साहित्यिक सावरकर



    'मी वृत्तीने कवी आणि कलावंत आहे ,पण परिस्थितीने मला राजकारणी पुरुष बनवले आहे.' असे  स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत. काव्य ,निबंध, कथा, कादंबरी ,नाटक, इतिहास, चरित्र,आत्मचरित्र ,पत्रकारिता, भाषा व लिपी सुधारणा अशा विविध साहित्य प्रांतात संचार करणारा दुसरा साहित्यिक मराठीतच काय पण अन्य भाषांतही नसेल. त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबई 1938 व अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सांगली 1943 या दोन्हींचे अध्यक्षपद भूषविले होते.

      सावरकरांची साहित्यसेवा सुमारे 7 दशकांची आहे .त्यांनी आपली पहिली कविता ,'श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग ',1894 साली म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी भगूर येथे रचली. ती पुण्याच्या 'जगतहितेछु 'ने प्रसिद्ध केली होती. 'आत्महत्या की आत्मार्पण 'हा त्यांचा शेवटचा लेख सह्याद्रीत 1964 साली प्रसिद्ध झाला.

      अंदमान कारागृहात लेखन साहित्य बंदी असल्यामुळे ते कोठडीच्या भिंतीवर काट्याने अथवा खिळ्याने कविता लिहित .असे केल्याने सरकारी इमारतीची नासधूस करतो म्हणून हात व पाय बेडीची शिक्षा होऊन त्यांना दिवसभर टांगून उभे राहावे लागे ,त्या अवस्थेत ते कविता पाठ करीत.

        कोठाड्यांची अदलाबदल होऊन त्यांच्या कोठडीत प्रयागच्या ,'स्वराज्य ' पत्राचे संपादक रामहरी आले. हिंदी भाषिक रामहारींना सावरकरांनी मराठी शिकवले. त्यांनी कोठडीच्या भिंतीवरील काव्य पाठ केले. कोठडीतून सुटल्यावर सावरकरांचे धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव यांना भेटून शेकडो ओळी त्यांनी म्हणून दाखवल्या, त्यावरून कमला काव्याचे हस्तलिखित तयार झाले. सन 1921 मध्ये सावरकरांना अंदमानातून रत्नागिरीच्या कारागृहात आणण्यात आले, तेव्हा संधी साधून ती वही सावरकरांना दाखवण्यात आली, सावरकरांनी घाईघाईने लिहिलेल्या चार ओळींच्या प्रस्तावनेसह 'वीजनवासी ' या कवीच्या टोपण नावाखाली 1923 साली 'कमला' हे काव्य प्रसिद्ध झाले.

       सावरकरांची' काळेपाणी 'ही कादंबरी वाचताना त्यांचे लेखन कौशल्य लक्षात येते. सदर कादंबरीत त्यांनी प्रत्येक व्यक्ती चरित्राचे प्रसंगाचे व निसर्गाचे वर्णन अगदी सुस्पष्ट व हुबेहूब केलेलं असल्यामुळे प्रत्येक प्रसंग व घटना जशीच्या तशी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते आणि कादंबरी वाचताना आपण जणू काही 'काळेपाणी' नावाचा चलचित्रपट बघत आहोत असा आभास निर्माण होतो.

      ' सहा सोनेरी पाने' हा त्यांच्या उतारवयातील ग्रंथ .तो त्यांनी लेखनिकाला सांगितला, अंदमानातील कदांनामुळे व तेथील एकूण अनारोग्य यामुळे त्यांची पचनक्रिया अधून मधून बिघडत असे व त्यांना पोटात अचानक दुखू लागत असे ,एकदा लेखनिकाला ग्रंथ सांगत असताना त्यांच्या पोटात अचानक कळा येऊ लागल्या व ते हाताने पोट घट्ट धरून स्वस्थ बसले ,'तुम्हाला आज बरे नाही ,आता थांबू उद्या लिहू ',असे लेखनिक म्हणाला तेव्हा ,'आज एक तरी पान पुरे करू, प्रतिदिनी एक पान केले तरी वर्षाच्या अखेरीस साडेतीनशे पानांचा ग्रंथ होतो', असे त्यावर सावरकर म्हणाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि विविध आंदोलनांच्या रणधुमाळीत मोठ्या आकाराच्या सुमारे 4500 पृष्ठांचे श्रेष्ठ साहित्य कसे निर्माण करता येते याचे जणू उत्तर सावरकरांनी दिले होते.

       मराठीत देशभक्तीपर काव्य करणारे ते पहिले वीर कवी आहेत.' तारकांस पाहून', ही त्यांच्या इंग्लंडच्या जल प्रवासातील कविता देशाबाहेर रचलेली पहिली मराठी कविता आहे .त्यांचे 'जोसेफ मॅझिनी' देशाबाहेर लिहिले गेलेले पहिले मराठी पुस्तक आहे .त्यांची 'लंडनची बातमीपत्रे' परदेशातून मराठी वृत्तपत्रांना पाठवलेली पहिली बातमीपत्र आहेत. संपादक ,दिग्दर्शक, नेपथ्य, बाह्य चित्रण ,पार्श्वसंगीत, मुख्याध्यापक, हुतात्मा ,अर्थसंकल्प, महापौर ,यासारखे शेकडो प्रचलित शब्द सावरकरांचे आहेत. मराठीला विनायकाने अनंत हस्ते दिले आहे .आपण आपल्या दोन करांनी काय घेऊ शकतो ?हा प्रश्न आहे .किमान दोन करांनी वंदन केले तरी जीवनाचे सार्थक आहे.

@निलेश खांडवेकर, भुसावळ.

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या