"दुभंगून जाता जाता, मी अभंग झालो
चिरा चिरा जुळला माझा, आत दंग झालो"
या सुरेश भटांच्या ओळी वाचल्या आणि समोर रामभक्त हनुमानाची मूर्ती आली. 'हनुमंताच्या हृदयी राम' असे रामाचे वर्णन एका अभंगात केले आहे. स्वतःची छाती फाडून आतली रामाची मूर्ती दाखवणारा श्री हनुमान या ओळींतून किती सहज समोर येतो !
वायुपुत्र हनुमंत माता अंजनी आणि पिता केसरी यांच्या गृही चैत्र पौर्णिमेला जन्माला आला. मूलतःच अचाट शक्तीचा धनी, निर्भय आणि साहसी असा हा पुत्र पुढे समर्पण आणि भक्तीचे मूर्त रूप ठरला.
अतुलितबलधामं हेमशैलाभिदेहं
दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्
सकलगुणनिधानं वानराणामधिशं
रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि
सुंदर कांडातील मंगलाचरणाच्या या श्लोकाचा अर्थ असा की, अतुलित बलशाली असणारा, सुवर्ण पर्वताप्रमाणे कांती असणारा, दैत्य रुपी वनासाठी अग्नि रूप असणारा, ज्ञानियांमध्ये अग्रगण्य, सर्व गुणांचे धाम, वानरांचा अधिपती आणि रघुपती राघवाचा प्रिय भक्त अशा वायूपुत्राला नमन असो. असा ब्रह्मचारी महात्मा हनुमान आपल्यासमोर येतो ते अत्यंत प्रामाणिक आणि समर्पित सेवक म्हणून.
रामायणात हनुमंताचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्याचे महात्मा असणे त्याच्या प्रत्येक कृतीतून प्रतीत होतांना दिसते. रामायणातील कथा आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहेत. रामाच्या वनवासाच्या काळात राम आणि हनुमंताची भेट झाली. हनुमानाचे यौगिक संतपण रामाचे देवत्व ओळखण्यास सक्षम होतेच. इथूनच श्रीराम आणि हनुमान यांच्या नात्याचा एक सुरेख अध्याय सुरू झाला. पुढे हनुमंत सागर ओलांडून सीतेचा शोध घेतला, रावणाचे गर्वहरण केले, विभीषणाला उपदेश केला, लक्ष्मणाचे प्राण वाचविले, अहिरावणाच्या तावडीतून श्रीराम - लक्ष्मणाची सुटका केली आणि हे सगळे करून आपल्याला केवळ रामाच्या चरणांची सेवा अखंड करता यावी म्हणून रामाच्या चरणी मागणे मागितले. हनुमान हा असा समर्पित योद्धा आहे. रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्याने आपल्या राममय असल्याचा पुरावा दिला तो राम - सीतेची हृदयस्थ मूर्ती दाखवून ! हनुमानाचे मोठेपण ही एकरूपता आहे.
रामायणातील प्रत्येक महत्वाच्या घटनेमागे हनुमानाचे कर्तृत्व आहे मात्र या कार्याचा आणि कर्तृत्वाचा कुठलाही अभिनिवेश न बाळगता आपल्या आराध्यावर असलेली असीम भक्ती आणि समर्पण हेच कायम त्याच्या जीवनाचे सार आहे. हनुमंताची भक्ती किती श्रेष्ठ? तर रामरक्षेत 'श्रीमद् हनुमान कीलकम्' म्हणजे 'रामापर्यंत पोहोचण्याची गुरुकिल्ली' असे हनुमंताचे वर्णन केले आहे. हे जाणूनच समर्थ रामदासांनी लोकमानसात श्रीरामाची भक्ती रुजवली मात्र शक्तीची उपासना आणि भक्तीची प्रेरणा देणारी हनुमंताची मंदिरे ठिकठिकाणी स्थापन केली.
हनुमंताचे जीवन हे आदर्शांना प्रस्थापित करणारे आहे. त्याने तन - मनाने अखंडपणे रामाचे चिंतन केले, नामस्मरण केले आणि त्याला अमरत्व मिळाले. आदर्शांच्या प्रस्थापनेसाठी असलेली नामाची ही शक्ती म्हणजे हनुमंत आहे, कार्यातील अलिप्तता म्हणजे हनुमंत आहे, अखंड आराध्याचा ध्यास म्हणजे हनुमंत आहे आणि संपूर्ण समर्पण म्हणजे हनुमंत आहे ! रामाचा पथ सत्याचा आणि आदर्शांचा ! हनुमान या मार्गावरील मार्गदर्शक आहे. आदर्शाची वाट कशी निभवावी याचे प्रतीक आहे.
सप्तचिरंजीवांच्या यादीत हनुमंताचे नाव घेतले गेले कारण हनुमंत एक वृत्ती आहे, एक भाव आहे.
आज लोकमानसाची पुनर्बांधणी करत असतांना जेव्हा रामाचा आदर्श समोर ठेवला जातो आहे तेव्हा या आदर्शाच्या प्राप्तीसाठी प्रत्येकाच्या मनात हनुमंत जन्माला यावा लागेल. तेव्हाच एक सच्चा कार्यकर्ता घडेल, कामाच्या प्रति निष्ठा निर्माण होईल आणि देशाच्या उभारणीत समर्पित भावनेने प्रत्येकाचा सहभाग होईल.
हनुमान जयंतीच्या निमित्ताने या गुणांचे स्मरण करून ते प्रत्येक मनात रुजवण्याचा प्रयत्न करूया !
- मधुरा गजानन डांगे, नंदुरबार
© विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या