'शिक्षक सावरकर' या त्यांच्या पैलूचा विचार करताना व्यक्तीचा वा लहान गटाचा शिक्षक हा अर्थ अभिप्रेत आहे. सावरकरांनी शिक्षकाचीच काय पण कोणतीच नोकरी केली नाही ,तेव्हा रूढ अर्थाने त्यांना शिक्षक म्हणता येणार नाही. परंतु माझ्या आठवणी व माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मवृत्तपर ग्रंथात त्यांची शिकवण्याची कळकळ ,निरपेक्ष स्वभाव ,शिकवण्याचे कौशल्य दिसून येते.
सावरकरांनी ज्ञानदानाचे कार्य लहान वयातच सुरू केले. त्यांच्या वहिनी ,सौ येसूवहिनी यांना लिहिता, वाचता येत नव्हते .अकरा बारा वर्षाच्या विनायकाचे हे लक्षात आल्यावर तो आपल्या थोरल्या वहिनीला शिकवू लागला व त्याने आपल्या वहिनींना चांगली अक्षर ओळख करून दिली.
'मित्रमेळा' या त्यांच्या संस्थेच्या सभासदाने वाचलाच पाहिजे ,असा वीस-पंचवीस पुस्तकांचा एक संचही त्यांनी ठरविला होता. त्यात जगातील विविध राज्यक्रांत्यांचा इतिहास, जगतवीरांची चरित्रे ,भारतीय इतिहास ,व्यायाम पुस्तके व विवेकानंद ,राम तीर्थांचे ग्रंथ यांचा समावेश केलेला होता. सभासदांच्या व्यायामाकडे ही सावरकरांचे लक्ष असायचे.
अंदमानातील कारागृहात अनेक राज बंदिवान शिकण्यास उदासीन असत ,"जोपर्यंत वाचण्यापेक्षा अधिक प्रत्यक्ष काम करता येत नाही, तोवर तो वेळ ज्ञानार्जनात घालवणे ध्येयसिद्धीसाठीही आवश्यक आहे. राजनीतिक ,ऐतिहासिक ,अर्थशास्त्रीय, समाजशास्त्रीय, ज्ञाना विना, विघातक कार्य ही करता येणार नाही, विधायक कार्य तर करता येणारच नाही," असे सावरकर त्यांना सांगत. सर्वसाधारण बंदिवानांना शिकवण्यात तर अनेक अडचणी येत, अट्टलातील अट्टल बदमाशांना शिकवताना तर खूप डोकेफोड करावी लागे,एकेक अक्षर चाळीस चाळीस वेळा काढून देण्यासही सावरकर कधीही कंटाळले नाही. शिक्षणामुळे बंदी बिघडले नाहीत उलट ते सुधारले, सुट्टीच्या दिवशी पूर्वीप्रमाणे ते भांडणात ,व्यसनात वेळ घालवीत नाही, हे कारागृहाच्या चाळीचाळीतून अधिकाऱ्यांना नेऊन सावरकरांनी दाखवून दिले. त्यानंतर कारागृहामध्ये वाचनालय सुरू करण्याची परवानगी सावरकरांना मिळाली.
"पुस्तके पडून आहेत, यापेक्षा ते वाचून वाचून फाटून गेलेत ही कागाळी मला फार आवडते" असे सावरकर म्हणत ."वाचून जे कळेल तेच इतरांना सांगू जाता कितीतरी पटीने अधिक कळे ,असा स्वानुभव सावरकरांनी नमूद केला आहे.
बॉम्ब व पिस्तूल हातात धरलेल्या सावरकरांची प्रतिमा सर्वांच्या परिचयाचे आहे. परंतु त्यांनी हातात लेखणी ही धरलेली आहे व खडू ही! पूर्वास्पृश्य वस्तीत आपल्याबरोबर लोकांना घेऊन जाताना सर्वांना बसण्यासाठी सतरंजी घेतलेली आहे. कधी त्यांच्या हातात स्वदेशी मालाच्या गाडीचा दांडा ही आहे. आज जी प्रेरणा घ्यायची आहे ती केवळ हातात पिस्तूल असलेल्या विनायकाच्या उग्र रूपा पासून नव्हे, तर हातात खडू ,लेखणी, सतरंजी व स्वदेशी मालाच्यागाडीचा दांडा धरलेल्या विनायकाच्या संरक्षक व संवर्धक प्रतिमे पासून.
- निलेश खांडवेकर ,भुसावळ
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या