लोकमान्य टिळक आणि रायगडावरील शिवसमाधी


रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधी स्मारक जीर्णोद्धार व मेघडंबरी निर्मितीच्या संदर्भात राज ठाकरे यांनी ‘‘लोकमान्य टिळक यांनी रायगडावरील सध्याच्या शिवस्मारकाची निर्मिती केली आहे’’ असे विधान केले. त्यावर टीका करीत असताना इंद्रजीत सावंत आणि जितेंद्र आव्हाड यांनी ‘‘लोकमान्य टिळकांचा या समाधी स्मारकाच्या निर्मितीशी काहीही संबंध नाही'' असे सांगून त्यांच्या कार्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या संदर्भात लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने खालील निवेदन आपल्या माहितीसाठी देत आहोत. कृपया त्याची नोंद घेऊन योग्य ती प्रसिद्धी द्यावी ही विनंती.

१२७ वर्षांपूर्वी म्हणजेच १८९५ मध्ये लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना केली. याच मंडळाच्या माध्यमातून रायगडावरील शिवसमाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला. टिळकांचे या मंडळाच्या स्थापनेमागचे उद्देश रायगडावरील समाधीचा जीर्णोध्दार, शिवजन्मोत्सव, शिवपुण्यतिथी तसेच शिवचरित्राचा प्रचार, प्रसार करणे असे होते.

 सन १८१८ मध्ये ब्रिटिशांनी रायगड किल्ला जिंकल्यानंतर जाणीवपूर्वक रायगडावरच्या वास्तूंचा विध्वंस केला. तसेच सामान्य लोकांना रायगडावर जाण्यास मनाई केली. शिवतीर्थ रायगडाच्या दर्शनाने येथील जनतेमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होऊ शकते व इंग्रजी राज्याविरुध्द उठाव होऊ शकतो हा धोका टाळण्यासाठीच त्यांनी असे केले होते. 

     सन १८८३ साली जेम्स डग्लस नावाचा एक इतिहासप्रेमी इंग्रज शिवचरित्र वाचून जिज्ञासेपोटी गडावर गेला. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दुरावस्थेविषयी त्याने आपल्या 'बुक ऑफ बॉम्बे' या पुस्तकात ब्रिटिश सरकारवर टीका केली. डग्लसचे हे वर्णन वाचून त्यावेळच्या मराठी माणसाच्या मनात अस्वस्थता पसरली. त्याचा परिणाम म्हणून सन १८८५ साली लोकमान्य टिळक यांच्या पुढाकारातून, न्यायमूर्ती रानडे, रावबहादुर जोशी, न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती कुंटे इत्यादी तत्कालीन समाजधुरिणांनी पुण्यातील हिराबागेत एका सभेचे आयोजन केले. त्यात समाधी जीर्णोध्दारासाठी  एका समितीची स्थापना करण्यात आली तसेच रायगड आणि समाधीच्या दुरावस्थेविषयी ब्रिटिश सरकारकडे एक निवेदन पाठविण्यात आले. त्याचा परिणाम ब्रिटिश सरकारने सालाना फक्त ५ रुपये नेमणूक केली. पुढे ३० मे १८९५ रोजी लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या हिराबागेत पुन्हा एकदा भव्य सभेचे आयोजन केले. या सभेला श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी, सेनापती दाभाडे, बापूसाहेब कुरूंदवाडकर, सरदार पोतनीस इ. नामवंत मंडळी उपस्थित होती. या सभेमध्ये लोकमान्य टिळकांनी शिवरायांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णोध्दाराची भावी योजना मांडून त्यासाठी निधी देण्याचे आवाहन केले. या कार्यासाठी एका मंडळाची स्थापना झाली. तेच हे 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ' होय. श्री. दाजी आबाजी खरे यांची मंडळाचे अध्यक्ष म्हणून व लोकमान्य टिळकांची चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली.

 लोकमान्य टिळकांनी 'केसरी', 'मराठा'च्या माध्यमातून समाधीच्या जीर्णोद्धारासाठी देणग्यांचे आवाहन केले. या सगळ्या कार्याकडे लक्ष वेधणे व जनजागृती करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी रायगडावर शिवजन्मोत्सव व पुण्यतिथी सोहळा करण्याची योजना आखली. 

टिळकांच्या उपस्थितीत दि. २४ व २५ एप्रिल १८९६ असे दोन दिवस रायगडावरील पहिला शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला.

 रायगडाचा ताबा ब्रिटिश सरकारकडे असल्याने लोकमान्य टिळकांनी मंडळाच्या वतीने शिवस्मारकाच्या जीर्णोध्दाराची परवानगी मागितली. परंतु ब्रिटिश सरकारने ती नाकारली. तेव्हा लोकमान्य टिळक आणि दाजी आबाजी खरे यांनी १९०६ साली ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टनकडे एक निषेध पत्र पाठवून त्यात सुनावले की, ''शिवाजीराजांच्या प्रती आम्हां सर्व प्रजेला सार्थ अभिमान आहे. राजांच्या स्मारकाची दुर्दशा झाली आहे. त्या राजाला शोभेल अशी स्मारकाची जीर्णोध्दारीत समाधीची वास्तू उभी करण्याचा संकल्प मंडळाने योजला आहे याला मान्यता देणे आपणास भाग आहे.''

