शहरी नक्षलवाद मिथक नसून वस्तुस्थिती


==========
शहरातून तसेच परदेशातून पाठिंबा आणि पैसा मिळवण्याची ही धोरणात्मक रचना आहे. जंगलातली विचारधारा शहरात पसरवण्याचे काम सुरू आहे. जातीय व धार्मिक तणाव वाढवणे, प्रकल्पांना विरोध करणे, समाजात गोंधळ निर्माण करणे ही शहरी नक्षलवाद्यांची कार्यपद्धती आहे. मात्र, संविधानावर चालणाऱ्या लोकशाही देशात नक्षलवाद खपवून घेतला जाऊ शकत नाही,' असे स्पष्ट मत ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानात 'महाराष्ट्रातील माओवादी चळवळीची सद्यस्थिती, त्यामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि पोलिसिंग' या विषयावर गडचिरोली येथे दोन वर्षे कार्य केलेले पोलीस अधिकारी व सध्या पुणे ग्रामीण ला पोलीस अधीक्षक असलेले अंकित गोयल यांनी नक्षलवादाची विविधांगी मांडणी दिनांक २५ जुलै रोजी पुणे येथे केली. त्यांच्या भाषणातील काही मुद्दे..

▶️ शहरी नक्षलवाद मिथक नसून वस्तुस्थिती आहे. शहरातून; तसेच परदेशातून पाठिंबा आणि पैसा मिळवण्याची ही धोरणात्मक रचना आहे. जंगलातली विचारधारा शहरात पसरवण्याचे काम सुरू आहे. जातीय व धार्मिक तणाव वाढवणे, प्रकल्पांना विरोध करणे, समाजात गोंधळ निर्माण करणे ही शहरी नक्षलवाद्यांची कार्यपद्धती आहे. मात्र, संविधानावर चालणाऱ्या लोकशाही देशात नक्षलवाद खपवून घेतला जाऊ शकत नाही.

▶️ 'माओ'(चीन मधील कम्युनिस्ट नेता..) ने ग्रामीण भागापासून सुरुवात करून शहराच्या दिशेने चळवळ वाढवून क्रांती केली. याच पद्धतीने देशातील माओवादी कार्यरत असून, शहरी नक्षलवाद त्याच प्रक्रियेचा भाग आहे. जे कधीही जंगलात गेले नाही किंवा ज्यांना बंदूक माहीत नाही अशा बुद्धिजीवींचे या चळवळीला समर्थन आहे. शहरांमध्ये या चळवळीबद्दल पाठिंबा मिळवणे आणि जागतिक पातळीवरून चळवळीसाठी पैसे गोळा करण्याचे काम शहरी नक्षलवादी करीत आहेत.

▶️ पश्चिम बंगालमधील नक्षलबाडी गावात जमीनदारांविरोधात १९६७ मध्ये नक्षलवाद चळवळ सुरू झाली. माओवाद ही परकीय व्याख्या देशात स्वीकारली जाईल का, ही शंका असल्याने नक्षलबाडीवरून नक्षलवाद नाव वापरले जाऊ लागले. आंध्र प्रदेशमध्ये ही चळवळ रुजताना तिला बुद्धिजीवी वर्गाचे, तरुणाईचे समर्थन मिळाले. आंध्र प्रदेशमध्ये पोलिस कारवाई झाल्याने महाराष्ट्रात गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी बस्तान बसवले. २००४ मध्ये देशभरात नक्षलवाद फोफावला. वेगवेगळे गट एकत्र येऊन सीपीआय माओइस्ट (भारतीय कम्युनिस्ट पार्टी - माओवादी ) संघटना स्थापना झाली. या चळवळीत समता नाही. महिलांचे शोषण केले जाते. लग्न करण्यास आता परवानगी असली तरी नसबंदीची सक्ती आहे.

▶️ पोलिसांबद्दल विश्वास निर्माण झाल्याने गडचिरोलीत मागील दोन वर्षांत एकही पोलिस हुतात्मा झाला नाही. उलट ५५ नक्षलवादी मारले गेले. मिलिंद तेलतुंबडे मारला गेल्याने गडचिरोलीतील चळवळीला धक्का बसला आहे. मात्र, ती पूर्ण संपली, असे म्हणता येणार नाही.

साभार  विवेक विचार मंच

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या