सेवा भारतीचे पूर्वांचल मधील अविरत अखंड सेवाकार्य

@दिपक राठोड

भारतात सेवेला सर्वोच्च मानलं जातं. 'नर सेवा हीच नारायण सेवा' हा मूल मंत्र स्वामी विवेकानंद यांनी दिला आहे. हा मूल मंत्र घेऊन सेवाभारती या संघ स्वयंसेवकांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या संस्थेमार्फत पूर्वांचल सारख्या दुर्गम व संवेदनशील भागात सेवाभारतीचे विराट सेवा कार्य अविरतपणे चालू आहे. सेवा भारतीचे पूर्वांचल मधील सेवाकार्य  1998 पासून सुरू झाले. ग्रामीण विकास, व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य, शिक्षण आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदत आणि पुनर्वसन, इत्यादी क्षेत्रात सेवाभारती सक्रियपणे निश्चल कार्यरत आहे.


पूर्वांचलमध्ये दरवर्षी धन्वंतरी यात्रा काढण्यात येते. देशभरातून उच्च विद्याविभूषित डॉक्टर्स या यात्रेत सहभागी होतात. यामुळे आरोग्य जागरण व राष्ट्रीय एकात्मता अधिक विकसित व्हावी हा उद्देश असतो. यात्रेत आरोग्य समस्या असलेल्या लोकांना मोफत वैद्यकीय सल्ला आणि तपासणी प्रदान करणे, रुग्णांना मोफत औषधे पुरवणे, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करणे असे उपक्रम केले जातात. आतापर्यंत  1,133 डॉक्टर आणि विविध प्रगत वैद्यकीय शास्त्रांच्या 887 विद्यार्थ्यांनी 1,653 मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले आहे. या माध्यमातून तब्बल 3925 गावांतील 3 लाखाहून अधिक रुग्णांना औषधी वितरण केले आहे.


सेवा भारतीच्या माध्यमातून आरोग्य सेवा अंतर्गत काही प्रकल्प चालतात. त्यामध्ये निरोगी मित्र, योग विभाग, दंत चिकित्सालय, मोफत वैद्यकीय शिबिर, धन्वंतरी सेवा यात्रा, आरोग्य कार्यशाळा आदी उपक्रम घेतले जातात. या व्यतिरिक्त उल्लेखनीय म्हणता येईल असे –
वर्षाला 1000 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
■ 4052 आरोग्य मित्रांमार्फत दररोज 20,000 रुग्णांना सेवा
■ 5 डॉक्टर, 2 मेडिकल व्हॅन आणि 5 रुग्णवाहिका दरमहा सुमारे 7000 रुग्णांवर मोफत उपचार
■ 17 विविध जमातीतील 3000 गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि वसतिगृहाची सुविधा
■योग विभाग 151 योग केंद्र चालवतो जे दरवर्षी 700 हून अधिक लोकांना योग प्रशिक्षण आणि उपचार देतात
■सर्व प्रकारचे योगिक निसर्गोपचार देणारे 400 केंद्र सध्या चालू आहेत


‘ग्रामीण विकास’ आणि ‘उपजीविका’

ग्राम विकास योजना मध्ये गावातील लोकांमध्ये गाव विकास आराखडा, विविध गावपातळीवर बैठका, जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून गावाला स्वयंपूर्ण गावात रूपांतरित करण्यासाठी ग्रामविकास कार्यक्रम आहे. सेवा भारती, पूर्वांचल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या पारंपारिक पद्धतीने लोकांना स्वावलंबी आणि टिकाऊ बनवण्यासाठी विविध पावले उचलतात. सध्या टेलरिंग आणि हस्तकला प्रशिक्षण चालू आहे आणि या माध्यमातून 108 उत्पादन केंद्रांना मदत दिली दिले जात आहे. म्हणजेच काय तर सेवा भारती केवळ उपक्रम घेत नसून समाजाला आत्मनिर्भर करणे व प्रत्येक कुटुंबासह गावाचा विकास घडवून आणणे असे महान उद्दिष्ट साधताना दिसून येत आहे.

