सावरकर आणि स्वदेशीची चळवळ



       फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या सावरकरांकडे पुण्यातील विद्यार्थ्यांचे पुढारीपण चालून आले. दिनांक 1 ऑक्टोबर 1905 या दिवशी पुण्यात भरलेल्या एका सार्वजनिक सभेत परकीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे सावरकरांनी आव्हान केले व परकीय कपड्यांची होळी करावी अशी सूचना मांडली. होळी करण्याने अधिक जागृती होईल असे सावरकरांनी प्रतिपादन केले. लोकमान्य टिळकांनी सावरकरांची सूचना स्वीकारली परंतु निदान गाडाभर परदेशी कपडे तरी जमा करण्यात आले पाहिजे अशी अट घातली. दिनांक 7 ऑक्टोबर 1905 रोजी गाडाभर परदेशी कपडे पुण्यातून मिरवणूकीने नेण्यात आले ,व त्यावेळच्या पुणे शहराबाहेर लकडी पुलापलीकडे त्या कपड्यांची होळी करण्यात आली. सावरकरांच्या सूचनेवरून त्या होळीपाशीच  लोकमान्य टिळक, सी.म. परांजपे व सावरकर यांची भाषणे झाली. परदेशी कपड्यांची पहिली होळी सावरकरांच्या प्रेरणेने  पुण्यात करण्यात आली, त्यांच्या या ' कृत्या' करता त्यांना रुपये दहा दंड करण्यात आला व महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकण्यात आले.

       सावरकर भावनेच्या भरात स्वदेशी चळवळीचे प्रचारक नव्हते. स्वातंत्र्य चळवळीतील स्वदेशी चळवळीच्या महत्त्वाची त्यांना कल्पना होती. इटली व अमेरिकेतील स्वदेशी चळवळीचे रूपांतर राज्य क्रांतीत व स्वातंत्र्यप्राप्तीत कसे झाले याचे विवेचन सावरकरांनी स्वतः लिहिलेल्या मॅझिनीच्या लेखांच्या अनुवादाच्या प्रस्तावनेत केले होते .प्रथम परकीय वस्तूंचे उच्चाटन व मग परकीयांचे उच्चाटन असा या देशात घडून आलेला क्रम त्या प्रस्तावनेत सांगितला होता.

       सावरकरांनी रत्नागिरीतील स्थानबद्धतेत सामाजिक सुधारणांन बरोबर स्वदेशी संबंधी कार्य केले .रत्नागिरी नगरातील कोणत्या दुकानात कोणत्या स्वदेशी वस्तू उपलब्ध आहेत, या सामान्य वाटणाऱ्या विषयावर त्यांनी एक लेख लिहिला होता. इतके मोठे लेखक व विचारवंत असतानाही इतक्या सामान्य वाटणाऱ्या विषयावर मी लेख कसा लिहू असा विचार त्यांच्या मनात आला नाही. रत्नागिरीत असतांना सावरकर स्वदेशी वस्तूंची हातगाडी फिरवीत व स्वदेशी वस्तू आपल्या दुकानात ठेवण्याविषयी दुकानदारांचे मन वळवीत.

        सावरकरांच्या स्वदेशी चळवळीचा विचार केल्यावर त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांचा प्रत्यय येतो. विषयाचा अभ्यास ,चळवळीचा भावनोद्दीपक तरी तर्कशुद्ध प्रचार, चळवळीच्या व्यवहारिक अंगाकडे लक्ष ,व स्वतः झीज सोसून केलेले प्रत्यक्ष निरपेक्ष कार्य ही कार्यकर्ता सावरकरांची वैशिष्ट्ये दिसून येतात. समाजसेवेच्या कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सावरकरांची ही वैशिष्ट्ये मार्गदर्शक ठरतात.

- निलेश खांडवेकर,भुसावळ 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या