सेवाव्रती चंद्रिकाभाभी चौहान
----------------------------------------------------
ही गोष्ट आहे अशा नारीशक्तीची जिचा जन्म गुजरातमध्ये झाला, सासर राजस्थानमध्ये आणि आपली कर्मभूमी महाराष्ट्र (सोलापूर) ! त्या आज पूर्ण महाराष्ट्रात चंद्रिकाभाभी या नावाने ओळखल्या जातात. कधी काळी चंद्रिकाभाभी चौहान यांच्या घराला बँकेने कर्ज परतफेड झाली नाही म्हणून टाळे लावले होते,परंतु आपल्या स्वकर्तृत्वाने आज त्याच बँकेच्या त्या डायरेक्टर आहेत! भाभीजींचा हा प्रवास थक्क करून सोडणारा व प्रचंड प्रेरणादायी आहे. संभाजीनगर शहरात 6 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्ती मंचच्या वतीने 'मी' ते 'आम्ही'चा प्रवास.. हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात चंद्रिका भाभी यांनी आपल्या जीवनातील प्रेरक कहाणी उलगडली.
भाभीजी सोलापुरात आल्या तेव्हा त्यांना भाषेच्या अडचणी सोबत आर्थिक परिस्थितीचा ही सामना करावा लागला. संघ संस्कारात वाढलेल्या भाभीजींनी या परिस्थितीचा मोठ्या धैर्याने सामना केला. भाभीजी ह्या कमालीच्या निस्वार्थी आहेत.आपल्या सोबत कित्येक महिलांचे आयुष्य घडविणाऱ्या भाभीजी सगळ्या गोष्टींचे श्रेय मात्र टिमवर्कला देतात. ‘भाईजी’ म्हणजे… चंद्रिका भाभींचे पती हे संघाचे स्वयंसेवक! दुर्दैवाने भाईजी एका आजारात दोन वर्ष अंथरुणात पडले होते. घरातील कर्ता माणूस आजारी पडला आणि त्यामुळे घर चालवण्याची जबाबदारी भाभिजींवर पडली! घरात आता आर्थिक स्थिती बिघडली होती. तशातच कर्जाचे हप्ते भरू न शकल्यामुळे बँकेने घराला टाळे ठोकले. अशा बिकट परिस्थितीत भाभिजींकडे आता दोन पर्याय होते. एक तर राजस्थानमध्ये परतणे किंवा मिळेल ते काम करून इथेच आपला प्रपंच चालविणे. भाभीजींनी दुसरा मार्ग निवडला. मिळेल ते काम करून परिस्थिती सोबत जगायचे आपल्या कर्तृत्वावर आपल्या मेहनतीच्या जोरावर या बँकेने कर्जासाठी घराला टाळे लावले आज त्याच बँकेच्या भाभीजी डायरेक्टर आहेत. अत्यंत विस्मयकारक हा प्रवास आहे!
मार्ग कठीण होता, आव्हानात्मक होता. पण त्याचा स्वीकार आता झाला होता. अश्या वेळी भाभिजींना मदत झाली ती शिलाई मशीनची आणि अंगभूत कलागुणांची. याच कलागुणांचा उपयोग करून भाभीजींनी आपले भाग्य बदलण्याचा प्रयत्न केला. वस्तीत जाऊन जुने फाटके कपडे शिवण्यासाठी मागून आणायचे व त्या पैशातून आपले घर चालवायचे असा नित्यक्रम सुरु झाला. ह्या शिवणकामातून भाभीजींनी पहिल्या एक ते दीड महिन्यात 980 रुपयांची कमाई केली. 1987 ते 1988 मध्ये 980 रुपये रक्कम म्हणजे काही कमी नव्हती. ह्या पहिल्या कमाईमूळे भाभीजीच्या मनात अजून मेहनत करण्याची जिद्द निर्माण झाली. त्यातूनच शिवणक्लास घेणे, रांगोळी शिकवणे असे छोटे छोटे काम करायला सुरुवात केली. त्या कामातून वस्तीतील महिलांसोबत त्यांचा संपर्क वाढला व ह्या संपर्कामुळे त्या महिलांचेही दुःख भाभीजीना कळू लागले. त्यांच्या दुःखापुढे आपले दुःख फार कमी आहे असे भाभीजींना वाटू लागले.
