण करुन शाह आलम दिल्लीचा बादशाह बनला.
*मुघलांच्या कैदेतून सुटका*
12 जानेवारी 1708 रोजी शाहूमहाराज यांचा सातारला राज्याभिषेक झाला. यावेळी त्यांना ताराबाईंसोबतही संघर्ष करावा लागला. पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी येसुबाईंच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले.त्यासाठी सय्यद हूसैनसोबत बोलणी सुरु केली. दिल्लीतील सत्तासंघर्ष व कलहाचा फायदा घेत पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी येसुबाई व इतर मंडळीची मुघलांच्या कैदेतुन सुटका करण्यात यश मिळवले.
येसुबाईंनी पुढे छत्रपती शाहुमहाराजांच्या राज्यकारभात मदत केली. कोल्हापुर व सातारा या दोन गादींचा आपसातील संघर्ष टाळण्यासाठी वारणेचा तहाचा सल्लाही येसुबाईंनीच दिला होता.
येसुबाईंचा स्वर्गवास सातारा इथे झाला. (1730-31 च्या दरम्यान) शिवरायांची ही तेजस्वी सून अनंतात विलीन झाली. हिंदुधर्माच्या रक्षणासाठी येसुबाईंनी केलेला त्याग अजोड आहे. ही सती साध्वी स्त्री समस्त हिंदुचे स्फूर्तीस्थान आहे. महाराणी येसुबाईंच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन.
----------------------------------------------
संदर्भ
1)महाराज्ञी येसुबाई - डाॅ. सदाशिव शिवदे
2) आलमगीर औरंगजेब लेखमाला- रवींद्र सासमकर
-- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या