लोकनायक, लोकशाही आणि संघ

 
-----------
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विरोधी विचाराची मंडळी संघावर वेगवेगळे विषय घेऊन आग पाखड करण्याचा प्रयत्न सतत करत असतात.  दोन वेळा पूर्णतः व एकदा  अंशतः संघाचा थेट गळा  घोटण्याचा  प्रयत्न झाला .पण संघ या सगळ्याला पुरून उरला एव्हढेच नव्हे तर  प्रत्येक  वेळी नवी झळाळी  घेऊन बाहेर पडला.  

मग संघावर वेगवेगळे आरोप करण्याचे सत्र सुरु राहिले.  कधी  गांधी हत्येचा आरोप, तर कधी ४२ च्या स्वातंत्र्य  लढयात ,संघाचा सहभाग नव्हता, कधी जातीयवादी, भगवे आतंकवादी असे साम्यवादी पठडीतलें नवनवीन आरोप लादण्याचे सत्र सुरूच असते. संघाने याचा फार प्रतिकार करणे टाळले पण आता अशा खोट्या आरोपांना उत्तर देण्यासाठी  प्रचार माध्यमे, सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरवात करावी लागली. काही नटखटांसाठी  कोर्टाचे दरवाजेही ठोठवावे लागले. 

२६ जूनला आणीबाणी सारखे काळे पर्व होऊन पंचेचाळीस वर्ष होत आहेत. हा सर्व उपद्याप ज्यांच्या  प्रत्यक्ष पूर्वजांनी केला त्यांना भीती वाटते की आपली प्रतिमा पुन्हा  एकदा मलीन  होणार  व पुढील कांही वर्षात सत्तेचे सोपान   चढण्याची लक्षणे दिसत नाहीत, अशा  वेळी जयप्रकाशजीं सारख्या ऋषीतुल्य  माणसावर संघाला बदनाम करण्यासाठी अशा सत्तापिपासू माणसांनी  चिखलफेक सुरु केली आहे. 

वास्तविक जयप्रकाशजी, गांधीजी, विनोबाजी यांच्या जातकुळीतले.. ह्या महात्म्यांनी समाज सेवा हेच आपले ब्रीद ठरविले व सत्येपासून कायम दूर राहिले. जयप्रकाशजींना, नेहरूंनी सरकारमध्ये घेण्याचा  प्रयत्न केला. आणीबाणीनंतर त्यांना पंतप्रधानपदापासून मागतील ते पद मिळेल अशी शक्यता असतांना  दोन्ही वेळी त्यांनी स्पष्ट नकार दिला. याचे कारण त्यांनी देशाला स्वातंत्र्य  मिळाल्यावर हे सुराज्य कसे होईल यासाठी प्रयत्न केले, प्रसंगी संघर्षही  केला. स्वातंत्र्यातही लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला.

जयप्रकाशजींनी आणीबाणीत कारागृहात असतांना आपल्या जेल डायरीत दि, ७ सप्टें. च्या पानांवर वरील आशयाचे स्पष्ट दर्शन एका कवितेत दिले आहेत -

सफलता और विफलता की परिभाषाएँ भिन्न है मेरी 
इतिहाससे पूछो वर्षो पूर्व बन नहीं  प्रधानमंत्री क्या?
किन्तु मुक्त क्रांति शोधक के लिए कुछअन्य ही पता मान्य थे,
अदृष्ट थे पथ त्यागके, सेवाके, निर्माणके, पथ संघर्षके,
संपूर्ण क्रांति के संघर्ष के जग जिन्हे कहता है विफलता,
थी शोधकी वे मंजिले मंजिले वे अनगिनत है, गंतव्य अति  दूर है

शेवटी त्यांनी म्हटले आहे-

शत शत धन्य होगा यदि समानधर्मी प्रिय युवकोंका,
कंटकाकीर्ण मार्ग, सुगम बना जावे।

जय प्रकाशजींनी आपले शिक्षण अपूर्ण सोडून गांधीजींच्या बरोबर स्वातंत्र्य लढयात झोकून दिले. मूलतः समाजवादी विचारांचे  त्यामुळे अन्य समाजवादी मंडळींसारखीच त्यांचीही संघाविषयी मते होती. पण त्यांच्या हे लक्षात आले की मी ज्या काँग्रेस बरोबर स्वातंत्र्य लढ्यात  काम  केले ती गांधीजींची काँग्रेस ही  नाही. ज्यांनी तुरुंगवास भोगला, त्रास सहन केले ते केंव्हाच बाहेर फेकले  गेले आहेत व आता सत्तेत असलेले स्वार्थी, भ्रष्ठाचारी लोक जमा झाले आहेत. मग त्यांनी अशा शासनासमोर आंदोलन छेडण्याचे ठरविले. 