 लोकमान्य टिळकांच्या आवाहनातून अनेक शिवभक्तांनी उदार हस्ताने समाधी जीर्णोद्धार कार्यासाठी दिलेला निधी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने डेक्कन बँकेमध्ये साठविला होता. दुर्दैवाने ही डेक्कन बँक १९१३ साली बुडीत निघाली. त्याविरुद्ध टिळक आणि खरे यांनी पुणे फर्स्टक्लास कोर्टात दावा दाखल करून व्याजासह रु. ३३,९११/- किंमतीचे हुकुमनामे मिळविले. परंतु त्याची अंमलबजावणी सुरु होण्यापूर्वी बँक लिक्विडेशनमध्ये निघाली. त्यामुळे मंडळाच्या या कार्याचे फार नुकसान झाले.

 लोकमान्य टिळकांनी डगमगून न जाता पुनश्च हरी ओम म्हणत निधी जमविण्याच्या कार्याला सुरुवात केली व तब्बल बारा हजार रुपयांचा निधी जमा केला. याचबरोबर टिळक ब्रिटिश सरकारकडे समाधीच्या जीर्णोद्धाराची परवानगी मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करीत होते. दरम्यान लोकमान्य टिळकांचे १९२० साली दुखद निधन झाले. टिळकांच्या पश्चात हा संघर्ष चालूच राहिला. लोकमान्यांनी सुरु केलेल्या या संघर्षाला ३० वर्षानंतर यश प्राप्त झाले. त्यावेळचे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सचिव न. चि. केळकर यांना जीर्णोद्धाराची परवानगी देणे ब्रिटीश सरकारला भाग पडले. टिळकांच्या निधनानंतर ५ वर्षांनी म्हणजेच ६ फेब्रुवारी १९२५ला ब्रिटिश सरकारने समाधीच्या जीर्णोद्धाराची परवानगी दिली.

 ब्रिटिश सरकारने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाला समाधी जीर्णोद्धाराच्या परवानगीसाठी ६ फेब्रुवारी १९२५ रोजी Duggan E. M. (under Secretary to Government) यांच्या सहीने G. R. No. 7023 पारित केला होता. तो आपल्या संदर्भासाठी सोबत जोडत आहोत.

 श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे रु. १२ हजार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रु. ५ हजार आणि पुरातत्त्व विभागाचे रु. २,०४३/- असे १९,०४३/- रुपये एकत्रित निधीतून समाधीच्या जीर्णोद्धारास सुरुवात झाली.

रत्नागिरीच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या वतीने व रायगड मंडळाच्या देखरेखीने प्लॅन तयार करून कामाला सुरूवात झाली.

 श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने सादर केलेल्या आराखड्याप्रमाणे मंडळाच्या देखरेखीखाली पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, रत्नागिरी विभागाच्या माध्यमातून सन १९२६ साली आज आपण पाहतो ती शिवाजी महाराजांची जीर्णोध्दारीत समाधीची वास्तू उभी राहिली. समाधीचे बांधकाम कंत्राटदार सुळे यांनी केले तर त्यावरील शिल्प प्रसिद्ध शिल्पकार विनायकराव करमरकर यांनी तयार केले.      समाधीचा लोकार्पण सोहळा ३ एप्रिल १९२६ रोजी शिवपुण्यतिथी दिनी पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरकर राजे श्रीमंत लक्ष्मणराव भोसले, मंडळाचे अध्यक्ष सीतारामपंत टिळक, चिटणीस न. चि. केळकर, डॉ. बा. शि. मुंजे इ. मान्यवर उपस्थित होते.

 समाधी निर्मितीचा अहवाल सर्व पुराव्यांनिशी महाराष्ट्र सरकारने १९७४ साली (Shivaji Memorials The British Attitude, A.D. 1885-1926) या ग्रंथात प्रसिध्द केला आहे. त्याचे संकलन तत्कालीन पुरातत्व आणि पुराभिलेखागार संचालक व्ही. जी. खोबरेकर यांनी केले आहे.

 लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून गेली १२७ वर्षे रायगडावर शिवपुण्यतिथीचा सोहळा पार पडत आहे. तसेच रायगड किल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत.

 ज्या लोकमान्य टिळकांनी रायगडावरील शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचा ध्यास घेऊन आयुष्यभर कार्य केले तसेच शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून भारतीयांना स्वातंत्र्यासाठी संघर्षाची प्रेरणा दिली त्या लोकमान्यांवर जातीय द्वेषातून आरोप करून त्यांचे श्रेय नाकारणे यासारखे दुर्दैव दुसरे नाही!

संदर्भ :
१) Shivaji Memorials The British Attitude, A.D. 1885-1926, Editor : V. G. Khobrekar, Director of Archives & Archaeology published by Maharashtra State Government 1974.
२) ब्रिटिश सरकारने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाला समाधी जीर्णोद्धाराच्या परवानगीसाठी ६ फेब्रुवारी १९२५ रोजी Duggan E. M. (under Secretary to Government) यांच्या सहीने पारित केलेला G. R. No. 7023.

Facebook Post 
https://m.facebook.com/story.php?story_fbid=5604599962901228&id=100000538406473





सुधीर थोरात    जगदीश कदम 
कार्यवाह          माजी अध्यक्ष       

पांडुरंग बलकवडे   रघुजीराजे आंग्रे
सरकार्यवाह         अध्यक्ष 
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ

माहिती साभार - श्री सुधीरजी थोरात

-- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या