परम पवित्र भगवा ध्वज



@प्रणव नागराज

   विशाल हिंदू समाजाच्या अंतर्गत  निरनिराळे धार्मिक पंथ अथवा संप्रदायाचे अनुयायी आहेत. ते आपल्या पंथ किंवा संप्रदायाच्या श्रेष्ठ पुरुषाला किंवा संस्थापकाला गुरू मानतात आणि ते आदर्श आपल्या अंगी बानण्याचा प्रयत्न करतात. गुरू त्यांना मार्गदर्शन करतात. परंतु आपल्याला ठाऊक आहे की, गुरुपूजनाविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वत:चा असा एक वेगळा दृष्टिकोन आहे.

     संघ कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तीला 'परिपूर्ण' आदर्शाच्या रूपाने ना पाहतो, ना मानतो. याचे कारण असे की व्यक्ती कितीही श्रेष्ठ असली तरी त्याच्यामध्ये काहीना काही गुणदोष असण्याची शक्यता असते. म्हणून गुरू म्हणून संघाची धारणा एकदम निराळी आहे. आपल्या धर्मात सांगितले गेले आहे की, गुरू आणि परमात्म्याविषयी एकच श्रद्धा ठेवली पाहिजे. गुरू आणि परमात्म्याचे महत्त्व एकच असल्याचे सांगितले गेले आहे. परंतु वास्तविक असा एक विचारण्यासारखा प्रश्न आहे की, असा एखादा जीव या सृष्टीत आहे का की, ज्याची तुलना सृजनशील परमात्म्याबरोबर हाऊ शकेल ? जो आमचा खराखुरा पथदर्शक आहे, आमचे ध्येय व आदर्शाची साक्षात मूर्ती आहे, तसेच आमच्या कार्याचे साकार स्वरूप आहे, तोच आमचा गुरू होऊ शकतो. संघ निर्माते डॉ.हेडगेवार खरोखरच असामान्य. त्यांनी धर्म, संस्कृती, परंपरा, इतिहास याचे स्मरण करून देणारे आणि राष्ट्राचे चैतन्य जागृत ठेवणारे प्रतीक त्यांच्या दिव्य चक्षुने पाहिले. ते प्रतीक म्हणजे त्याग, शौर्य व बलिदान याचे प्रतीक असलेला परम पवित्र भगवा ध्वज होय..!!

   सामान्यपणे कोणताही माणूस काम करताना आपल्या स्वार्थाचा विचार करतो. यामुळे कधी कधी लोक प्रश्न विचारतात की, या कामाचा आम्हाला काय फायदा?  संघात जसे वैयक्तिक अभिमान, स्वार्थ याला स्थान नाही, तसेच संस्थेच्या अभिमानालाही वाव नाही. संघ केवळ आपल्या अखिल भारतवर्षाचा अभिमानी आहे. आम्हाला दुसऱ्या कोणत्या ध्वजाचा अनादर करावयाचा नाही, पण आमच्या श्रद्धा प्राचीन भारताच्या इतिहासाला आणि परंपरागत भगव्या ध्वजालाच समर्पित आहेत. संघाचे स्वयंसेवक भगव्या ध्वजाला प्रणाम करून ज्या ज्या वेळी समाजावर संकट येते त्या त्या वेळी कुणाच्या आदेशाची वाट न पाहता धावून जातो व त्या कार्यात स्वतःला झोकून देतो.  

    पाकिस्तानबरोबर आपली तीन युद्धे झाली. १९४७ च्या पहिल्या युद्धात केवळ ४८ तासात विमाने उतरू शकतील असा विमानतळ जम्मूच्या पर्वतीय भागात स्वयंसेवकांनी बांधला होता. हे कार्य मजूर लावून इतक्या कमी अवधीत पूर्ण करणे निव्वळ अशक्य होते. १९६५ च्या दुसऱ्या युद्धात राजधानीची व्यवस्था व प्रशासनाचे कार्य सहजपणाने स्वयंसेवकांनी सांभाळले. १९७१ च्या सर्वंकष युद्धाच्या वेळी तर आघाडीवर तोफांचा आणि मशिनगन्सचा भडीमार चालू असताना तरुण स्वयंसेवक थेट खंदकापर्यंत जात असत. जखमी जवानांना मदत करीत, त्यांच्यासाठी गरम पेय घेऊन जात. हे तर साक्षात मृत्यूच्या मुखातले धाडस होते. लष्करातील अधिकाऱ्यांना प्रश्न पडे की इतके प्रशिक्षण यांना कसे, कोणी दिले? आपण जाणतो की संघशाखेत काही लष्करी शिक्षण नसते, तरीही असे कार्य यशस्वीपणे करण्याचे सामर्थ्य कुठून मिळते? तर ते मिळते समर्पणाच्या भावनेतून. एका अर्थाने सहजपणे ती गुरूदक्षिणेची पूर्तीच असते.

    १९२८ च्या व्यासपौर्णिमेला संघाचा पहिला गुरूपूजनाचा उत्सव झाला. आदल्या दिवशी डॉक्टरांनी स्वयंसेवकांना सांगितले, "उद्या गुरूपूजनाचा उत्सव साजरा होईल. तेव्हा ज्याने त्याने आपल्या श्रद्धेनुसार फुले व दक्षिणा घेऊन यावे." या सूचनेने स्वयंसेवकात तर्कवितर्क लढविले गेले. कोणी म्हणाले, "उद्या गुरू म्हणून आपणाला डॉक्टरांचे पूजन करावयास मिळेल." परंतु दुसऱ्या दिवशी ध्वज उभारून झाल्यावर त्याचे पूजन करावयास सांगताना डॉक्टरांनी जे विचार मांडले ते ऐकल्यावर स्वयंसेवकांचा भ्रमनिरास झाला. संघाची गुरुपूजनाची कल्पना त्यांनी स्पष्ट केली. या पहिल्या गुरूपूजनाच्या वेळी ८४ रुपये व काही आणे दक्षिणा ठेवली गेली. त्यात एका स्वयंसेवकाने समर्पण केलेला अर्धा पैसाही होता. तेव्हापासून संघात गुरूपूजन चालू आहे. 

    याचना न करता राष्ट्रव्यापी संघटनेच्या कार्यासाठी लागणारे धन अव्याहतपणे मिळत आहे. अशी दक्षिणा देताना कोणावर भारही पडत नाही व दिलेल्या धनाच्या मागे उपकाराची भावनाही रहात नाही. शिवाय कोणी किती गुरूदक्षिणा ठेवली याचा विचार मनात येत नाही.
विचार फक्त एकच...

"कटिबद्ध उभे तव छत्राखाली भारतभूसंतान ।"
"गुरू वंद्य महान, भगवा एकची जीवनप्राण ॥"
"अर्पण कोटी कोटी प्रणाम!!!"

(लेखक भुसावळ येथील स्वयंसेवक आहेत.)

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या