२ मार्च अर्थात रावलापाणी संघर्ष दिवस. हा दिवस रावलापाणी हुतात्मा दिन म्हणूनही ओळखला जातो. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील 'रावलापाणी' येथे २ मार्च १९४३ रोजी ब्रिटिश अधिकाऱ्याच्या आदेशावरून जनजाती बांधवांच्या जमावावर निर्घृणपणे गोळीबार करण्यात आला होता. ज्यामध्ये १२ जणांचा मृत्यू तर १५ जण गंभीर जखमी झाले होते.
या संघर्षाचे कारणही तसेच होते. मुख्य प्रवाहापासून कायमच उपेक्षित राहिलेला जनजाती समाज संत गुलाम महाराजांच्या प्रेरणेतून संघटित होऊ लागला होता. जनजाती तरुण व्यसनापासून मुक्त होत होते. आपापसातील भेद विसरून सर्वजण एकत्र येऊ लागले होते. संत गुलाम महाराजांनी आप धर्माच्या माध्यमातून समाज संघटित करायला सुरुवात केली होती. 'आप' म्हणजे आपण सर्वजण. 'आप की जय हो' असा नाराच दिला गेला होता.
१९३७ साली महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर महाराजांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. लहानपणापासून त्यांचा भक्तिमार्गाकडे कल होता. कित्येकवेळा त्यांनी पंढरीची पायी वारी केल्याचेही सांगितले जाते. त्यांनी समाज संघटन व जनजागरण साठी सामूहिक आरतीचा सोहळा सुरू केला. त्यांनी स्थापन केलेल्या पंथास 'आप' गुलाम महाराजांचा पंथ म्हणून संबोधले गेले.
गुलाम महाराजांना समाज दैवी पुरुष मानत होता. १९३८ मध्ये त्यांचे अल्प काळातच निधन झाले व त्यांनी सुरू केलेल्या कार्याची जबाबदारी त्यांचे धाकटे बंधू संत रामदास महाराजांनी उचलली. रामदास महाराजांनी गुलाम महाराजांच्या प्रमाणेच कार्य चालू ठेवले. समाज एकत्रिकरणासाठी त्यांनी आरती सुरू केली. १९३८ मध्ये आरती कार्यक्रमात सव्वा लाख इतका समुदाय जमल्याची नोंद आहे. यावरून जनजाती समाजाचे संघटन किती विशाल झाले होते हे लक्षात येते.
जनजाती समाजाचं संघटित रूप ब्रिटिशांच्या डोळ्यात सलू लागले होते. हा समाज कायमच ब्रिटिशांच्या विरोधात कुठे ना कुठे लढा देतच होता. त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांची दडपशाही सुरूच होती. त्यामुळे ब्रिटिशांनी 'प्रस्थापित समाज विरुद्ध जनजाती समाज' असा संघर्ष पेटवण्याचा कुटील प्रयत्न केला.
ब्रिटिश सत्तेच्या विरोधात देशभर आग धगधगत होती. सर्वत्र ब्रिटिशांच्या विरोधात निदर्शने आणि आंदोलने होत होती. अश्या वातावरणात इतक्या मोठ्या संख्येने जनजाती समाजाचे संघटित होणे ब्रिटिशांना परवडणारे नव्हते, त्यामुळे त्यांनी १९४१ मधेच सामूहिक आरतीवर बंदी आणली. परंतु संत रामदास महाराज व त्यांच्या अनुयायांनी या आदेशाला धुडकावून लावले. यानंतर जावळी येथे दंगल झाली व जाळपोळ झाली. त्यांनतर जिल्हाधिकाऱ्यांनी या भागात संचारबंदी लावून संत रामदास महाराजांसह तीस अनुयायांना जिल्हाबंदी केली.
१९४२ मध्ये 'चले जाव' आंदोलन सुरू झाले होते. या आंदोलनात ब्रिटिशांच्या विरोधात आपणही सहभागी होऊन आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले पाहिजे... तोपर्यंत आपल्यावरील जुलूम व अन्याय थांबणार नाहीत म्हणून जिल्हाबंदी असताना संत रामदास महाराजांनी आपल्या अनुयायांना चलेजाव आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
पाहता पाहता हजारोंच्या संख्येने जनजाती भिल्ल समाज महाराजांना येऊन मिळू लागला. मोरवडकडे जात असतानाच ब्रिटिशांनी निझरा नाल्यात भल्या पहाटे या समुदायाला घेरले व बेछूट गोळीबार सुरू केला.
कॅप्टन ड्युमनने काहीही दया माया न दाखवता दिसेल त्याला चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. जनजाती बांधवांनी धनुष्यबाण, भाले व लाठ्या काठ्यांनी जोरदार प्रतिकार केला. पोलिसांनी सुमारे सातशे लोकांच्या जमावावर केलेल्या गोळीबारात १२ माणसे ठार तर १५ जण जखमी झाली. दोनशे जणांना पोलिसांनी अटक करून पकडून नेले होते. येथील गोळीबाराच्या खुणा आजही तेथील खडकांवर उमटलेल्या दिसतात.
निद्रिस्त भारतीय जागा होत आहे, जनजाती समाज संघटित होत आहे, तरुणवर्ग वाम मार्गापासून दूर होऊन समाजाचा व देशाचा विचार करू लागला आहे... हा बदल ब्रिटिशांना नको होता. म्हणूनच त्यांनी 'फोडा आणि राज्य करा' ही नीती अवलंबली होती. याचा प्रत्यय सर्व समाजवर्गाला आला होता... त्यामुळे जनजाती बांधवांनीही ब्रिटिशांचा हा डाव यशस्वी होऊ न देता वर्ग संघर्ष वाढू दिला नाही.
जनजाती समाजाने देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे त्यांचे अस्तित्व होते तिथे तिथे मातृभूमी, स्वधर्म, संस्कृती व समाज बलशाली व संघटित होण्यासाठी देशविरोधी शक्तींच्या विरोधात आवाज उठवला व त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ दिले नाही.
आज आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होताय. देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात असंख्य देशभक्तांनी आहुती दिली. काही घटना इतिहासाच्या पानावर विराजमान झाल्या तर काही भारतमातेच्या चरणी अदृश्य स्वरूपात लिन झाल्या. मूळ प्रवाहापासून दूर राहिलेला जनजाती समाजसुद्धा भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता. संत श्री गुलाम महाराज व संत श्री रामदास महाराज यांच्यासारख्या महापुरुषांनी यशस्वी नेतृत्व केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रावलापाणी संघर्षात बलिदान देणाऱ्या वीरांना विनम्र अभिवादन..!
------------------------
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या