"मातृहृदयी बनसोडे काका"
आज सकाळी पेपर वाचतांना निधन वार्ता मधे भास्करराव बनसोडे यांच्या दुःखद निधनाची बातमी वाचली.पेपर वाचत असतांना पेपरची पाने पलटत होती पण मन मात्र बनसोडेकाकांभोवती फिरत होत,कारणही तसच होत, बनसोडे काकांचा आणी माझा परिचय लहानपणापासून माझ्या वडिलांमुळे होता.त्यांचा प्रेमळ हात माझ्या डोक्यावरुन फिरवायचे ही मातृहृदयी संवेदना आजही जाणवते.
बनसोडेकाका आंबेडकर चळवळीचे निष्ठावान कार्यकर्ते होते,परंतु चळवळीचे काम करतांना "मी रा.स्व.संघाचा स्वयंसेवक आहे" ही ओळख कधी लपवून ठेवली नाही.या निर्भीड पणामुळे अनेक समाजमंडळी त्यांचेवर नाराज असत,परंतु त्याची त्यांनी कधी पर्वा केली नाही.संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू.श्री गुरुजी यांचे बद्दल बनसोडेकाकांना नितांत आदर होता.
श्री गुरुजी यांच्या भुसावळ येथे झालेल्या बौध्दीक वर्गाला ते गेले होते,तेथे श्री गुरुजींचा परिचय झाल्याचे ते अभिमानाने सांगत.संघाचे विजयादशमीचे संचलन जुने जळगावातील राम मंदिरावरुन निघत असे तेव्हा आपल्या मुलांना ते आग्रहाने सांगत संचलनाचे स्वागत पुष्पवृष्टीने करा.
संघाचे काम करणारे त्या काळात डॉ.अविनाश आचार्य,चिंतुकाका लेले,केशवराव भोईटे,भैया पाटील,घोगरबुआ इंगळे या सर्व मंडळीशी बनसोडे काकांचे जिव्हाळ्याचे सबंध होते.रा.स्व.संघाला त्या काळात मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागत असे.संघ जातीयवादी, दलीत विरोधी,मनुवादी, गांधीचा हत्यारा असे बिनबुडाचे आरोप संघावर होत असत त्या काळात संघ असा नसुन शुध्द राष्ट्रवादी विचारसरणीचा असल्याचे सांगणारे बनसोडेकाका होते. संघविचार व आंबेडकर चळवळ यांना जोडणारा एका पुलाचे (Bridge) काम बनसोडेकाका करायचे.
बनसोडेकाकांनी वैचारिक लेखन केल्याचे माहित नाही, परंतु व्यक्तिगत जीवनात त्यांनी जो आदर्श प्रस्थापित केला त्याने अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली.
पूजनिय बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तीन सुत्रावर आधारित जीवन रचना मांडली, याचे आचरण बनसोडेकाका करत होते. एकदा स्वीकारलेली निळी टोपी (आंबेडकरांचा विचार) बदलली नाही. बनसोडे काकांचा समरस समाज निर्मितीचा प्रयत्न सदैव प्रेरक राहील.
@दीपक घाणेकर
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या