वैचारिक दृष्टीकोनातून पंढरीची वारी



पंढरीची वारी हा एक मंगलमय सोहळा आहे. जनकल्याणाचा व संस्कृतीचा सत्याग्रह आहे. उज्वल परंपरेचा सर्वोच्च आविष्कार आहे. या वारीचे वैज्ञानिक दृष्टीने महत्त्व आहे. सामाजिक दृष्टीनेही वारी तितकीच महत्त्वाची आहे. वारीच्या मागे आर्थिक उदात्तताही दिसून येते. त्याचप्रमाणे वैचारिक दृष्टिकोनातूनही वारीचा विचार केल्यास वारी अत्यंत उपयुक्त आहे. वारीमध्ये वारकरी अखंड हरिनामाचा गजर करतात. यासाठी त्यांच्याकडून विविध अभंग, ओव्या, श्लोक, गवळणी, विराण्या, भारुडे, भक्तीगीते, दोहे गायले जातात. अशा साहित्य प्रकारातून जीवन जगण्यासाठी आवश्यक तत्त्वज्ञानापासून ते वैश्विक विचार व परमेश्वराच्या स्वरूपापर्यंतचे व शुक्ष्मापासून ते पूर्णापर्यंतचे संपूर्ण ज्ञान विशद केलेले आहे. विचारांचे अद्भुत नवनीत या संत साहित्यात दिसून येते. त्यामुळे या बाबींचे गायन अथवा भजन हे  केवळ करमणुकीचे साधन नसून तत्त्वज्ञानाची दरवर्षी होणारी उजळणीच आहे. उच्च प्रकारची जीवनमूल्ये धारण करण्याची सहृदय जिव्हाळ्याची साथ आहे. यातून प्रत्येकाने प्रत्येकाला आपले आयुष्य उत्तम रीतीने जगता यावे ही कामना आहे. विश्वबंधुत्वाची, विश्व कल्याणाची अर्चना आहे. 

वारी सुरू झाल्यापासून वारकऱ्या - वारकऱ्यात होणाऱ्या वैचारिक देवाण-घेवाणीचा तो एक ज्ञानयज्ञ आहे. एकमेकांच्या संगतीने वैचारिक समृद्धीची अवस्था मिळवण्याची ती प्रक्रिया आहे. जगात जे काही उदात्त्य, भव्य आणि अद्भुत आहे त्याचा परिचय होण्याची सहज अवस्था वारी आहे. वारीतून वैचारिक चळवळ चालवली जाते. एखादी समाजकल्याणास पूरक बाब जनमानसात रुजवण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था व शासनाचे विविध विभाग वारीत जनजागृती करताना दिसतात. हे प्रयत्न हल्ली होताना दिसत असले ; तरी पूर्वीही समाजप्रबोधनाची ही अनौपचारिक व वैचारिक चळवळ चालवली जात होती. हे कसे ते आता आपण समजावून घेऊ.

१) वारकरी आपापसात सामाजिक, शारीरिक, आर्थिक व राजकीय बाबीवर चर्चा करतात.
२ ) वारकरी आपापल्या कौटुंबिक समस्या व इतर समस्या एकमेकांना सांगतात. एकमेकांच्या समस्या ऐकून घेतात. विचार मंथन करून त्यावर उपाय काढतात. अथवा इतरांनी केलेले उपाय व त्याची फलश्रुती ऐकून त्याचा अवलंब करतात. 
३ )वारीतील विविध अनुभव हे वारकऱ्यांना वेगवेगळ्या प्रसंगी कामास येतात. जसे की भावनावर नियंत्रण ठेवणे. बोलताना योग्य भाषेचा वापर करणे. शब्दांचा संयमित वापर करणे. आदी
४) संतांचे अभंग , कवणे गाता - गाता अनेक जण स्वतःची काव्यरचना करू लागले. पुढे कवी म्हणून नावारूपाला आले. 
५)तुकोबारायांच्या सहवासात निळोबाराय अभंग रचायला शिकले. संत ज्ञानेश्वराच्या व संत मुक्ताईच्या सहवासात संत चांगदेव काव्य करू लागले. संतांच्या सहवासात बहिणाबाई कविता रचू लागल्या व साता समुद्रा पार पोहोचल्या. 
६ )संत साहित्याची निर्मितीचा काळ हा बहुदा पंढरीच्या वारीचाच काळ आहे. किंवा त्यामागे वारीची प्रेरणा तरी आहे.
७) वारीमध्ये वारकरी जेव्हा मुक्कामाला एखाद्या गावात जातात ; त्यावेळी तेथील गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या आर्थिक समृद्धीच्या व आर्थिक दुर्बलतेच्या कारणावर चर्चा होते. वैचारिक मंथन होते. यातून वैचारिक स्तरावर उपाय शोधले जातात. 

