जोपर्यंत भारत आहे, तोपर्यंत राम चरित्र आपल्यासाठी संजीवनी संदेश आहे. रामचरित्र अभ्यासताना आपण कधी असा विचार केलाय का हो? रावणाच्या बेंबीतच घाव करायचा होता, रावण तेवढ्या एका कृतीने मरणार होता, तर ते काम एकट्या हनुमंतानेही करून दाखवलं असतं. सीता माईला संदेश देण्यासाठी हनुमंत लंकेत गेले तेव्हाच रावणाचा काटा काढला असता. परंतु, ज्या समाजाला रावणाने छळलं. त्रास दिला. महिलांना पीडा दिली. साधू संतांच्या हत्या केल्या. दहशत पसरवली. अन्याय, अनीतीने समाजसोबत व्यवहार केला. त्या समाजाच्या सहभागीतेतूनच श्रीरामाला रावणाचा (शत्रूचा) नाश करायचा होता.
रामाला आपल्या प्रजेला स्व-संरक्षणक्षम करायचं होतं, आपल्या पायावर उभं करायचं होतं. कोणीतरी येईल आणि आपल्याला त्रासातून मुक्त करेल, हा भावच रामाला संपवायचा होता. हे राष्ट्र, ही भूमी, हा प्रदेश आपला आहे आणि त्याचं रक्षण करणं केवळ राजाची जबाबदारी नाही, तर प्रजेचीही आहे हा संस्कार रामाने प्रजेमध्ये निर्माण केला आहे.
14 वर्षाचा वनवास म्हणजे रामाला झालेली शिक्षा नव्हती. तर रामाने आपले राष्ट्र सुरक्षित, सक्षम व संघटित समाज निर्माण करण्यासाठी स्वीकारलेलं व्रत होतं. मग त्या समाजात जाताना रथ नको, आभूषणे नको, धन दौलत नको, सोबत सैन्य नको, रक्षक नको. सामान्य नागरिक होऊन जशी प्रजा जगते तश्या अवस्थेत राम निघाले होते.
समाजातल्या गरीब, श्रीमंत, व्यापारी, कष्टकरी, भटकंती करणारे, जंगलात राहणारे, आदिवासी अश्या सर्व स्तरातील लोकांना आपलंसं करून त्यांचं सैन्य उभारलं. त्यांना प्रशिक्षित केलं. त्यांच्या मनात रावणाला मारण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण केला. योग्य व्यवस्थापन, योग्य सल्ला, आणि योग्य निवड याच्या जोरावर रामाने रावणाचा पराभव केला.
सीता हरण निमित्तच होतं. अश्या कित्येक सीता रावणाने किंवा त्याच्या सैन्यातील राक्षसांनी, त्याच्या राक्षसी भावंडांनी पळवून नेल्या होत्या. पण आपण त्याला विरोध करू शकत नाही, रावण म्हणजे महापराक्रमी, त्याला विरोध केला तर आपल्याला मरावं लागेल. त्याच्या नादीच लागायला नको. लंकेतील लोक म्हणतील ती पूर्व दिशा होती. या भीतीने रावणाचे लोक जनतेचा छळ करत होते.
रामाने सर्वात अगोदर ही भीती आपल्या सैन्याच्या आणि समाजाच्या मनातून काढली. हनुमानाला लंकेत पाठवण्याचा उद्देश तोच होता. सीतेला संदेश देणं हेही निमित्तच. खरा उद्देश रावणाच्या गोटात आपला धाक निर्माण करणं आणि आपल्या प्रजेत आणि सैन्यात आत्मविश्वास निर्माण करणं हेच होतं. एकट्या हनुमानाने रावणाची लंका बेचिराख केली हे ऐकल्यावर काय आनंद झाला हो प्रजेला. सैन्याची आत्मशक्ती गगनाला भिडली. जी माणसं आपलं नेतृत्व करताय ती काही साधी सुधी नाहीत. त्यांच्या मागे गेलो तर यश आपलंच आहे, ही खात्री रामाच्या सैन्याची झाली. मग कसला समुद्र आणि कसला रावण.?
राम वनवासाला जातील असं ठरल्यावर रामाने आपली एकट्याची तयारी सुरू केली. ते पाहून सीतेला वाईट वाटले. तुम्ही वनवासात जाल, अनवाणी पायाने भ्रमंती कराल, किती कष्ट संकटं तुमच्या समोर येतील, आणि मी इथे महालात बसून मौज करायची का? हा माझा पत्नी धर्म नाही. मी तुमच्या सोबतच येणार. तुमची सुखदुःख ती माझी सुखदुःख, असं सीता रामाला सांगते. या प्रवासात कोणकोणत्या अडचणी, आव्हाने येतील याबद्दल राम सीतेला अवगत करतात. सीता माई स्वतः पार्वतीचा अवतार. रामाच्या वनवासाचा उद्देश त्यांना कळला नसेल काय? आपल्या पतीच्या राष्ट्रकार्यात आपलीही मदत होईल म्हणून सीतामाई सुद्धा सर्व सुख बाजूला सारून आपल्या पतीसोबत स्वतःला राष्ट्रकार्यात जोडून घेतात. लक्ष्मणाने तीच भूमिका घेतली आहे. बंधू कर्तव्य लक्ष्मणाकडून लक्षात येतं. भरतही रामासोबत जाण्यासाठी इच्छुक होते. नंतर भरत भेटीत रामाने समजूत काढल्यावर त्यांना आपल्या कर्तव्याची महती लक्षात आली.
रामचरित्र केवळ कथा म्हणून न वाचता त्यामागील 'राष्ट्रसंदेश' आपण समजून घेतला पाहिजे. राम चरित्र वाचताना त्यातील या सर्व पात्रांचा, कथांचा आणि रामाच्या भूमिकेचा सांगोपांग विचार केला तर एकच लक्षात येतं... राम आजही आपल्यात आहे. 'राष्ट्र' व 'समाज' बलशाली करण्यासाठी आपण रामाच्या सैन्यातील वानर बनायचं. भगवा ध्वज तेव्हाही आपला गुरू होता आजही आहे. आपल्या समोरील 'रावण' आणि त्यांच्या 'लंका' नेस्तनाबूत करायला कितीसा वेळ लागणार हो. जिथे राम आहे, तिथे सर्व शक्य आहे!!
बोला जय श्री राम!!
- कल्पेश जोशी, संभाजीनगर
मो. 8275257137
© विश्व संवाद केंद्र, देवगिरी
#रामनवमी
#रामचरित्रातील_राष्ट्रसंदेश
#ramnavmi
#राम
#रामराज्य
0 टिप्पण्या