इथून पुढे स्वतःच्या दु:खापेक्षा समाजाच्या दुख्खांचा विचार करून या महिलांच्या आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी भाभिजींचा कल वाढला. त्या महिलांसाठीही काहीतरी करावे हा विचार मनात निर्माण झाला. त्यांच्याकडे येणाऱ्या कित्येक महिलांना प्रशिक्षणाची महिन्याकाठची पन्नास रुपये फीस देणे शक्य नव्हते. कित्येकांची संध्याकाळच्या जेवणाची सोय सुद्धा नसायची. अशा सर्व महिलांची जबाबदारी भाभीजींनी ‘आई’ म्हणून स्वीकारली. ह्या विश्वासातूनच वस्तीतील महिला आपल्या घरातील भांडणे आईजवळ म्हणजे भाभीजीजवळ मांडू लागल्या. भाभिजींच्या प्रेमळ स्वभावामुळे ती भांडणे मीटू लागली. भाभीजींच्या ह्या प्रेमळ स्वभावामुळे वस्तीतील महिलांचा आता भाभीजींवर विश्वास वाढला होता.
वस्तीतील लोकांच्या विश्वासाच्या जोरावर राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. सोलापुरात नगरसेवक म्हणून भाभीजी निवडून आल्या. समाजातील विविध घटकांशी संपर्क होऊ लागल्यावर त्यांच्या लक्षात आले की, वस्तीतील वैदू समाज, बुरुड समाज हा सगळा वंचित समाज मोती-मणी विकून आपला प्रपंच चालवतो. हा व्यवसाय करत असताना स्वतःचा स्वयंपाक करून जेवण करणे त्यांना शक्य होत नाही. हि लोक एकतर बाहेर जेवण करतात किंवा दोन चार घरी भाजी भाकर मागून घेऊन पोटाची खळगी भरतात. अशी जणुकाही प्रथाच ह्या समाज बांधवांमध्ये पडली होती. हा सगळा प्रकार पाहून भाभीजींना त्यांच्या आरोग्याची काळजी वाटू लागली .भाभीजींनी ह्या वंचित समाजातील सगळ्या महिलांना एकत्र करून बचत गटाची स्थापना केली. त्याच बचत गटातील एका महिलेला पन्नास रुपये कर्ज देऊन आपला स्वतःचा नवीन उद्योग सुरु करण्यास त्यांनी प्रवृत्त केले.
भाभीजींनी त्या महिलेला गरमागरम पोहे तयार करून विकण्याची सूचना केली. बारा रुपयाच्या खर्चात त्या महिलेने 36 रुपये नफा कमविला. ही गोष्ट 1997 ची आहे. जी महिला उद्योग करण्यास तयार नव्हती, त्या महिलेला ‘...नाहीतर तुला नळ कनेक्शन भेटणार नाही’ अशी प्रेमापोटी भीती घालून त्या महिलेला नवीन उद्योगासाठी तयार केले. पोह्यासोबत नवनवीन वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ विकून त्या महिलेने त्याच भांडवलातून आपले स्वतःचे छोटेसे किराणा दुकान लावले. भाभीजींनी केलेल्या मार्गदर्शनातून 12 रुपयात आपल्या व्यवसायाची सुरुवात करणारी तीच महिला आज 15 ते 20 हजार रुपये दर दिवशी कमावते.असे 150 पेक्षा जास्त किराणा दुकाने आज बचत गटाच्या माध्यमातून सोलापूरमध्ये सुरू आहेत. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन असले की शून्यातून विश्व निर्माण होते हे या गोष्टीचे उत्तम उदाहरण आहे.
आपल्या परिस्थितीला आपल्या भुकेला कंटाळलेली एक न्हावी समाजातील भगिनी मदत मागण्यासाठी भाभीजींकडे आली व भाभीजींने केलेल्या मार्गदर्शनामुळे प्रभावित होऊन ती महिला दुसऱ्या दिवशी भाभीजींकडे आर्थिक मदत मागू लागली. बचत गटाच्या माध्यमातून भाभीजींनी त्या महिलेला 350 रुपयाचे कर्ज काढून दिले व ह्या पैशातून सलून व्यवसायासाठी लागणाऱ्या सामान विकण्याची सूचना केली. आज त्याच महिलेचा वार्षिक टर्नओव्हर 5.5 कोटी रुपयांचा आहे!
स्वतःचे भविष्य घडविण्याचा प्रयत्न, स्वतःच्या परिवाराचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचा प्रयत्न तर घरातील प्रत्येक महिला करते. परंतु स्वतःसोबत आपल्या असंख्य भगिनींची काळजी घेणाऱ्या चंद्रिका भाभीजी सारख्या समाजसेवी भगिनी दुर्मीळच असतात..! आज जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील समस्या पाहून त्या सोडवण्यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या असंख्य चंद्रिका भाभींच्या कार्य कर्तृत्वाला प्रणाम.
- राजेंद्र जैस्वाल, नांदेड
मो. 9403911180
नारी शक्ती मंच संभाजीनगर आयोजित 'मी' ते 'आम्ही'चा प्रवास... या कार्यक्रमाची लिंक. श्रीमती चंद्रिका भाभी यांचे संपूर्ण मनोगत यावरून ऐकत येईल
https://youtu.be/hapZUiH9hqQ
©विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या