ज्येष्ठ स्वयंसेवक तथा समरसता दूत बाळासाहेब दिक्षित यांचे निधन


संघाचे ज्येष्ठ प्रचारक, वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्व संघटनमंत्री गजानन यशवंत तथा बाळासाहेब दीक्षित यांचे मंगळवारी मध्यरात्री १ वाजता नाशिक येथील श्रीगुरुजी रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. आज मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. 

गेल्या वर्षी  नोव्हेंबर महिन्यात सरसंघचालक मोहनजी भागवत नाशिकमध्ये आले असता त्यांनी बाळासाहेब यांची भेट घेतली होती. या दरम्यान त्यांनी अनेकविध विषयांवर चर्चाही केली होती. नाशिक मधून संघाचे सर्वात ज्येष्ठ स्वयंसेवक म्हणून त्यांना मान होता. 

धाराशिव येथून संघ कार्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी जवळपास ६६ वर्ष संघ कार्यासाठी अविरत मेहनत घेतली. तेथे १९५८ पासून १५ वर्ष त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघ विचार रुजवले आणि धाराशिव सह मराठवाड्यात संघ शाखांचे जाळे विणले. संघविचार रुजविताना त्यांनी संघ हा विशिष्ट घटकांची संस्था असल्याचे खोडून काढताना सर्व समाजाला एकत्रित आणल्याने यांना संघात समरसता दूत देखील म्हटले जाते. 

१९७७ मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला आहे. १९७८ साली स्थापन झालेल्या वनवासी कल्याण आश्रमाचे हे प्रांत संघटन मंत्री झाले. वनवासी कल्याण या विषयासाठी त्यांनी अक्षरशः आयुष्य वाहून घेतले होते. १९९२ मध्ये लातूर येथे झालेल्या भूकंपानंतर किल्लारी येथे पुनर्वसन कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. मदत असो, पुनर्वसन असो, वनवासी बांधवांचे प्रश्न असो किंवा समरसता म्हणून एकसंध समाज करण्यासाठी कितीही मोठे आव्हान असो बाळासाहेबांनी ते लीलया पार केले. समाजाचे दुःख ते आपले दुःख मानून त्यांनी अविरत संघ सेवेत स्वतःला त्यांनी समर्पित केले.

#devgirivsk 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या