परभणी। दि. २८ मे २०२२
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ पुस्तकातून समजणारी बाब नसून संघाची विचारधारा समजून घेण्यासाठी संघाच्या शाखा स्तरापासून अनुभव घेण्याची गोष्ट आहे, असे प्रतिपादन परभणी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत कार्यवाह श्री हरिशजी कुलकर्णी यांनी परभणी संपन्न झालेल्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप भाषणात केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांताच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचे आयोजन मागील २१ दिवसापासून परभणी येथील राजे संभाजी गुरुकुल येथे करण्यात आले होते. या संघ शिक्षा वर्गाचा प्रकट समारोप शनिवार दिनांक २८ मे रोजी सायंकाळी ६:०० वाजता संपन्न झाला. या समारोपाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे सातेफळ तालुका वसमत येथील श्री प्रल्हादजी बोरगड, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत प्रांत संघचालक, तथा वर्गअधिकारी श्री अनिलजी भालेराव, परभणी शहर संघचालक मा.डॉ. रामेश्वरजी नाईक, वर्गाचे कार्यवाह श्री अभिजीतजी अष्टूरकर आदींची उपस्थिती होती.
समारोपाचे प्रास्तावीक वर्गाचे कार्यवाह श्री अभिजीत अष्टुरकर यांनी केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे प्रल्हाद बोरगड यांनी आपले मनोगत मांडले. याप्रसंगी व्यासपीठावरून प्रमुख वक्ते श्री हरिशजी कुलकर्णी यांनी ज्यांना कुणाला संघ समजून घ्यावयाचा आहे त्यांनी संघाचा किमान एक वर्ष तरी अनुभव घ्यावा आणि मगच ठरवावे की, संघासोबत काम करायचे की नाही. संघाच्या अनुभवाशिवाय संघ समजला जाऊ शकणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. संघाची कार्यपद्धती , संघाची रचना , संघ कार्याचा विस्तार अशा संघाच्या विविध पैलूंवर अनेक उदाहरणे देऊन त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की , हिंदू समाजात एकात्मता भाव निर्माण करणे गरजेचे आहे. आम्ही राष्ट्र म्हणून सर्वजण एक आहोत ही भावना रुजली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यामध्ये स्वयंसेवकांचे योगदान मोलाचे आहे. स्वयंपूर्ण व सक्षम स्वयंसेवक व कार्यकर्ते घडविण्याचे काम अशा प्रकारच्या २१ दिवसाच्या संघ प्रशिक्षण वर्गातून होत असते. अशा प्रकारचे वर्ग देशभरातून विविध ठिकाणी होत असतात. त्यापैकीच देवगिरी प्रांताचा यावर्षीचा प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्ग परभणी येथे आयोजित करण्याचे भाग्य परभणीकर यांना मिळाले.
देवगिरी प्रांत च्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गासाठी एकूण १४२ स्वयंसेवक सहभागी झाले आणि प्रशिक्षित होऊन संघ कार्याचा संकल्प घेऊन ते आता समाजात काम करतील.
या समारोपाचे बौद्धिक होण्यापूर्वी स्वयंसेवकांकडून संघ शिक्षा वर्गात घेतलेल्या प्रशिक्षणातील नियुद्ध, दंड युद्ध , यष्टी, समता, पदविन्यास इत्यादी विविध प्रकारच्या शारीरिक अभ्यासाचे प्रात्यक्षिकं वर्गाचे मुख्य शिक्षक अभिजीत बहिवाळ यांनी करून घेतली.
२१ दिवसाच्या या संघ शिक्षा वर्गात शारीरिक व बौद्धिक विविध विषयांवर अनेक विद्वान मान्यवरांचे विचार दर्शन नित्य बौद्धिकातून सहभागी स्वयंसेवकांना घेता आले. दररोजच्या बौध्दीक सत्रा मधून स्वयंसेवकांना संघाची कार्यपद्धती , ध्येय धोरणे व संकल्पना स्पष्ट होत गेल्या. बौध्दिकाचे विषय आणि वक्त्यांमध्ये ;- भारताची गौरवशाली परंपरा- डॉ. आनंद फाटक, पुण्यभूमी भारत-श्रीरंग गोसावी , भारत एक राष्ट्र है प्राचीन राष्ट्र है आणि अपना इतिहास स्वातंत्र्य का स्वाभिमानका व सतत संघर्ष का है, पराभव का नही - श्रीराम दत्त जी सहसरकार्यवाह, संघ स्थापनेची पार्श्वभूमी - धनंजयराव धामणे, प.पू. डॉ. हेडगेवार - श्री अभिजीत बहिवाळ , स्वयंसेवक संकल्पना - संतोष पाठक , स्वयंसेवक निर्माणाची अभिनव पद्धती दैनंदिन शाखा - राकेश मोरे , व्यक्ती निर्माणातून राष्ट्रनिर्माण - श्री निलेश गद्रे , प. पू. श्री गुरुजी - श्री संजय वाणी , राष्ट्र जीवनात संतांचे योगदान - श्री श्यामजी हरकरे , सेवाकार्य का? व कसे ? - श्री स्वानंद झारे , स्वातंत्र्य आंदोलनात स्वयंसेवकांचे योगदान - डॉ. रमेश जाधव , संताचे वाढते आयाम - अनिलजी भालेराव , संघ कार्याची उपलब्धी - विलासजी दहिभाते, हिंदुत्वाची अभिव्यक्ती - राजेशजी संन्यासी , निर्दोष सुसंघटीत समाज व सर्व समस्यांना उत्तर - अभिजीत हरकरे , सामाजिक समरसता व समरसतेसाठी महापुरुषांचे कार्य - श्री दीपक तांबोळी या सर्वांचा समावेश होता. यासोबत शिक्ष्यार्थ्यांना त्यांना दिवसभरातून संवाद सत्र , चर्चागट इत्यादी कार्यक्रम ठेवण्यात आले होते. अनेक महापुरुषांवर प्रकाश टाकणारी माहिती दीर्घकथा या सदरात शिक्षार्थी यांना मिळाली. वर्गात अनेक विषयांवर माहिती देणाऱ्या प्रदर्शनी ज्यात संविधान दिवंगत कार्यकर्त्यांची जीवनी, थोर देशभक्त क्रांतिकारक, पुण्यभूमि भारताचे मानचित्र इत्यादी विषयांवरील प्रदर्शनी ठेवण्यात आली होती.
पोळी संकलन एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम
या वर्गाच्या शिक्ष्यार्थ्यांसाठी २१ दिवसांच्या नित्य भोजनाची एक पूर्व नियोजनबद्ध कार्यपद्धती द्वारे भोजन व्यवस्था संघाच्या स्वयंसेवकांनी केली होती. यात दररोज परभणी शहर व ग्रामीण भागातून शिक्ष्यार्थ्यांच्या संख्येनुसार पोळी संकलन करण्यात आले. त्यामुळे मातृशक्तीचे योगदान या संघ शिक्षा वर्गात मोलाचे ठरले.
अशा या वैशिष्ट्यपूर्ण संघ शिक्षा वर्गासाठी अनेकांनी विविध स्वरूपात आपले योगदान दिले आहे. परभणी जिल्ह्यासह अनेक ठिकाणावरून या संघ शिक्षा वर्गाच्या व्यवस्थेकरिता स्वेच्छेने ७५ स्वयंसेवक आले होते. अशा सर्व स्वयंसेवकांनी शिस्त व अनुपालनाद्वारे आपली जबाबदारी पूर्ण करून संघ शिक्षा वर्ग आपले योगदान दिलेले आहे.
संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असलेले समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
-- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
2 टिप्पण्या