समाजसुधारक सावरकर



   स्वातंत्र्यवीर सावरकरांचे एक तळमळीचे कार्यकर्ते पुण्याचे श्री रा .स .भट यांनी ठाण्याला सावरकर यांच्या जीवन कार्यावर एक व्याख्यानमाला दिली. व्याख्यानमाला संपल्यावर स्वतः सावरकरांनी त्यांना  बोलावले व म्हटले,' तुम्ही माझ्यावर व्याख्यांमाला दिली, मी युरोपात बॉम्ब पिस्तुले जमवली हे व्याख्यानात सांगितले, की माझे रत्नागिरीतले काम सांगितले, रत्नागिरीतले माझे काम हे माझे खरे काम आहे.' 'मी सागरात टाकलेली उडी विसरलात तरी चालेल, पण माझे सामाजिक विचार विसरू नका'.असे सावरकर का म्हणत हे वरील प्रसंगातून आपल्या सगळ्यांच्या लक्षात  येते.

         सावरकरांनी आपले समाजसुधारणेचे कार्य प्रामुख्याने त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील वास्तव्यात 1924 ते 1937 या कालखंडात केले. रत्नागिरी जिल्ह्या बाहेर जायचे नाही व राजकारणात भाग घ्यायचा नाही, या दोन अटींवर 14 वर्ष अंदमानात काळेपाणी भोगल्यावर त्यांना रत्नागिरीत आणण्यात आले. सन 1920 मध्ये अंदमानातून पाठवलेले त्यांचे एक पत्र लक्षात घेण्यासारखे आहे. पत्रात सावरकर लिहितात,' हिंदुस्थांवरील परकीयांच्या स्वामित्वा विरुद्ध बंड करून उठावेसे जितके मला वाटते ,इतकेच मला जातिप्रथा व अस्पृश्यता यांच्याविरुद्धही बंड करून उठावेसे वाटते '.काळ्यापाण्याच्या शिक्षेतून 1924 साली झालेल्या मुक्ततेचा वेळी कोणत्या अटी आपल्यावर घालण्यात येतील, याची कल्पना 1920 साली सावरकरांना असणे शक्य नसल्यामुळे, राजकारणात भाग घेता येत नव्हता, म्हणून ते समाजकारणाकडे वळले, ही अनेकांनी करून घेतलेली कल्पना निराधार ठरते.

         'अशुद्धता मान्य आहे, पण अस्पृश्यता खोटी आहे ,अशुद्ध असेल तर तो ब्राह्मण असला तरी देवळात येऊ नये व शुद्ध असला तर महारास ही देवळात येऊ द्यावे ,दर्शनाने बाटतो तो देवच नव्हे ,'असे सावरकर सांगत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रहाला व पंचवटीतील श्रीराम मंदिरात पूर्वास्पृश्यांना प्रवेश मिळण्याला सावरकरांनी पाठिंबा दिला होता.
अस्पृश्यतेचा नायनाट करणारी भारतीय घटना सेभेची घोषणा सावरकरांना फार महत्त्वाची वाटली .अमेरिकेसारख्या प्रगत देशात गुलामगिरीची चाल घालून देण्याकरता यादवी झाली. याचे स्मरण करून देऊन इतर देशांच्या तुलनेने भारतीय घटना परिषदेची 'ही' घोषणा मोठी समाजक्रांती आहे ,असे सावरकरांना वाटे.( तसे पाहिले तर, त्यावेळी सावरकरांना सरकारमध्ये काहीना काही स्थान मिळायला हवे होते .तसे काही झाले नाही .तरीसुद्धा सावरकरांनी अशाप्रकारे सरकारी निर्णयांचे कौतुक करणे ,यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.)

        राजकारण ही एका हातातील चढती तलवार व समाजकारण हे दुसऱ्या हातातील बचावती ढाल, दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. स्वातंत्र्यावाचून समाजसुधारणा अशक्य हे निर्विवाद ,तरी पण स्वातंत्र्य टिकवण्यासाठी समाज सुधारणेचा पाया घातला गेला पाहिजे. सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर ते तीन दिवस सुद्धा टिकणार नाही, असे सावरकरांचे कळकळीचे सांगणे असे. सध्याची 'स्वच्छ भारत श्रेष्ठ भारत 'ही कल्पना त्याच प्रकारची आहे .राजकीय पक्षांनी राजकारणाबरोबरच समाजकारण केले पाहिजे. स्वच्छते विषयी जागरूकता वाढली तसेच गावे  व शहरे स्वच्छ होत असताना दिसत आहेत.

      इतर अनेक सुधारकांच्या मानाने सावरकरांना अधिक अडचणी होत्या. साधारणपणे सर्व सुधारकांना समाज प्रतिकूल होता पण त्यांना सरकार अनुकूल होते. याउलट सावरकरांना समाजही प्रतीकुल होता व सरकारही प्रतीकुल होते .रत्नागिरीत त्यांच्या घराच्या झडत्या अनेक वेळा घेण्यात आल्या होत्या त्यामुळे सर्वसाधारण मनुष्य सावरकरांची संबंध ठेवण्यास भीत असे. ज्या रत्नागिरीत हिंदू  सभेद्वारे ते सामाजिक सुधारणेची चळवळ चालवित, तिची आर्थिक स्थिती तरी काय होती? सन 1929 च्या वर्षअखेर रत्नागिरी हिंदू सभेपाशी फक्त सव्वा रुपया शिल्लक होता.

     अस्पृश्यता व जातिभेद यांची त्यांना व्यक्तिशः कोणतीही झळ लागली नव्हती ,तरीही ते या रुढीं विरुद्ध लोकप्रियता तुच्छ मानून जीवापाड झटले .पूर्वास्पृश्यान विषयी त्यांना मनापासून कळवळा होता. पूर्व अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाच्या वेळी,' मला देवाचे दर्शन घेऊ द्या' ही कविता रचतांना त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होते अशी आठवण ना .स .बापट या रॉय वादी गृहस्थांनी त्यांनी लिहून ठेवली आहे.

      अशा कृती वीर व विचार वीर समाजसुधारकाचे कृतज्ञ स्मरण आपण केलेच पाहिजे. शक्य असेल तर त्यांचा संदेश अल्पांशाने का होईना कृतीत आणला पाहिजे. तेही जमत नसेल तर निदान त्यांचे विचार तरी समजून घ्यावे ,शक्य तर दुसऱ्यांना सांगावे,हे ही जमले नाही तर त्यांना अनुल्लेखाने मारण्याचे व त्यांच्या कार्यावर क्षुद्र आक्षेप घेण्याचे पाप तरी किमान करू नये.

@निलेश खांडवेकर, भुसावळ 

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या