कार्यकर्ता सावरकर



‌आपल्या समाजातील ज्या दोषांमुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांना खूप दुःख वाटे त्यातील एक प्रमुख दोष म्हणजे," कृती दौर्बल्य". सावरकर म्हणतात," योजना आखणे ही आवश्यक असते ,पण योजना म्हणजे पूर्ती नव्हे ,खरे काम म्हणजे काय काम करावे हे नुसते सांगत बसणे नसून, ते काम करून दाखवणे ,निदान ते करू लागणे."

‌ इंग्लंडमध्ये असताना क्रांतिकारी पत्रकांच्या व बॉम्बच्या कृतीच्या प्रति करणे, पिस्तुले मिळवून ती इंग्रजी कादंबर्‍यांमध्ये लपवून हिंदुस्तानात पाठवणे इत्यादी कामेही सावरकरांनी केली होती.
रत्नागिरीतील वास्तव्यात सामाजिक सुधारणांविषयी सावरकरांनी जे प्रत्यक्ष कार्य केले ,त्यात 'कार्यकर्त्या सावरकरांचा' खरा प्रत्यय येतो .सन 1928 मध्ये बँकेकडून कर्ज काढून सावरकरांनी पूर्वास्पृश्य मुलांचा बँड उभा केला. या बँडला समारंभातून आमंत्रण येतील, त्या मुलांना काही उत्पन्न होईल, व सार्वजनिक कार्यक्रमात या बँड चा  प्रवेश झाल्यावर अस्पृश्यता निवारणास साहाय्य होईल, या उद्देशाने सावरकरांनी प्रयत्न केले. बँकेकडून कर्ज काढून त्यातून समाज परिवर्तनासाठी एखादा उपक्रम करणे हे सावरकरांनी नव्वद वर्षांपूर्वी करून दाखवले होते. 

सन 1923 मध्ये सावरकरांनी सर्व हिंदूना प्रवेश असणारे अखिल हिंदू उपहारगृह रत्नागिरीत सुरू केले. सावरकर तेथे नियमित जात व त्याचा रोजचा हिशोब पाहत .व्यवसाय बंदी विरुद्ध जनमत तयार करण्याकरता सावरकरांनी स्वतः पिंजारी काम केले व काही स्वयंसेवकांनाही ते काम करण्यास प्रवृत्त केले. पूर्वास्पृश्य मंडळींना बरोबर घेऊन दसरा व संक्रांतीच्या दिवशी सावरकर सोने व तिळगुळ देण्याकरता घरोघरी जात. काही घरात सर्वांचे स्वागत होत असे, पण काही ठिकाणी तोंडावर दरवाजेही बंद केले जात.
‌ 
आपल्या अनुपस्थितीत कोणतेही काम व्यवस्थित कसे चालेल याची काळजी (व्यवस्था )करणारा खरा कार्यकर्ता. हे पाहण्याकरता ,'यावर्षीच्या कार्यक्रमाची सगळी योजना तुम्हीच करा',असे सावरकर  बरोबर च्या कार्यकर्त्यांना केव्हा केव्हा सांगत असत ,पण तरीही कार्यक्रमानंतर कार्यक्रमाच्या चर्चेत( मूल्यांकनाच्या) ते मनमोकळेपणाने भाग घेत असत.
‌ "आज जर या देशाचे कशापासून अडले असेल, तर ते कार्यक्रमावाचून नव्हे ,तर कार्या वाचून होय. वाचीवीरांचा शुष्क काथ्याकूट सोडून देऊन कृती शूर व्हा "हा या कर्मवीरचा संदेश आजही जसाचा तसा लागू पडतो.
@निलेश खांडवेकर, भुसावळ

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या