नांदेडमधील गोरक्षक हल्ला प्रकरणी राज्यभर संतापजनक प्रतिक्रिया; दोन महिन्यांतील सहावी मोठी घटना



२० जून रोजी मध्यरात्री किनवट तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वांच्या झोपा उडवल्या आहेत. किनवट तालुक्यातील अप्पारावपेट परिसरात काही कसायांनी गोरक्षकांवर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात एका गोरक्षकाचा मृत्यू झाला, तर एकूण ५ गोरक्षक गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेनंतर हल्ले खोरांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


२० जूनच्या मध्यरात्री महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये एका बोलेरो पिकअप टेम्पोमधून गोधनाची तस्करी होत आहे, अशी माहिती गोरक्षकांना मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच गोरक्षकांनी रात्री १२ च्या सुमारास टेम्पोवर पाळत ठेवली, आणि गोधन असलेला टेम्पो कुंटला, माकलजांब पुलावर अडवला. यावेळी टेम्पोत बसलेल्या कसायांनी गोरक्षकांवर काठ्या व चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात शेखर रामलु रापोल्ली या गोरक्षकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

दोन महिन्यात गोरक्षकांवर हल्ल्याची सहावी मोठी घटना

मागील काही दिवसांचा आढावा घेतला, तर दिनांक ७ जून रोजी धुळे शहरात गोरक्षक आणि कसाई यांच्यात गाई पकडल्यामुळे हाणामारी झाली होती, यात गोरक्षक गंभीररित्या जखमी झाले होते. २८ फेब्रुवारी रोजी बंटी पाटील या बेटावर (जि. धुळे) गोरक्षकावर जीवघेणा हल्ला झाला. त्यात त्यांच्या डोक्याला व चेहऱ्याला मोठी इजा झाली होती.  त्याच प्रमाणे २५ मे रोजी छत्रपती संभाजीनगरच्या सांगवी बायपास रोडवर गोवंशाची कत्तल रोखण्यासाठी गेलेल्या गोरक्षकावर ३० ते ३५ लोकांच्या धर्मांध जमावाने हल्ला चढवला व धारधार चाकू, लोखंडी रॉड, तलवार अश्या शस्त्रानी मारहाण केली होती. एप्रिल महिन्यातही लातूरमध्येही पोलिसांना कत्तलखाना दाखविला म्हणून पोलिसांच्या समक्ष दोघा गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. 


गोहत्या बंदी कायदा असूनही गोवंश कत्तल का?

खरं तर २०१५ मध्येच देशात गोवंशहत्या बंदी कायदा लागू झाला आहे. याअंतर्गत गाय, वासरू, बैल अश्या जनावरांच्या हत्येला बंदी घालण्यात आली आहे. म्हणजे देशात हा कायदा लागू होऊन आता तब्बल आठ वर्ष उलटले, तरीही देशात खूप मोठ्या प्रमाणावर गोहत्या सुरूच आहे. आणि विशेष म्हणजे जे गोरक्षक कायदेशीर मार्गाचा वापर करून गोहत्या रोखण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर देखील दिवसा ढवळ्या जीवघेणे हल्ले होत आहेत. 

छत्रपतींच्या महाराष्ट्रात जिहाद्यांची वाढतेय मुजोरी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात प्रामाणिक गोसेवा करणाऱ्या गोरक्षकांवर हल्ला होणाऱ्या घटना ही अत्यंत गंभीर बाब आहे. जिहादी धर्मांधांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच आहे. अश्या वारंवार घडणाऱ्या घटना बघता गोवंश हत्या करणाऱ्या कसायांवर प्रशासनाचा कसलाही वचक राहिलेला नाही, असे दिसून येत आहे. अश्या प्रकारचे कायदे तर निर्माण होतात, मात्र या कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी शासन आणि प्रशासनाने कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे. तरच असे प्रकार रोखले जाऊ शकतात, आणि गोवंश आणि गोरक्षक सुरक्षित राहू शकतात.

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या