बिहार आंदोलनात विद्यार्थी परिषद, संघ प्रचारक श्री नानाजी देशमुख व अन्य कार्यकर्ते त्यांच्याबरोबर उभे राहिले आणीबाणीपूर्वी १९७१ चे संपूर्ण क्रांती आंदोलन, बिहारमध्ये छात्र संघर्ष वाहिन्यांचे गठन, १९७४ साली गुजराथचा नवनिर्माण समित्यांचे आंदोलन, हे सर्व उभे करतांना त्यांच्या लक्षात आले की आपण समजत होतो तसे संघ कार्यकर्ते नाहीत. संकुचित विचारांचे तर बिलकुल नाहीत . 
                                               
या पार्श्वभूमीवर जयप्रकाशजींना संघाने वापरले असे संघावर दोषारोपंण ठेवण्यापेक्षा जयप्रकाशजींसारख्या स्वच्छ आणि निडर माणसावर चिखलफेक करणे होय.                  
                                     
संघ कायम समाजातील अशा समाजासाठी झटणार्या माणसांशी सम्पर्क ठवण्याचे काम करीत असतो. ते   करीत असलेल्या समाजोपयोगी कामांना  त्यांच्या कामात मदत करणे व संघाच्या अनेक प्रकल्पात त्यांना जोडणे आजही सुरु आहे. अगदी विरोधक असणाऱ्यांना देखील बोलावून, त्यांची टीका ऐकण्याची सहनशक्ती संघ स्वसेयकांमध्ये आहे.  अशा टीकेला उत्तरही प्रांत संघचालक कै प्रल्हादजी अभ्यंकर मोठ्या गंमतीदारपणे देत. संघाच्या  व आजच्या पाहुण्याच्या विचारात काहीच अंतर नाही. यासाठी ते एका वाक्याचे  उदहरण देत. "सदा शाळेत पळत पळत गेला या वाक्यातील एकेका शब्दावर जोर देत गेलो तर त्याचे संदर्भ बदलत जातात. वाक्य मात्र बदलत नाही मग पाहुण्यांचा विरोध विरघळायला सुरवात होतो. अगदी कट्टर विरोधकांनी  देखील वैयक्तिक भेटीत संघ कामाची मुक्त कंठाने स्तुती केली आहे. संघाने कधीही  अशा  विरोधकांवर देखील कटू  शब्दात टीका केली नाही त्यामुळेच पूर्वीचे काँग्रेस चे  असणारे, माजी राष्ट्रपती मा. प्रणव मुखर्जी संघाच्या उत्सवात हजर झाले. संघाने कुणालाही वापरले आणि दूर केले असे घडले नाही. हे फंडे राजकारणी लोक वापरतात. 
                      
जयप्रकाशजींचेही  जेव्हा बिहार व गुजराथ मध्ये आंदोलने सुरु केली त्यावेळी संघपरिवारातील कार्यकर्त्यांनी नानाजी देशमुखांबरोबर या कामात पूर्ण झोकून दिले. नानाजींनाही कोणत्याही पदाची कधीच अशा नव्हती. त्यामुळे ह्या विचार जुळलेल्या कार्यकर्त्यांबरोबर जप्रकाशजींनी हात धरले ते शेवट पर्यंत. आणिबाणीतही संघ कार्यकर्ते लोक संघर्ष समिती म्हणून सत्याग्रहात उतरले व हे जुलमी शासन उलथवून दिले.हे सर्व जयप्रकाशजींचे नेतृत्व स्वीकारून .  इथे जप्रकाशजींना वापरणे हा विषयच कोठे आला? पुढे एका शिबिरात जयप्रकाशजींनी संघावर केल्या जाण्याऱ्या फॅसिस्ट या आरोपाचा चांगलाच समाचार घेतला. ते असेही म्हणाले संघ जर फ़ॅसिस्ट असेल तर मी देखील  फ़ॅसिस्टच आहे. 
              
जयप्रकाशजीं वास्तवीक भारतातील अशा श्रेष्ठ महानुभाव  पंगतीतील,  की ज्यांना सगळ्यांनी वंदन करावे. संघावर टीका करणे तर ह्या संघ विरोधक   मंडळींच्या  पाचवीला पुजले आहे. पण त्यात या माहात्म्यांना कृपया ओढू नये येवढीच  किमान अपेक्षा आहे.        
  
✍️ प्रदीप केतकर, नाशिक

©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या