८ )अनेकजण गावच्या रूढी - परंपरांचा अभ्यास करतात. समाजपूरक बाबीं मागील कल्याणकारी विचारांची दिशा समजून घेऊन उत्तम रुढी अथवा परंपरा आपल्या गावापर्यंत घेऊन जातात.
९) आधुनिक काळात वारकरी गावोगावच्या शिक्षणावरचे उपाय , विविध सामाजिक उपक्रम, शासकीय योजना, लोककल्याणाची कामे याची पाहणी करून माहिती मिळवून अशा योजना आपल्या गावापर्यंत घेऊन जातात. 
१०)विज्ञानाला भेडसवणाऱ्या  विविध सामाजिक समस्या, जागतिक समस्या या पूर्वीच संतांनी आपल्या विचारात सांगीतल्या आहेत. 

यामध्ये वृक्षांचे महत्त्व सांगताना संत तुकोबाराय म्हणतात "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षी सुस्वरे आळवीती ॥ तसेच समाजाचे होणारे नैतिक अधःपतन बघताना तुकाराम महाराज म्हणतात " बुडती हे जन । पाहवेना डोळा ॥ म्हणून कळवळा घेत असे ॥ भोंदूगिरीवर तुकाराम महाराज म्हणतात "तुका म्हणे सांगू किती । जळो तयांची संगती ॥ व्यसनावर प्रहार करताना तुकोबाराय म्हणतात "असे संत होती काळी । सुखी तंबाखूची नळी ॥ भांग सुरका दे साधन । पचि पडे मद्यपान ॥ तुका म्हणे अवघे सोंग । तेथे कैसा पांडुरंग ॥याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी मंत्र देताना संत ज्ञानेश्वर म्हणतात की "तरी अवधान एक वेळ दिजे ।मग सर्व सुखाशी पात्र होईजे । । हे प्रतिज्ञोत्तर माझे | उघड ऐका ॥याप्रमाणे देवाच्या भेटीसाठी संत कान्होपात्रा आपल्या मनातील ओढ प्रगट करताना म्हणतात "नको देवराया अंत असा पाहू । प्राण हा सर्वदा जावो पाहे ॥ " अशा प्रकारे सर्व विषयावर वैचारिक धन हे वारीतून वारकऱ्यांना प्राप्त होते. त्यामुळे वैचारिक दृष्टिकोनातूनही वारी सर्वश्रेष्ठ ठरते.
   
त्यामुळे चला शक्य झाल्यास वारीत वारकरी होऊ. विचारांची शिदोरी घेऊ. हा जन्म सार्थकी लाऊ. उदात्त होऊ. उज्वल होऊ. समृद्धीच्या प्रांतात प्रयत्नाची मशाल नेऊ. करूयात ना एवढे. स्वतःसाठी, आपल्या सर्वांसाठी, सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी......... जय हरी

- उद्धव त्रंबक बढे, बीड
https://whynotyesican.blogspot.com 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी 

#पंढरीची_वारी #आषाढी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या