 

कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार

सेवा भारती पूर्वांचल संचलित संस्थांमध्ये आज सुमारे 3000 लोकांना रोजगार आणि निवारा मिळत आहे.  येथील हस्तनिर्मित उत्पादनांना जगभरात मागणी मिळू लागली आहे. सध्या कौशल्य विकास मध्ये दोन प्रकल्प चालू आहेत.  संगणक प्रशिक्षण केंद्र, बांबू हस्तकला आणि प्रशिक्षण केंद्र. या माध्यमातून तरुणांना रोजगार तर मिळतोच पण पूर्वांचल मधील पारंपरिक उद्योगांचा जो ब्रँड आहे तोही विकसित केला जातोय. ज्याचा परिणाम म्हणजे येथील तरुण आत्मनिर्भर झाले आहेत.


समाज जागरण आणि चरित्र निर्माण

समाज सशक्त असेल, जागरूक असेल तर त्याचा विकासाला कोणीही आडकाठी आणू शकत नाही. आणि याच साठी रोजगार, आरोग्य, कौशल्य विकास सोबत समाज जागरण आणि चरित्र निर्माण साठी आरोग्यम, किशोरी विकास, मातृ मंडली, सामूहिक विवाह इ. कार्यक्रम घेतले जातात. यामधून विशेषतः किशोर वयीन मुली आणि महिलांना प्रशिक्षित केले जाते.


पुरग्रस्तांना मदत

पूर्वांचलमधील अनेक जिल्हे पूरग्रस्त असतात. आसाम मध्ये तर दरवर्षी मोठे नुकसान पुरस्थिती मुळे होते. अश्या स्थितीत सेवाभारती मदतीसाठी सर्वात पुढे असते. पूरग्रस्त कुटुंबांमध्ये विविध मदत सामग्रीचे वाटप करण्यात येते. ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुरळीत चालावे. जसे की ब्लिचिंग पावडर, फिनाईल, मच्छरदाणी, सॅनिटरी नॅपकिन्स, सोलर लाइट्स, पेन, पुस्तके, साबण, चटई, बेडशीट, वॉटर प्युरिफायर, साड्या इ. अश्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच  मोफत वैद्यकीय शिबिरे उभारण्यात येतात. यामुळे तेथील समाज बांधवांचे पुनर्वसन होण्यास मोठी मदत होते.


एकल विद्यालय

पूर्वांचल मधील दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाद्वारे सक्षम बवण्यासाठी सेवाभारती द्वारे एकल विद्यालय हा अभिनव प्रकल्प चालवला जात आहे. ज्यात “एक शिक्षक, एक शाळा” ही संकल्पना राबवली जाते. जिथे आजपर्यंत शालेय सुविधा पोहचू शकल्या नाहीत अश्या अती दुर्गत व मागास भागात हा प्रकल्प पोहचला आहे. विशेषतः जनजाती आणि चहाच्या बागायत क्षेत्रात आज हा प्रकल्प कार्यरत आहे. सध्या हा उपक्रम 32 स्थानांवर सुरू आहे. जनजाती समाजाला राष्ट्रीय मूळ प्रवाहात आणण्यासाठी केवळ सरकार व शासनावर अवलंबून न राहता स्वतः कृतिशील बनून तेथील समाजाचं दुःख ते आपलं दुःख मानून त्यांच्या भावी पिढ्यांच्या भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सेवा भारतीचे स्वयंसेवक अहोरात्र झटत आहेत.


सेवाभारतीचे पूर्वकालीन कार्यकर्ते हृषीकेश दिवेकर हे गणित विषय अरूणाचल प्रदेशातील हजारो विध्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून शिकवत आहेत. परभणीचे  संघप्रचारक सुरेंद्र तालखेडकर गेल्या तीस वर्षांपासून पूर्वांचल मध्ये कार्यरत आहेत. असे कितीतरी प्रचारक व स्वयंसेवक नंदा-दीप प्रमाणे आपलं जीवन राष्ट्रकार्यासाठी प्रज्वलित करत आहेत. पूर्वांचलला राष्ट्रीय प्रवाहात आणून राष्ट्र उत्थान घडवण्यासाठी संघ स्वयंसेवक किती अथक परिश्रम घेत आहेत हे त्याचे छोटेसे उदाहरण.

क्रमशः (भाग 2)

@दिपक राठोड, छत्रपती संभाजीनगर
मो. 98900 79925

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या