शहाद्याचा स्वातंत्र्यसंग्राम: नंदुरबार जिल्ह्यातील बाल हुतात्मे



@डॉ. पुष्कर शास्त्री 

८ऑगस्ट १९४२ ला सुरू झालेल्या चलेजाव चळवळीला एक महिना पूर्ण झाला होता. तेव्हाच्या प्रमुख नेत्यांना इंग्रज सरकारने तात्काळ अटक करूनही हे आंदोलन कार्यकर्त्यांनी व सत्याग्रहींनी देशभर सुरूच ठेवले होते. या आंदोलनाला ९ सप्टेंबर १९४२ रोजी एक महिना पूर्ण होण्याचे औचित्य साधून एक भव्य मोर्चा नंदुरबार शहरात आयोजित केला होता. मोर्चाला बाल, कुमार, तरुण व प्रौढांची उपस्थिती होती. जवळपास चार हजारांचा जमाव होता. जमाव आक्रमक बनून फौजदार वैद्य यांच्यावर खूनी हल्ला झाल्याने पोलिसांनी जमावावर गोळीबार केला. या गोळीबारात ५ बाल सत्याग्रही हुतात्मे झाले. तर २० हुन अधिक जखमी झाले. हे पाच हूतात्मे खालील प्रमाणे...
१)शिरीष कुमार पुष्पेन्द्रभाई मेहता २)लालदास शहा ३)शशीधर केतकर
४) घनश्यामदास शहा ५)धनसुख ललवाणी

ही सर्व हुतात्मा सत्याग्रही अवघ्या पंधरा सोळा वर्षांचे होते. ते नंदुरबारच्या लोकमान्य टिळक विद्यालयाचे विद्यार्थी होते. 'वंदे मातरम!', 'महात्मा गांधी की जय' याबरोबरच गुजरातीतून 'नही नमशे, नही नमशे, निशान भूमी भारत नु' अशा घोषणा दिल्या गेल्या. शिरीष कुमार यांनी अखेरपर्यंत झेंडा सोडला नाही. गोळी लागल्यावरही मागच्या विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा झेंडा दिला पण तो खाली पडू दिला नाही. 
हा गोळीबार नंदुरबार शहरातील माणिक चौकात घडून आला. येथे आज या बाल हुतात्म्यांचे स्मारक आहे. यानंतर पोलिसांनी १२ लोकांना पकडून धुळ्याच्या तुरुंगात रवाना केले. यात नऊ मोठे तर तीन शालेय विद्यार्थी होते मोठ्यांमध्ये--१. मोठा भाऊ तुकाराम मराठे,२. श्यामभाऊ मक्कन,३. विश्वनाथ भिकाजी,४. रविशंकर शिवलाल,५. भिला सोनार,६. विठ्ठलदास नथुलाल,७. गोविंद देवदास शिंपी,८. जगन्नाथ सदाशिव,९. वाल्मीक पुंजू यांचा समावेश होता तर विद्यार्थी-& १.पुरुषोत्तम काळू पाटील( माजी आमदार कै आण्णासाहेब पी.के. पाटील),२. धीरजलाल नानालाल,३. भगवानदास किसनदास हे होते. यांना वेगवेगळ्या शिक्षा झाल्या होत्या.
बाल शहीद लालदाद शहा हे शहाद्याचे होते. शहाद्याच्या चावडी चौकात श्रीराम मंदिरासमोर बाल हुतात्मा लालदास शहा यांचे स्मारकही आहे. शहाद्याचे रा. स्व. संघ कार्यकर्ते श्री.जयेश शहा यांचे ते काका होत. या बाल हुतात्म्यांना व सत्याग्रहींना, स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी पर्वात शत शत नमन! 9 सप्टेंबर हा दिवस "नंदुरबार जिल्हा इतिहास दिन" म्हणून इतिहास संकलन समिती साजरा करते.

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

#शिरीषकुमार #शहादा #नंदुरबार #आजादी_का_अमृत_महोत्सव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या